Tuesday, June 6, 2017

(१३) अमेरिकन जनतेत लोकप्रिय असलेले विनोदी किस्से

अमेरिकन जनतेत लोकप्रिय असलेले विनोदी किस्से (१३)
       एखाद्या देशात प्रचलित असलेले विनोदी किस्से त्या देशाबद्दल, त्या देशातील नागरिकांच्या परिपक्वतेबद्दल, त्या देशाच्या प्रकृतीबद्दल बरेच काही सांगून जातात,असे म्हणतात . आमच्या कानावर पडलेले विनोदी किस्से मुद्दाम देत आहे .

मुशर्रफ आणि बुश

       अकरा सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटर उध्वस्त झाले . त्या दिवशी सकाळी मुशर्रफ यांचा बुश यांना फोन आला .

       ’फार वाईट झाले . प्रचंड इमारत जमीनदोस्त झाली . हजारो माणसांचा प्राण गेला . आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत . या हल्याचा आम्ही तीव‘ शब्दात धिक्कार करतो. या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही, अशी मी आपणास हमी देतो’, मुशर्रफ आपली सहानुभूती व्य क्त करीत होते .


       ’कुठली इमारत ? कोणती माणसे ?, तुमच्या बोलण्याचा मला अर्थच कळत नाही ’, बुश आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले .

       ’ ओ ! सॉरी. सध्या अमेरिकेत किती वाजले आहेत ?’, मुशर्रफ यांनी चौकशी करीत विचारले . 

       ’सकाळचे सव्वा आठ होत आहेत . नुकतीच न्याहारी आटोपली आहे ’, बुश यांनी उत्तर दिले . 

       ’सॉरी, मी तुम्हाला आणखी एक तासानंतर फोन करीन’, मुशर्रफ यांनी घाईघाईने फोन खाली ठेवला .

       ( वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला सकाळी सव्वा नऊ वाजता झाला होता .) 

बुश आणि चीनचे पंतप्रधान

       अकरा सप्टेंबरच्या हल्यानंतर चीनच्या पंतप्रधानांचाही बुश यांना फोन आला .

       ’पेटॅगॉन इमारतीची पडझड झाली . अनेक महत्त्वाच्या गोपनीय फायली / कागदपत्रे नष्ट झाली असतील’, चीनचे पंतप्रधान बोलत होते .

       ’हो ना . खूपच नुकसान झाले आहे . कधीही भरून येणार नाही, असे नुकसान झाले आहे. लष्करी गुपिते असणारी अनेक कागदपत्रे नष्ट झाली आहेत’, बुश काळजीच्या स्वरात बोलत होते .

’काळजी करू नका. कोणकोणती कागदपत्रे/गुपिते नष्ट झाली, ते कळवा . त्यांच्या कॉपीज आमच्याजवळ आहेत’, चीनच्या पंतप्रधानांनी आश्‍वासन  दिले . 

बुश आणि वाजपेयी

       बुश आणि वाजपेयी एका बारमध्ये बिअर पीत बोलत बसले होते . बराच वेळ झाला म्हणून वेटरने विचारले , ‘एवढ्या कोणत्या महत्त्वाच्या मुद्यावर तुम्ही चर्चा करीत आहात ? ’

       वाजपेयींनी उत्तर दिले,’आम्ही तिसरे महायुद्ध कसे घडवून आणता येईल, याची चर्चा करीत आहोत .  या युद्धात आम्ही चौदा कोटी पाकिस्थानी आणि एक रिक्षावाला यांचा संहार करू ’.

       यावर आश्‍चर्यचकित होऊन त्या वेटरने विचारले, ’रिक्षावाल्याला तुम्ही का म्हणून मारणार ?’

       यावर वाजपेयी उत्तरले, ’एक तास झाला, मी बुशसाहेबांना हेच समजावून सांगत होतो. सगळे लोक त्या रिक्षावाल्याला का मारले, याचीच चौकशी करतील. ’

बायकोची परी कशी होईल?

       एका प्रसिद्ध इंग‘जी कवीच्या काव्यात आर्थर नावाचा राजा आणि त्याचा विश्‍वासू सरदार लॅन्सेलॉट यांचा उल्लेख आहे. लॅन्सेलॉटने आपल्या राजाला एका चेटकिणीच्या तावडीतून सोडविण्यासाठी तिच्याशी लग्न करून आपली स्वामीनिष्ठा प्रगट केली. ही चेटकीण, म्हातारी, कुरूप आणि एकाक्ष अशी होती. आपल्या नवपरिणित वधूला (चेटकिणीला) भेटण्यासाठी लॅन्सेलॉट पहिल्या रात्री गेला, तो त्याला पलंगावर एक परी पहुडलेली दिसली , तेव्हा तो आश्‍चर्यचकितच   झाला.

       ती परी म्हणाली,’ मी चेटकीणच आहे.मी रात्री परीचे आणि दिवसा चेटकिणीचे रूप धारण करते. पण तुझी इच्छा काय आहे, ते सांग. त्यानुसार मी उलटही करीन. म्हणजे दिवसा परी म्हणून वावरीन आणि रात्री चेटकीण होईन.’

       लॅन्सेलॉटने खूप विचार केला. त्याला काय म्हणावे, ते सुचेना. कोणताही पर्याय स्वीकारला तरी त्याचे फायदे तोटे होते . शेवटी त्याने म्हटले, ’ काय करावे ते मला कळत नाही.माझे काहीच ठरत नाही. तेव्हा तुला हवे ते तू ते कर ’ .

       हे ऐकून ती चेटकीण खूप खूश झाली. ती म्हणाली, ’ तुझे बोलणे ऐकून मला अतिशय आनंद झाला आहे. त्यामुळे मी आता दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी परीचेच रूप धारण करून राहीन’.

तात्पर्य - बायकोला तिच्या इच्छेनुसार वागू दिले तर तिची चेटकीण होत नाही.

लग्नापूर्वी आयुष्यात आलेली सुंदर स्त्री

       एका प्रसिद्ध कंपनीच्या मालकाने आपल्या कंपनीच्या मॅनेजरस्ची सभा घेऊन सांगीतले की, त्याच्या आयुष्यात लग्नापूर्वी एक सुंदर स्त्री आली होती . तिच्या प्रोत्साहनामुळेच तो इतका मोठा झाला आहे . थोडा वेळ थांबून तो म्हणाला, ’ ती त्याची आई होती ’.

       ही गोष्ट ऐकून एक मॅनेजर घरी आल्यानंतर आपल्या बायकोला स्वत:बद्दल हीच गोष्ट सांगायला सुरवात असतो. गोष्ट सांगतांना तो पेगवर पेग रिचवत असतो. बायको किचनमध्ये काम करीत असते .

       ’ माझ्या आयुष्यात लग्नापूर्वी एक सुंदर स्त्री आली होती. तिच्या प्रोत्साहनामुळेच मी इतका मोठा झालो आहे’. मध्येच तो सांगतासांगता थांबतो. त्याला पुढचे वाक्य काही केल्या आठवत नाही. बायको उकळत्या पाण्याचे भांडे चिमट्यात धरून रागाने त्याच्याकडे पहात असते. पुढची गोष्ट न आठवल्यामुळे तो म्हणतो,

’ ती कोण होती, ते मला आठवत नाही’ .

       तो जागा होतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की , तो एका हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेला आहे आणि उकळते पाणी अंगावर पडल्यामुळे झालेल्या जखमांसाठी त्याच्यावर उपचार सुरू आहेत .

No comments:

Post a Comment