Tuesday, June 6, 2017

(११) नायगारा

२६.५.२०१७ प्रवास  नायगारा (११)
       लॉकपोर्टची कॅनाल लॉक्स पसहून आम्ही बफेलो गावतील हॉटेलवर झटपट परत आलो . कसेबसे खाणे उरकले, कारण रात्रीची नायगारा धबधब्यावरची आतषबाजी आणि रोषनाई पहायची होती. बफेलोपासून हे अंतर अर्ध्या तासाच्या अंतरावर (ताशी वेग सत्तर मैल)  आहे. आम्ही पोचलो तेव्हा आतषबाजी संपत आली होती पण रोषनाई सुरू होत. बरेच अंतर पायी गेल्यानंतर आम्ही योग्य ठिकाणी पोचलो. धबधब्यावर निरनिराळ्या रंगाचे प्रकाशझोत  टाकण्यात येत होते. या दृष्याची भव्यता आणि सौंदर्य आम्ही घाईघाईने डोळ्यात आणि कॅमेरात साठवीत  होतो. कारण दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर येणे भाग होते.

       नायगारा धबधब्यावरून रोप वॉकिंग करणार्‍या बहाद्दर नीक वॉलेंडाच्या अचाट साहसाचे वृत्त परत आल्यानंतर तीन वर्षांनी वाचले . ही घटना अपूर्व किंवा अभूतपूर्व आहे यात शंका नाही. पण अशी साहसे यापूर्वी अनेकांनी कधी यशस्वीरीत्या तर कधी जीवावर बेतले असतांनाही केली आहेत, काहींचा तर जीवही गेला यासर्वांची आठवण झाल्यावाचून रहात नाही.

मार्था वॅगनफ्युररची साहस कथा

       आमच्या अमेरिकेतील मुक्कामात नायगारा धबधब्याला भेट देण्याच्या कार्यक्रमात अशा स्वरूपाच्या अनेक कथा ऐकायला मिळाल्या . त्यापैकी त्रेसष्ट वर्षांच्या एका तरूण शिक्षिकेची साहसी सत्यकथा पहिल्या क्रमांकाची वाटली. तिचे नाव आहे ’मार्था वॅगनफ्युरर’. ही एका कुस्तीगीराची बायको होती. सहा सप्टेंबर 1901 संध्याकाळी तिने हे साहस केले. सात सप्टेंबरला अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष नायगाराला भेट देणार होते. त्यांच्या हस्ते आपला सत्कार होईल, अशी अपेक्षा बाळगून मार्थाने हा दिवस निवडला होता.

       एका डिझेलच्या बॅरलमध्ये (ड्रम) मार्थाने स्वत:ला कोंडून घेतले. आतमध्ये गादी आणि डोक्याला उशी घेतली. हा ड्रम सील करून लगेच नायगारा नदीत सोडण्यासाठी तिने आपल्या सहकार्‍यांना सांगीतले. तिने अगोदर भरपूर मद्यप्राशन केले होते. हा ड्रम धबधब्यासह खाली कोसळला. खाली तयारीत असलेल्या नाविकांनी हा ड्रम नावेत ओढून घेण्यासाठी धाव घेतली. पण अंधार झाल्यामुळे त्यांना तो जवळजवळ एक तास दिसलाच नाही. नायगारा नदीवर सर्चलाईट टाकून सर्व परिसर उजळून काढण्यात आला. शेवटी एकदाचा ड्रम तरंगतांना दिसला आणि मार्था ’मुक्त’ झाली. या आघातमुळे ती बेशुद्ध झाली होती. तिचा श्‍वास जेमतेम सुरू होता. तिची प्रकृती अतिशय गंभीर झाली  होती. पुढे वैद्यकीय उपचार झाल्यावर ती अनेक महिन्यांनी बरी   झाली पण पुढे अनेक वर्षे जगली.

       या कथेवर आधारित चित्रपटही आम्ही पाहिला. दिग्दर्शकाने कथेत एक फरक केला होता. या जलदिव्यात काम करणार्‍या नटीने सोबत एक काळे मांजर घेतलेले दाखविले होते. या जलदिव्यातून बाहेर पडतांना हे ’काळे’ मांजर ’पांढरे’ झालेले दाखविले होते. कथाकार आणि दिग्दर्शक यांनी कविगत स्वातंत्र्याचा आधार घेत मूळ कथेत केलेला हा बदल प्रेक्षकांची दाद घेता झाला. ’निरंकुश: कवया:’, असे काहीसे एक संस्कृत वचन आहे . त्याचा आधार अमेरिकन कथाकार आणि दिग्दर्शकांनी घेतलेला पाहून गंमत वाटली.

पाठीवर सवारी घेऊन नायगारा ओलांडणारा बहाद्दर ब्लाँडिन

       धबधब्यावरून रोप वॉकिंग करूनही अनेक बहाद्दरांनी हा धबधबा ओलांडला आहे.(नीक वॉलेंडाप्रमाणे प्रदक्षिणा घातल्याची माहिती मात्र प्रथमच कानावर येत आहे.) मॉन्सीअर ब्लाँडिन नावाच्या बहाद्दराने तर आपल्या हॅरी कॉकोर्ट नावाच्या मॅनेजरला पाठीवर घेऊन हा धबधबा ओलांडल्याची नोंद आहे. असे सांगतात की अर्ध्यावर आल्यानंतर मॅनेजरची गाळण उडाली. तो गडबड करू लागला. तेव्हा ब्लाँडिनने त्याला दम भरला. तो शांतपणे मूग गिळून बसला नाही तर त्याला अर्ध्यावरच सोडून देण्याची धमकी ब्लाँडिनने दिली होती. तेव्हा कुठे मॅनेजर महाशय जीव मुठीत धरून गप्प बसले.’दोघांचेही घरी काहीतरी बिनसले असावे, त्याशिवाय का कुणी असे साहस करील?’, असा अभिप्राय आमच्यासोबत असलेल्या एका गृहिणीने आम्हाला ऐकवला . अशी साहसे अनेक स्त्रीपुरूष करीत होते . ते ’डेअर डेव्हिल्स’ म्हणून ओळखले जात. काही यशस्वी झाले तर काहींचा प्राण गेला. पुढे  अशा साहसी मोहिमांमधील धोका लक्षात घेऊन या मोहिमांवर बंदी घालण्यात आली. नीक वॉलेंडाने खास अनुमती घेतली असावी.

गोट आयलंड(बकरा बेट)

       नायगारा नदीला स्थानिक भाषेत ’नायग्रा’ असे म्हणतात. ही नदी इरी नावाच्या सरोवरातून उगम पावते . धबधबारूपाने खाली कोसळते आणि आँटोरियो सरोवराला जाऊन मिळते . धबधबा सुरू होण्यापूर्वी ती दोन शाखांमध्ये विभाजित होते . या शाखांच्या कात्रीत तयार झालेल्या भूभागाला ’गोट आयलंड (बकरा बेट)’, असे नाव आहे. नायगाराच्या दोन प्रचंड बाहूत सापडलेल्या या भूभागाचे, ’गोट आयलंड’ हे नाव सार्थ वाटले. मात्र या नामकरणामागचे प्रत्यक्ष कारण चौकशी करूनही कळले नाही.

       नायगाराची एक शाखा अमेरिकन भूप्रदेशात खोल उडी घेते आणि एक धबधबा तयार होतो. तर दुसरी शाखा कॅनडाच्या भूभागावर अशीच किमया करते. ही शाखा मोठी असून ज्या खडकावरून तिचे अवतरण होते, त्याला घोड्याच्या नालीसारखा आकार प्राप्त झाला आहे. आपल्या भारतात गंगावतरण झाले तेव्हा भगवान शंकराने गंगेला आपल्या मस्तकी धारण केले आणि पहिला आघात स्वत: सोसला. पण नायगाराचे पुण्य कदाचित कमी पडले असावे किंवा इथे भगीरथ नसेल म्हणून की काय यावेळी भगवान शंकर साह्याला आले नाहीत. त्यामुळे अतिप्रचंड आवाज करीत हा जलश्रोत गेली साडेबारा हजार वर्षे सारखा कोसळतो आहे.

नायगारा म्हणजे एक अवखळ बालिका

       असे मानले जाते की साडे बारा हजार वर्षांपूर्वी बर्फाचे प्रचंड साठे उत्तरेकडे सरकले आणि वितळलेल्या बर्फाच्या पाण्याला वाट मिळून प्रचंड जलसाठा ’मुक्त’ झाला. याचा परिणाम म्हणून इरी आणि आँटोरियो ही महाकाय सरोवरे आणि नायगारा ही नदी जन्माला आली.हिचे वय ’फक्त साडे बारा हजार वर्षे’ एवढेच आहे. याचा अर्थ असा की भूतलावरच्या सर्व नद्यांमधली ही एक ’बालिका’ मात्र आहे. म्हणूनच कदाचित ती एवढी अवखळ, अल्लड आणि धडपडी असावी. त्याशिवाय का तिने मागचापुढचा काहीही विचार न करता एकदम एकशे शहात्तर फूट खाली उडी घेतली ? दर सेकंदाला (1.50,000) एक लक्ष पन्नास हजार गॅलन पाण्यासह तिचे अवतरण अव्याहत सुरू आहे. आफ्रिकेतील व्हिक्टोरिया धबधब्यानंतर  दुसरा नंबर लागतो तो नायगार्‍याचा.

मेड ऑफ द मिस्ट - धुक्यातली सुंदरी

       आमच्या जलसहलीचे नाव होते, ’मेड ऑफ द  मिस्ट-धुक्यातली सुंदरी’.स्थानिक लोकात एक दंतकथा सांगीतली जाते. त्यावरून हे नाव पडले आहे. बळजबरीने लावला जात असलेला विवाह टाळण्यासाठी एक तरुणी ’बोहल्यावरून’ पळ काढून निसटली आणि नायगारा नदीत नांगरून ठेवलेल्या एका बोटीतून तिने पळ काढला. पण दुर्दैवाने ही नाव धबधब्यावरून खाली कोसळली आणि तिचा अंत झाला. या दंतकथेवरून सहलीला ’मेड ऑफ द  मिस्ट’ हे नाव दिले आहे. धबधब्यामुळे पन्नास फूट उंच तुषार उडतात. सर्वत्र धुके पसरते. भर दिवसा पाच - पंचेवीस फुटावरचे सुद्धा स्पष्ट दिसत नाही. या अंधुक प्रकाशात अजूनही ही तरुणी कधीकधी दिसते, असे म्हणतात. पण आम्ही मात्र तेवढे भाग्यवान नव्हतो.

 नायगारा नदी जाम झाली तेव्हा

       29 मार्च 1848 रोजी बर्फाचा एक कडा अडकून ही नदी काही तासांपुरती ’जाम’ झाली होती. धबधबा एकदम थांबला. कानठळ्या बसवणारा आवाज एकदम थांबून एक भयाण शांतता निर्माण झाली. या आवाजाची सवय झालेले पशुपक्षी बावचळले, घाबरले आणि कासावीस होऊन आपापली निवासस्थाने सोडून बाहेर आले. त्यांनी एकच हलकल्लोळ केला. काही तासानंतर तुंबलेल्या पाण्याचा रेटा सहन न होऊन धबधबा जाम करणारा बर्फाचा कडा कडाडत आणि धडाडत खाली कोसळला आणि नायगाराचे अवतरण पुन्हा सुरू झाले. आता मात्र परिचित प्रचंड आवाज ऐकून पशुपक्षांना हायसे वाटले. त्यांनी आपला हलकल्लोळ आवरता घेतला आणि आपापल्या निवास्थानाकडे प्रस्थान केले.

       मिशिगन, ह्यूरॉन, सुपिरियर, आँटोरियो आणि इरी या पाच सरोवरांमध्ये जगातला शुद्ध पाण्याचा एकचतुर्थांश साठा आहे, असे म्हणतात . असे असले तरी या पाण्याची शुद्धता कमी होऊ नये किंवा तो कमी होऊन आटू नये यासाठी अमेरिका व कॅनडाची सरकारे अतिशय जागरूक आहेत.

       नायगारा हा निसर्गाचा चमत्कार ! त्यावर मानवाने वेळोवेळी केलेली थरारक साहसे हा चमत्कारही निसर्गाच्या चमत्कारांशी स्पर्धा करणारा आहे. याचसोबत मानवाने आणखीही एक किमया केलेली आहे. त्याने विज्ञानाच्या साह्याने या धबधब्यावर नेत्रदीपक रंगीबेरंगी साजशृंगार चढवला आहे. हे दृश्य रात्री खूपच मनोहारी दिसते. त्याने कल्पकतेची कमाल करून या धबधब्यावर वास्तूंची, यंत्रांची गवसणी घातली आहे. नीक वॉलेंडाने एक नवीनच विक्रम केला आहे . हा विक्रमही उद्या कुणी ना कुणी मोडेलच यात शंका नाही. उच्चांक असतातच मुळी मोडण्यासाठी !

बापजाद्यांची काऊंटी -’केन काऊंटी’

       यानंतर ’किंग्ज डॅमला’ आम्ही भेट दिली आणि त्या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य आणि हिरवी मखमल न्याहाळून पुढे निघालो . तोच आम्हाला पाटी दिसली ’केन काऊंटी’. केन आणि काणे यांचे स्पेलिंग एकच (के - ए -  एन - ई )आहे . आपल्या येथे हिंदुस्थानात ’काण्यांची संख्या’ तशी फारशी नाही . पण अमेरिकेत ’केन शेकड्यांनी’ आहेत . ’केन काऊंटी आपल्याच बापजाद्यांची आहे’, असा भाव चेहर्‍यावर आणून मी आणि नीलम त्या पाटीला टेकून उभे राहिलो. आपापले फोटो काढले आणि ’जड मनाने’ केन काऊंटीचा निरोप  घेऊन पुढच्या प्रवासाला सुरवात करते झालो. आता कार्यक‘म संपला होता. त्यामुळे ’घरची ओढ’ गाडीचाही वेग वाढवीत होती. संध्याकाळी घरी परतलो आणि सगळ्यांनी ’हुश्श्य’ म्हणत कोचावर बसकण मारली .

नायगारा कार वॉश

       अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील इरी ह्या छोट्याशा गावी कार धुऊन घेण्याचा कार्यक्रम ठरला, तेव्हा मी फारसा उत्सुक नव्हतो. कारण गाडी धुण्याच्या कार्यक्रमात प्रेक्षणीय असे काय असणार आहे, अशी माझी समजूत होती. पण प्रत्यक्षात आलेला अनुभव अगदी वेगळा होता. अमेरिकेत सर्वच गोष्टी स्वयंचलित असतात, हे ऐकले होते आणि पहातही होतो. पण पराकोटीचे स्वयंचलन बघण्याचा हा योग आपण चुकवला नाही, ही फार चांगली गोष्ट झाली असे प्रत्यक्षात ही धुलाई पाहिल्यानंतर वाटू लागले.

       आम्ही नायगारा कार वॉश सेंटरवर पोचलो तेव्हा अगोदर कुणाचा तरी ’नंबर’ लागलेला होता. एका दृष्टीने हे बरेच झाले.त्या गाडीवर पाण्याचे जोरदार फवारे सोडले जात होते. नंतर हवेचे झोत सोडून ती गाडी कोरडी करण्यात आली आणि नंतर हळूहळू पुढे सरकू लागली तेव्हा लक्षात आले की, गाडीचा वाहक आत गाडीतच बसून होता.

पराकोटीचे स्वयंचलन

       थोड्याच वेळानंतर समोर एक पाटी प्रकाशित झाली. त्यावर लिहिले होते, ’यू कॅन एंटर नाऊ’आम्हाला गाडी पुढे आत नेण्याची अनुमती मिळाली होती. आम्ही गाडी हळूहळू पुढे नेली आणि एका ए टी एम सेंटर सार‘या यंत्रासमोर थांबविली. ’पर्याय नोंदवा’, अशी सूचना आली. आम्ही गाडीला अगदी ’सचैल स्नान’ घालायचे ठरविले होते. तशी नोंद करताच ’नऊ डॉलर भरा’, अशी सूचना झळकली. कार्ड ’स्वॅप’ करून आम्ही पैसे (डॉलर) भरले. पैसे आमच्या बँकेच्या खात्यावरून ’वळते’ झाल्याची सूचना झळकली. लगेच आम्ही गाडी थोडी पुढे सरकवून ’नायगारा कार वॉश’च्या स्वाधीन झालो. वॉश सेंटरने आपले लक्ष आमच्यावर केद्रीत केले आणि ते आमच्या सेवेसाठी सज्ज झाले.

       एका ठिकाणी ’थांबा’ अशी पाटी झळकली. आम्ही गाडी थांबवली. सीटी स्कॅन करतांना किंवा एक्स रे काढतांना जसे एक मशीन आपल्यावरून फिरवून योग्य ठिकाणी आणतात, तशी हालचाल एक्स रे मशीनच्या चौपट आकाराच्या मशीनची सुरू झाली.

  पाण्याचा प्रचंड वेगाने येणारा ’झोत/फवारा’ प्रथम चाकांवर स्थिर झाला.थोड्या वेळाने तो वरवर सरकू लागला. समोरच्या काचेतून हे प्रेक्षणीय पण भिववणारे दृश्य दिसत होते. हे मशीन गाडीच्या छतावरून पुढेपुढे सरकत मागच्या काचेचा समाचार घेऊन मागच्या काचांवर स्थिर झाले आणि थोड्या वेळानंतर आल्या पावली परत जायला निघाले. शेवटी ते फवारे मारीत मारीत आपल्या मूळ जागी परत गेले. आता साबणाच्या फेसाची फवारणी सुरू झाली. आणि पाण्याच्या फवारणीच्या मार्गानेच येऊन परत आपल्या जागी जाऊन स्थिरावले. आता पुन्हा पाण्याची फवारणी सुरू झाली. आता काचेवर रंगीबेरंगी पट्टे दिसू लागले. जणू इंद्रधनूच. पाण्याचा फवारा थांबताच हळूहळू हे इंद्रधनू विरले. आता गाडी कोरडी करण्यासाठी हवेचे झोत सुरू झाले. एका मिनिटाच्या आत सर्व गाडी कापडाने पुसून काढावी, तशी कोरडी आणि स्वच्छ झाली.

       ’आपली गाडी धुवून झाली आहे, आता आपण प्रस्थान ठेवू शकता’, अशी पाटी झळकली, आणि आम्ही तिथून निघालो. ही सर्व सफाई आम्ही गाडीत बसून काचेतून डोळे विस्फारून पहात होतो.  ही सर्व साफसफाई होत असतांना तिथे एकही मनुष्य दिसत नव्हता. आमच्यापैकीही कुणी एकही शब्द उच्चारत नव्हते. आम्ही पुढे सरकताच दुसर्‍या गाडीने आमची जागा घेतली.

       व्हॅक्युम क्लीनरने गाडी आतून स्वच्छ करण्याची सोय होती. तसेच कार्पेटही धुता आली असती. पण हे काम ज्याचे त्याला करायचे होते. पण कार्ड स्वॅप करून पेमेंट केल्याशिवाय मशीन सुरू होणार नाही, अशी व्यवस्था असते.

       तसे पाहिले तर ही स्वयंचलित यंत्रणा ही यंत्र युगातली एक छोटीशीच किमया आहे. अशाच प्रकारचे स्वयंचलन (ऑटोमेशन) ठिकठिकाणी पहायला मिळते.

No comments:

Post a Comment