Tuesday, June 6, 2017

(५) अ‍ॅक्वेरियम-एअरफोर्स म्युझियम - सायन्स म्युझियम

२५.५.२०१७ (५) अ‍ॅक्वेरियम-एअरफोर्स म्युझियम - सायन्स म्युझियम
सफर अमेरिकेची
अ‍ॅक्वेरियम-एअरफोर्स म्युझियम - सायन्स म्युझियम
     दिनांक 2.जुलै2009 ला गुरूवारी दुपार दोन वाजता निघायचे ठरवून प्रत्यक्षात चार वाजता ’शेव्हरले हाय लँडर’ या सात सीटर गाडीने निघालो आणि आमचा दोन हजार मैलांचा प्रवास सुरू झाला. लेफ्ट हँड ड्राइव्ह असलेली ही अमेरिकन गाडी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम(जी पी एस) चे साह्य घेऊन  आमच्या मुक्कामाच्या दिशेने सुसाट धावत सुटली. ’आता उजवीकडे वळून 50 मैल जा’ मग ’डावीकडे वळून आणखी तीस मैल जा’ अशा ढोबळ सूचनांचे पालन करीत  असातांना ’आता तुम्ही तुमच्या उतरायच्या हॉटेलसमोर आला अहात’, अशी सूचना देऊनच आमची गाडी थांबली. वाटेत उत्तम ’रेस्ट रूम्स’ होत्या. त्यामुळे कोणतीही अडचण आली नाही.
     आमचा पहिला पडाव केंटकी प्रांतातील न्यू पोर्टबंदर येथे पडला. हॉटेलमध्येच मायक्रोवेव्ह, ए सी अशी सगळी सोय होती. रात्री मुक्काम करून सकाळी अ‍ॅक्वेरियम पाहण्यासाठी गेलो. या ठिकाणी सर्व प्रकारचे मासे होते. पिर्‍हांना, जेली फिश, शार्क, ऑक्टोपस, व्हेल, स्टार फिश, इलेक्ट्रक रे असे लहानमोठे मासे पाहतांना दोन तास कसे गेले ते कळलेच नाही. त्यांच्या समवेत फोटो काढले आणि बाहेर आलो.ओहायो नदीचे दर्शन घेतले.
     पुढचा मुक्काम ओहायो प्रांतातील सिनसिनाटी गावी होता. या प्रांताला ’फ्लाईट स्टेट’ असे खास नाव आहे. सकाळी चहा - नाश्ता आटोपून (खर्च फक्तछत्तीस डॉलर!) डेटन या गावी पोचलो. या ठिकाणी यु एस एअर फोर्स म्युझियम आहे. या गावी राईट बंधूंचे प्रथम विमानोड्डाण झाले. त्या विमानासमोर आम्ही आपला फोटो काढला.
तिघातला तिसरा
     विमानांचे सर्व प्रकार बघितले. काही ठिकाणी फोटोही काढले. जपानवर टाकण्यासाठी तीन ’अ‍ॅटम बाँब’ तयार करण्यात आले होेते. त्यातले दोन हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आले , एक शिल्लक राहिला होता. त्यातला ’मसाला’ काढून वरचे ’कवच’ तेवढे प्रदर्शनात ठेवले होते. त्याच्यासमोर उभे राहून फोटो काढला.
कर्दनकाळ वाघिणी
     दुसर्‍या महायुद्धात  जर्मनीने अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांचे अनेक सैनिक युद्धबंदी म्हणून पकडले होते. त्यांना तुरुंगात वाहून नेण्यासाठी रेल्वेच्या वाघिणी वापरत असत. एका वाघिणीत शेकडो सैनिक कोंबले जात. काही ’प्रवासातच’ मरायचे. उरलेले अर्धमेले व्हायचे. त्यावेळी वापरलेल्या वाघिणींपैकी एक वाघीण (वॅगन) प्रदर्शनात होती. तिच्यासमोर उभे राहून फोटो काढला.
छत्रीधार्‍यांची बाकाडे
     बाँबफेकी विमानात बाँब कुठे ठेवले जात, ते सुद्धा पाहिले. सैनिकांना घेऊन जाणार्‍या विमानात आम्हीही शिरलो. एखाद्या आक्राळविक्राळ राक्षसिणीच्या तोंडात जातो आहोत, असा भास शिड्या चढतांना होत होता. छत्रीधारी सैनिकांची बसण्याची ’बाकाडे’ पाहिली. बसणार्‍या सैनिकाच्या पाठीला लागूनच काचेच्या खिडक्या होत्या. मुक्काम आला की एकेक करून सैनिक हवाई छत्री घेऊन उडी मारीत असत. ती जागा पाहिली.
     बर्लिन वॉलच्या तुटक्या अवशेषासोबत फोटो काढला. एका विटेचाही फोटो काढला. दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी जर्मनीचे विभाजन झाले. अमेरिका, फ्रान्स व इंग्लंड यांच्या वाट्याला जर्मनीचे जे भाग आले ते एकत्र करून त्यांनी एक सलग प्रदेश निर्माण केला. तो म्हणजे पश्‍चिम जर्मनी. रशिायाच्या वाट्याला जो भाग आला तो पूर्व जर्मनी. बर्लिन शहराचेही असेच भाग करण्यात आले. यातले तीन भाग (अमेरिका  फ्रान्स व इंग्लंड यांच्या वाट्याला आलेले बर्लिनचे भाग) एकत्र करून एक ’सलग बर्लिन’ झाले. रशियाच्या ताब्यातले बर्लिन वेगळे झाले. यांना वेगळे करणारी भिंत बांधली होती. बर्लिनचे दोन तुकडे करणारी भिंत ’बर्लिन वॉल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. रशियाच्या ताब्यातील जर्मनीत आणि बर्लिन शहरात दारिद्र्य, विपन्नावस्था , दडपशाही होती. ती झुगारून अनेक लोक चांगल्या बर्लिनमध्ये /जर्मनीमध्ये येत असत. शेकडो मारले जात. पण मूठभर यशस्वी होत. हे विभाजन जर्मनांना मान्य नव्हते. पण काही इलाज सापडत नव्हता. ह्या बर्लिन वॉलवर चढून अमेरिकेचे अध्यक्ष जाॅन एफ केनडी यांनी रशियन बर्लिनमध्ये डोकावून पाहिले होते. हे भलतेच धाडस होते. अशी व्यक्ती नेम धरून मारण्यासाठी अगदी सोपे सावज असते. पण काहीही विपरित न घडता केनडीसाहेब ’डोकावून’ झाल्यावर खाली उतरले. या भिंतीच्या भग्न अवशेषासमोर उभे होताच या सर्व माहितीची  उजळणी मनात झळकली. एक दिवस जर्मन लोकांनी बर्लिन वॉल तोडून टाकली . यावेळी अफाट जनसागर उसळला होता. रशियन पहारेकरी हतबुद्ध होऊन हा पाडाव नुसते बघत राहिले. पुढे जर्मनी एक झाला. देशाची कृत्रिम फाळणी फारकाळ टिकत नाही, हेच खरे.
     समोरच अपोलो यान होते. आर्मस्ट्राँगच्या चंद्रावरील पदार्पणाचा फोटो होता. पावलांचे ठसे दिसत होते. हा सगळा भाग आम्ही कॅमेरात पकडून आम्ही पुढे सरकलो.
     दिनांक चार जुलै 2009 ओहायो प्रांतातील कोलंबस या गावी जाऊन कोसी (सी - ओ -एस - आय) हे सायन्स म्यझियम पाहिले.
     प्रारंभी स्टॅटिक इलेक्ट्रसिटीविषयक प्रदर्शन निवेदनासह बघितले. विद्युत्भारित केसांमुळे झिपरी झालेली मुलगी बघून तिच्यासह सर्वजण खदाखदा हसले. शॉक घेऊन दचकले. ओम्कार आणि अनुषा यांनीही पसरलेल्या केसांचा अनुभव शहारलेल्या स्थितीत घेतला.
     अनेक वैज्ञानिक चमत्र, प्रयोग, उपकरणे, प्रात्यक्षिके, पाहिली. एकाच माणसाची निरनिराळ्या ग्रहांवर वजने कशी असतील हे दाखवणारा ग्राफ पाहिला. हा आपल्या येथील विज्ञान प्रदर्शनात ठेवण्यासारखा व सोपा वाटला. झाडाच्या बुंध्याच्या आडव्या च्छेदातील वर्तुळे पाहून त्याचे वय कसे कळते, हे कापलेला बुंधा पाहून जाणून घेतले.
     वाटेत डेटन ,सिनसिनाटी व कोलंबस या गावी भारतीय दुकाने (मॉल्स) आहेत. या ठिकाणी आम्ही आवश्यक किराणा भरून घेत होतो. परत यायला निघालो आता घरी परतण्याची ओढ लागली होती. अजू ताशी ऐंशी मैल वेगाने गाडी हाकीत होता.



No comments:

Post a Comment