Tuesday, June 6, 2017

(१४)अमेरिकन नागरिक आणि मंदी

२६.५.२०१७ अमेरिकन नागरिक आणि मंदी (१४)
       सध्या अमेरिकेला भयानक मंदीने ग्रासले आहे. पण अशाही परिस्थितीत टिकून राहण्यासाठी येथील नागरिक काय आणि काय काय  करतात, ते माहीत करून घेण्यासारखे आहे.

       एका प्रध्यापक महाशयांची नोकरी मंदीमुळे गेली. पण मुळात ते तीन कामे करीत असत. आता दोन उरली आहेत. या कामांच्या भरवशावर त्यांचे व्यवस्थित सुरू आहे .

लँडस्केपिंग

       एक काम आहे, लँडस्केपिंगचे. इथे हिरवळ सर्वत्र आढळते. रस्ते आणि घरे सोडली तर उरलेली जागा एखाद्या भल्या मोठ्या मैदानासारखी असते  किंवा असेही म्हणता येईल की मोकळ्या मैदानात मधोमध भरपूर जागा सोडून घरे बांधलेली असतात. अनेक घरांना कंपाऊंड वॉल (कुंपण ) नसते. मोकळ्या जागेत हरळी किंवा नागमोथ्यासारखे (पण हरळी व नागमोथे नव्हेत) गवत वाढते . या गवताला खूप वाढ असल्यामुळे त्यांची सतत छाटणी करावी लागते . नाहीतर त्यांची उंची गुडघ्यापेक्षाही जास्त वाढते. छाटणीनंतर ही संपूर्ण जागा एखाद्या लॉन सारखी दिसते. या छाटणीला ’लँडस्केपिंग’ असे नाव आहे . एखाद्या ऑटोरिक्षासारखी तीन चाकी गाडी ’कटिंग मशीन’ लावून या गवतावर फिरवून ते कापतात. (आमच्या लहानपणी दर महिन्याला ’ झिरो मशीन ’ वापरून केस कापण्याचा कार्यक्रम उरकण्यासाठी आम्ही केस कापणार्‍याकडे जात असू .त्याची या निमित्ताने आठवण होते ). प्राध्यापक महाशय पूर्वी हे काम करून जास्तीचे पैसे मिळवीत होतेच. आता हाच व्यवसाय वाढविण्याचे त्यांनी ठरविले आहे .

मॉलची स्वच्छता

       मोठमोठ्या मॉल्सची स्वच्छता करण्याचे कामही हे प्राध्यापक महाशय फावल्या वेळी करीत असत. तशीच आणखी कामे मिळवून पैशाची गरज भागविण्याचे त्यांनी ठरविले आहे. नोकरी गेल्याची खंत आहे पण अगतिकता, निराशा यांचे नावही नाही .

खरीखुरी श्रमप्रतिष्ठा

       पुस्तकी श्रमप्रतिष्ठा इथे आढळली नाही. प्रत्येकजण कोणतेही काम करण्यास तयार असतो . एका बालक मंदिराची ’प्राचार्या’ सकाळी घरोघर पेपर टाकण्याचे काम करीत असते. या साठी ती फेरी मात्र कार मधून मारत असते. हे सांगण्यात तिला संकोच वाटत नाही .
आम्ही नुकतेच रहायला गेलो होतो. नातीला बालक मदिरात घालण्याच्या निमित्ताने तिची भेट घेतली असता आम्ही कुठे राहतो, असे विचारून, तुम्हाला पेपर हवा असल्यास सांगा, मी त्या भागात पेपर टाकायला जात असते, असे सांगितले. तिचे वय वर्ष ७० होते. सकाळी लवकर जाग येते. वेळ जात नाही, म्हणून ती हे काम करायची.      
    बेबी सिटिंग(मुले सांभाळणे), हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणे, थिएटरच्या दारावर उभे राहून तिकीटे पाहून आणि फाडून आत सोडणे ही आणि असली कामे इथे सर्व प्रकारचे लोक करीत असतात. आमच्या मुलाच्या एका साहेबाची बायको एका मॉलमध्ये बिले तयार करण्याचे काम करते यात तिला कमीपणा वाटत नाही. हे साहेबही आपल्या मित्रांना तिचा काऊंटर नंबर सांगून त्याच काऊंटरवर बिल तयार करून घेण्याचा विनंतीवजा आग्रह करतात. कारण जेवढी बिले जास्त फाडाल, तेवढी मिळकत जास्त असते. हे सांगण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही.या उलट आपल्या इथे तर साहेबाचा तोरा पहायलाच नको. तसेच अनेकदा साहेबापेक्षा त्याच्या बायकोचाच तोरा जास्त असतो. ’चहापेक्षा किटलीच गरम’, असा प्रकार तिथे आढळला नाही.

यांत्रिक युगाचा परिणाम

       लोकसंख्या आपल्या देशाच्या तुलनेत एकचतुर्थांश आणि भूविस्तार मात्र चौपट आहे. त्यामुळे माणसे कमी कामे फार अशी स्थिती इथे आहे. त्यामुळे यांत्रिकतेला पर्याय नाही. सर्वार्थाने यांत्रिक युगात वावरणार्‍या अमेरिकेत कोणतेही काम तसे हलके वाटत नाही. लोक कामे करण्यास उत्सुक असतात.

काही वेगळ्या आणि चांगल्या पद्धती

       पत्र टाकण्याच्या पेट्या इथे जगोजागी आढळत नाहीत. एखाद्या रस्त्याच्या कडेला लागून जर दहा घरे असतील तर, प्रत्येक घरासाठी एक पत्रपेटी घरांचे क्रमांक टाकून एका खांबाला लावलेल्या असतात. घरांना क्रमांक देण्याची पद्धत वेगळी वाटली. एका रांगेतील घरांना विषम क्रमांक (1,3,5,7,9) दिलेले असतात, तर त्यांच्या समोरच्या रांगेतील घरांना सम क्रमांक (2.4,6,8,10) दिलेले असतात. त्यामुळे घर क्रमांक ’एक’ नंतर घर क्रमांक ’तीन’ येते. ’एक’ आणि ’दोन’ क्रमांकांची घरे एकमेकासमोर असतात. पोस्टाची व्हॅन घेऊन येणारा ड्रायव्हरच या पेट्यांमध्ये ज्याची त्याची पत्रे टाकतो. आपल्या इथे मोठमोठ्या अपार्टमेंटस् मध्ये अशी सोय केलेली असते. फक्त एक मोठा फरक आढळला. आपली बाहेरगावी पाठवायची पत्रे जो तो ’आपल्या पेटीत’ ठेवून देतो. व्हॅनचा ड्रायव्हर तुम्हाला आलेली पत्रे तुमच्या पेटीत टाकतो आणि दुसर्‍याला पाठविण्यासाठी तुम्ही पेटीत ठेवलेली पत्रे जाताना सोबत घेऊन जातो.

       इथे बँका चेकबुके पुरवीत नाहीत.तुम्ही तुमचे चेकबुक छापून घेऊ शकता. अनेक लोक हौस म्हणून पाहिजे त्या डेकोरेशनची पाहिजे त्या रंगातली चेक बुके छापून घेतात. खाली कार्बन लावला तर चेकची प्रत तुमच्या संग्रही राहू शकते.

       पेट्रोल पंपावर सुद्धा जो तो आपल्या हाताने हवे तेवढा गॅस (पेट्रोल) भरून घेतो . आपल्याला हवे तेवढे पेट्रोल घेण्यासाठी कॉम्प्युटरवर ऑर्डर नोंदवायची. कार्ड ’स्वॅप’ करायचे आणि स्वत: टाकीचे कुलूप उघडून पंपाने पेट्रोल भरून घ्यायचे . पेट्रोल भरणार्‍याने पेट्रोल कमी भरले अशी शंकाच नको . आपल्याला हवे तेवढे पेट्रोल जो तो स्वत:च भरत असतो .

No comments:

Post a Comment