Tuesday, June 6, 2017

(६) जलविहार, पतंगीचा आनंद , रिक्षाचालकाच्या भूमिकेत आम्ही

२५.५.२०१७ प्रवास, जलविहार, पतंगीचा आनंद , रिक्षाचालकाच्या भूमिकेत आम्ही
(६)  
महाकाय इरी सरोवराच्या एका छोट्याशा उपांगामध्ये दि 31 जुलै 2009 ला शुक्रवारी आम्ही एका बोटीत बसून जलविहाराचा आनंद लुटला.
     इरी सरोवर 250 मैल लांब आणि 50 मैल रुंद असून त्याची महत्तम खोली 125 फुटापेक्षा जास्त आहे. ’प्रस्क आयल’ नावाचा या सरोवराचा एक कप्पा हा एक निमुळता हिस्सा आहे. तो सुद्धा काही मैल लांब रुंद आहे. त्यात मशीनवर चालणार्‍या बोटीतून किंवा शिडाच्या बोटीतून लोक जलविहार करतात.
     भाडे देऊन बोटीत बसायचे आणि निरनिराळ्या चिमुकल्या बंदरांच्या धक्क्यांवर एकेक थांबा घेऊन पुन्हा मूळ मुक्कामी परत यायचे. हा जलविहाराचा एक प्रकार आहे. याला फेरी (एफ इ आर आर वाय) असे म्हणतात.
     स्वत: मशीन बोट भाड्याने घ्यायची आणि स्वत: बोट हाकीत तुम्ही जलविहार करू शकता. स्वत:ची कार असावी तशी स्वत:ची मशीन बोट किंवा शिडाची बोट बाळगणारे हौशी व रसिक श्रीमंतही आहेत.
आमचा जलविहार
     आम्ही एका बोटीत बसून फेरफटका मारला. भरपूर फोटो काढले. बोटीत बसण्याचा अनुभव मुंबईलाही घेतला आहे . त्यावेळी बोटीत चढता उतरतांना तारांबळ उडाली होती. उतरतांना तर काठवर न येता पाण्यात पडतापडता वाचलो होतो. या निमित्ताने फेरीवाल्याच्या ’शिव्याही’ खाल्या होत्या. तसेच भोवतालच्या लोकांच्या चेहर्‍यावरचे चेष्टा आणि उपहासपूर्ण हास्यही अनुभवले होते. हा प्रसंग घडून आता अनेक वर्षे लोटली आहेत. पण आता आठवण झाली आणि तो प्रसंग नुकताच घडला आहे, असे वाटले.
     त्यामुळे ’यावेळी’ विशेष ’तयारीत’ होतो. पण या बोटीवरची चढण्या उतरण्याची व्यवस्था खूपच ’यूजर फ्रेंडली’ (वापर सुलभ) होती. त्यामुळे सरळ चालत गेलो आणि बोटीत चढलो आणि तसाच सुलभतेने किनार्‍यावर उतरलो.
     भाडे स्वीकारणे, प्रवाशांना बोटीवर चढण्या उतरण्यास मदत करणे, बोट हाकारणे ही सर्व कामे करण्यासाठी एकच खलाशी/ कप्तान होता.
     जलविहारात आमच्यासोबत इतर प्रवासीही होते. या सर्व महिला होत्या. बहुतेक महिलांनी ’इतरांच्या लज्जा रक्षणापुरती’ (म्हणजे इतरांना लाज वाटू नये म्हणून) किंवा लज्जेची ऐशीतैशी करणारे कपडे घातले होते. त्यांचा मनमोकळा आणि दिलखुलास हास्यविनोद चालू  होता. मध्येच कुणीतरी आमची चौकशी केली. आम्ही सर्व ’इंडियन’ असून आम्ही दोघे इंडियात असतो, ही माहिती त्यांना मिळाली तेव्हा कोणतीही अनुकूल/प्रतिकूल  प्रतिक्रिया त्यांच्या चेहर्‍यावर दिसली नाही.
      अनुषा मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. आजी आजोबांसोबत तिचे बागडणे चालूच होते. तिचे बागडणे कॅमेर्‍यात साठवून ठेवण्याचे काम नीलम नियमितपणे करीत  होती.
     अनुषा मध्येच खलाशाशी/ कॅप्टनशी बोलायला गेली. नाव पुरेशी भरली आहे (प्रवाशांनी) तेव्हा आता फार न थांबता बोट सुरू करण्यास सुरवात करा, असे सांगून ती परतली. आपल्या बोलण्याने, बोलतांनाच्या उचित चढउतारामुळे ती नेहमी लोकांचे लक्ष वेधून घेत असते. हे बघून मला रेडिओवर ’नाटकं’ करणार्‍या आजीचा वारसा ती पुढे चालवील, असा विश्‍वास वाटतो. तशी आजी नातीमध्ये इतरही बरीच साम्ये आहेत, पण त्यांचा उल्लेख विस्तारभयास्तव (की आणखी कोणत्या तरी भयास्तव! ) करीत नाही.
     स्वत: चालविण्यासाठी दिनांक एक ऑगस्टला आम्ही एक मशीन बोट ’हायर’ केली. अजू बोट चालवीत होता. पण सरोवरात खूप लाटा उसळत होत्या. त्यामुळे लगेच परतलो. सकाळी लाटा फारशा नसतात. तेव्हा ’पुन्हा या’ आणि ’याच भाड्यात सहलीचा आनंद घ्या’, असा वरकरणी प्रेमाचा सल्ला ऐकून (म्हणजे भाडे परत मिळणार नाही, हे गोड शब्दात व्यापारी पद्धतीने सांगीतलेले ऐकून)   आणि याबद्दल ’मनापासून’ धन्यवाद देऊन  आम्ही  परतलो!
सत्तर वर्षानंतर उडविली पतंग
     पुढे ’बीच’वर आलो. या किनार्‍यावर फारशी वर्दळ नव्हती.  तिथे मी, अजू आणि ओम्कारने ’पतंगी’ उडवल्या. जवळजवळ सत्तर वर्षांनी मी पतंग खेळण्यासाठी उभा राहिलो होतो. अमेरिकन पतंग वेगळी असते, कागदाऐवजी प्लॅस्टिकचा वापर ,  हा एक महत्त्वाचा फरक असल्यामुळे पतंग फाटण्याची भीती नसते. पतंगाची उभी काडी प्लॅस्टिकचीच असते. ’आडवे धनुष्यही’ प्लॅस्टिकच्या दोन काड्यांचेच असते. त्या एका कनेक्टरने जोडलेल्या असतात. जिथे ’सुत्तर’ असते, तिथेच हा जोड असतो. त्यामुळे पतंगीची घडी करून ठेवता येते. काड्या तासण्यात आणि धनुष्याच्या काडीचा समतोल साधण्यासाठी करण्यात लहानपणी आमचे तासन्तास जात असत. शिवाय धनुष्याचा ताण कायम राहिला पाहिजे , ही सुद्धा एक महत्त्वाची अट असे. काड्या प्लॅस्टिकच्या असल्यामुळे वजन, माप, लांबी, रुंदी यात केमिकल बॅलन्स आणि व्हर्निअर स्क्रू ने यावा असा एकसारखेपणा होता. पतंगीला जवळजवळ तीन मीटर लांबीचे दुहेरी शेपूट असते. ते घडी करून रबर बँड लावून ते नीट ’फोल्ड’ करता येते. पतंगीच्या काड्या समतोल झाल्या नाहीत तर ती ’गोता’ खाते. त्यामुळे या काड्या ’जमल्या’ नाहीत तर पतंग गोता खाते. त्यामुळे हे कौशल्याचे काम होते. हे कौशल्य असणारी मुले खूप भाव खात असत. आम्हा भावंडात बंडूकाकांना हे कौशल्य साध्य झाले होते. त्यांनी तयार केलेल्या पतंगीला ,पतंग उडविणारा, हव्यात्या दिशेने ’गोता’ देऊ शकत असे. काटाकाटीत अशी पतंग खूप महत्त्वाची मानली जायची. कारण तिला हवा तसा ’गोता’ देता यायचा. अशी पतंग आणि ’चांगला मांजा’ जमला असेल तर तो वीर अजिंक्य ठरत असे.
     शेपटीमुळे पतंगीला स्थैर्य आले होते. बीचवर भरपूर वारा वाहत होता. आकाश मोकळे होते. त्यामुळे दोरा अडकण्याची भीती नव्हती. त्यामुळे पतंगी व्यवस्थित  उडत होेत्या.
रिक्षावाल्याच्या भूमिकेत आम्ही
     नंतर आम्ही चार चाकी रिक्षा चालविली. एका ’दुकानात’ अशा आठ/दहा रिक्षा होत्या. त्या भाड्याने घ्यायच्या आणि सगळ्यांनी मिळून ती चार चाकी रिक्षा चालवीत ’दोन मैलांचा फेरफटका होईल’, अशी लंबवर्तुळाकृती ’सहल’ करून आरंभस्थानी परत यायचे, असा तो खेळाचा प्रकार होता. अजित, मी, ओम्कार आणि नीलम असे चौघे जण ’पायडलिंग’ करीत रिक्षा चालवीत होतो. समोरच्या खुर्चीत बसून अनुषा दोरी ओढून घंटी वाजवीत होती.(बसमध्ये कंडक्टर वाजवतो तशी घंटी) सौ पुष्पा माझ्या आणि ओम्कारच्या मध्ये शक्य तेवढे अंग चोरून बसली होती. तीच कायती एकटी ’सवारी’ होती. इतर आम्ही चौघे रिक्षा ओढीत (पायडलिंग करीत) होतो.
’हाय आणि हाय हाय’
     रिक्षा चालविणार्‍याला किती कष्ट पडत असतील ते लगेच जाणवू लागले. काहीजण (आमच्यासारखे रिक्षाचालक वीर) आम्हाला ’ओव्हर टेक’ करून जात होते. तर काही आमच्या रस्त्याला समांतर असलेल्या परतवाटेने (लेन) परत येऊन ’लंब वर्तुळ पूर्ण’  करीत होते. ’लक्ष्यपूर्तीचा’ आनंद त्यांच्या चेहर्‍यावर झळकत होता. त्यामुळे त्यांची झालेली दमछाक त्यांना आणि त्यांना भेटणार्‍या इतर ’खेळाडूंना’ जाणवत नव्हती. बहुतेक खेळाडू आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेले. समोरून येणारे आणि ओलांडून जाणारे सगळे आम्हाला ’हाय’ म्हणत होते. आमच्या तोंडून मात्र उत्तरादाखल ’हाय हाय’ बाहेर पडत होते. पुढेपुढे आमची ’हाय हाय अवस्था’ येणार्‍या जाणार्‍यांच्याही लक्षात येऊ लागली असावी, कारण काही लोक ’और जोरसे’,’आणखी पायडल मारा’, म्हणून आमचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करू लागले. ’काहीजण आता फार अंतर राहिले नाही’, असे म्हणून आम्हाला धीर देत होते. बहुतेकांनी आम्हाला ओव्हर टेक केले होते. ते परतीच्या वाटेवर समोरून येताना, ’ज्यांना आपण ओव्हर टेक केले तेच हे असून अजून मागेच रेंगाळले आहेत’, हे पाहून मिस्किलपणे हसत क्राॅस होत होते. शेवटी वर्तुळ पूर्ण करून आरंभस्थानी परत येण्याचा बेत आम्ही रद्द केला आणि बहुतेकांची नजर चुकवून सोयीस्कर ठिकाणी ’अबाऊट टर्न’ केले आणि ’आल्यामार्गी ’ परतीची वाट पकडली. पण जवळजवळ निम्मे अंतर आम्ही पार केले होते. त्यामुळे एकूण अंतर तेवढेच होते. पण परत फिरतांना सुरवातीला दिसलेल्या वाटेतल्या खुणा दिसत होत्या. त्यामुळे ’आता थोडेसेच जायचे राहिले आहे’, असे म्हणत आम्ही एकमेकांना धीर देत होतो. शेवटी एकदाचे आंरभस्थान आले आणि आम्ही ’ती रिक्षा’ पूर्ण भाडे भरून परत केली .
पिझ्झ्यावर मनसोक्त ताव मारला
     परत येतांना आम्ही ’पिझ्झा बफेला’ भेट दिली.ठराविक रक्कम भरून हवे तेवढे आणि निरनिराळ्या प्रकारचे ’पिझ्झे’ खाण्याची सोय या ’बफे’ मध्ये होती. हव्या त्या प्रकारचे हवे तेवढे ’पिझ्झे’ स्वहस्ते घेऊन आम्ही त्याच्यावर ताव मारला. कारण रिक्षा चालवून झालेल्या दमछाकीनंतर सपाटून भूक लागली होती. सोबत आपले आपण ’सॅलड’ बनविण्यासाठी ’अनंत घटक’ निनिराळ्या भांड्यात ठेवले होते. जो तो आपल्या आवडीनुसार सॅलड तयार करून घेत होता. आणि ’पिझ्झ्याची गोडी’ वाढवीत होता.
थकला नाही तो नातू
     घरी आल्यानंतर भूक नसल्यामुळे जेवणाचा कार्यक्रम बाद केला. अजित आणि नीलम यांना रिक्षा चालविण्याचे ’खरे कष्ट’ घ्यावे लागले होते. त्यामुळे त्यांनी लवकरच माघार घेतली. नंतर आजी, आजोबा आणि नातू ’कटथ्रोट’ पद्धतीचा ब्रिज खेळले. शेवटी आजी आजोबांनाही झोपेने घेरले. ओम्कार मात्र झोपायला तयार नव्हता. त्याला मोठ्या मुष्किलीने राजी करून आम्ही जे झोपलो ते दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजताच जागे झालो, दुसर्‍या दिवसाच्या कर्यक्रमात स्वत:ला झोकून देण्यासाठी.


No comments:

Post a Comment