Tuesday, June 6, 2017

( ४)प्रवास - पहिल्या आठवड्यातील अनुभवांचे सार

२५.५.२०१७( ४)प्रवास - पहिल्या आठवड्यातील अनुभवांचे सार
इरी
   
अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील इरी हे गाव इरी सरोवराच्या काठावर  वसलेले एक छोटेसे गाव आहे. तिथल्या जी ई ट्रान्सपोर्टेशन हया कारखान्यात माझा मुलगा अजित इंजिनिअरच्या पदावर काम करीत असल्यामुळे आम्हा उभयतांचा पंधरा जून ते पंधरा सप्टेंबर 2009 या काळात या गावी होता.
पाच समुद्रकाय सरोवरे
     ह्यूरॉन,आँटोरियो, मिशीगन,इरी,आणि सुपिरिअर ही समुद्रकाय सरोवरे अमेरिकेच्या उत्तरेला आहेत. शाळेत भूगोलाचा अभ्यास करतांना ही नावे पाठ केली होती. ही सरोवरे एवढी मोठी आहेत, की समुद्रमार्गे येणार्‍या पहिल्या प्रवाशांना हे समुद्रच आहेत, असे वाटले. पण कुणीतरी पाय घसरून पाण्यात पडला ,त्याच्या नाकातोंडात पाणी गेले , सर्वत्र एकच गडबड उडाली. तेवढ्यातच तो म्हणाला (नव्हे ओरडलाच), ’ ह्या पाण्याची चव गोड आहे, हे सरोवर आहे.’ सुपिरिअर हे सरोवर सर्वात मोठे आहे, तर ऑन्टोरियो सर्वात लहान आहे. पण तरीही कोणत्याही सरोवराच्या काठाशी उभे राहिल्यास पलीकडचा किनारा दिसत नाही.
खवैय्यांची खासीयत
     हिवाळ्यात ही सरोवरे गोठतात. या काळात यावरून मोटारी धावत असतात.पण बर्फाचा थर चांगलाच जाड असतो, त्यामुळे बर्फ खचून जलसमाधी मिळण्याची शक्यता नसते. मासे खाणारे खास शौकीन लोक सरोवराला मधेच कुठेरती छिद्र पाडतात. बर्फाखालच्या पाण्यात गळ टाकून मासे पकडतात आणि आपली मासे खाण्याची हौस भागवतात. हे मासे विशेष चवदार असतात, असे म्हणतात.
असे रस्ते,अशा वसत्या आणि अशी घरे
     इरी गाव इरी सरोवराच्या काठावर त्याच्या कुशीत वसलेले आहे. सर्वत्र हिरवळ आणि वृक्ष आहेत. रस्ते, घरे आणि दुकाने यामुळे जंगलातला हा भाग वेगळा उठून दिसतो. चार/सहा पदरी रस्त्यांच्या समांतर आणि आखीव सरळ रेषा  या जंगलावर नीटसपणे रेखलेल्या दिसतात. घरे फार्म हाऊस सारखी वाटतात.पाचपन्नास घरे एका हिरवळीवर दोन घरांमध्ये भरपूर जागा राखून बांधलेली असतात. या घरांना कुंपण (कंपाउंड वॉल्स) नसतात.
     बहुतेक जुनी घरे लाकडाची बांधलेली असतात. विटा,सिमेंट, रेती यांचा मागमूसही या घरांमध्ये आढळत नाही. आमचे घर भाड्याचे आहे. या घराला बेसमेंट म्हणजे तळघर आहे. ते मूळ घराइतकेच मोठे आहे. भूसपाटीला लागून असलेल्या मजल्यावर स्वयंपाकघर आहे. वरच्या मजल्यावर बेसमेंट आणि भूसपाटीवरच्या मजल्याइतकीच जागा आहे. या मजल्यावर दोन बेडरूम्स आहेत. घर पूर्णपणे फर्निश्ड (सुसज्ज) असून संपूर्ण घराला ए सी लावलेला आहे. रस्त्यावर हिवाळ्यात दोनचार फूट बर्फाचा थर बसतो. रस्ता कोणता आणि हिरवळ कोणती ते कळत नाही. रस्त्याची रुंदी दाखवणार्‍या काठ्या ठिकठिकाणी लावलेल्या असतात.
     बांबूच्या घराचे वर्णन असलेले गाणे एका सिनेमात आहे.ते मधूनमधून ऐकण्याचा योग येतो. तशी ही घरे लाकडाची आहेत.एका दाणगट मुलाने भिंतीवर जोरात लाथ मारली तर भिंतीला भगदाड पडले आणि त्यात त्याचा पाय अडकून बसला. ही कथा इकडे खूप लोकप्रिय आहे.
रात्रीचे जेवण सूर्यप्रकाशात
     जून महिन्यात येथे सूर्योदय सकाळी पावणे सहाला होतो. सूर्यास्त रात्री नऊला होतो. कारण हा भाग उत्तर धृवाजवळ आहे.  त्यामुळे सूर्यप्रकाश पंधरा तास असतो. त्यामुळे ’दिवस’ आहे की ’रात्र’ झाली हे घड्याळ पाहूनच ठरते. म्हणून  आमचे रात्री आठचे जेवण सुद्धा सूर्यप्रकाशात होत असे.
अमेरिकेतील जनसामान्य
     दिनांक 16 जूनला रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी मुंबईहून काँटिनेंटल कंपनीच्या विमानाने निघून जवळजवळ 15 तासांनी नेवार्कला पोचलो. तिथून क्लीव्हलंडला विमानाने दोन तासांचा प्रवास करायचा होता. ते विमान उशीरा सुटले. विमान थांबले तेव्हा ’आलं का क्लीव्हलंड ?’,असा प्रश्‍न सहप्रवाशांना तसेच विमानातील कर्मचार्‍यांना विचारून खातरजमा करून घेतली आणि ’खाली’ उतरलो ( ते विमान क्लीव्हलंडलाच जाणारे होते). अजित (मुलगा) आणि ओम्कार (नातू), धाकट्या अनुषाला (नातीला) मोठ्या शिताफीने चुकवून एअरपोर्टवर आले होते.मोटारीत बसून दोन तासांनी आम्ही घरी पोचलो.
विमान कंपनीचा फंडा
     काँटिनेंटल विमान कंपनीचे विमान शाही थाटाचे वाटले. आपल्या ’इंडिगो’मध्ये जा ये करण्यासाठी मध्ये मोकळी पट्टी असलेल्या तीन तीनच्या दोन रांगा असतात. या विमानात असे चार (सर) सेटस होते. ’हवाई सुंदर्‍या’ सुंदर नव्हत्या.तसेच त्या मध्यम वयाच्या होत्या. त्यामानाने ’इंडिगो’ मधल्या सुंदर्‍या वीसपेक्षा जास्त वयाच्या नसाव्यात. पण सौंदर्य आणि वयामील उणीव त्या आस्था,आदब,आणि तत्परता दाखवून भरून काढीत होत्या.अजित काँटिनेंटलचा नित्य प्रवासी असल्यामुळे त्याने दरवेळी प्रवास केल्यानंतर भावी प्रवासासाठी मोफत देऊ केलेले ’प्रवासी तास’ साठवून ठेवले होते. ते वापरून भाड्यात काही बचत त्याने केली होती. एवढा मोठा प्रवास करून येणार्‍या प्रवाशांना अमेरिकेत पोचल्यानंतर आणखी आत कुठे जायचे असेल तर (डोमेस्टिक फ्लाईट) ही कंपनी वेगळे भाडे न आकारता प्रवाशांना त्यांच्या अंतिम मुक्काम स्थळाच्या जवळच्या गावी नेऊन सोडते. तिथून जो तो आपापल्या मुक्कामी कारने जातो. तसे आम्ही घरी आलो.
एकच चिंता - कस्टम, कस्टम, कस्टम
     अमेरिकेतील कस्टम खाते अतिशय कडक आणि चोख असून  ’सामानाची कसून तपासणी करतात’. येथपासून काही होत नाही.सरळदडपून वाटेल ते घेऊन जा’, असे विविध प्रकारचे मौलिक ’सल्ले’ ऐकून होतो. त्यामुळे कस्टमचे केवळ तोंड पाहूनच सुटका झालेली पाहून हायसे वाटले. यावर ’सज्जन’(बावळट) आणि ’बनेल’ यातला फरक अमेरिकेतील कस्टम अधिकार्‍यांना सुद्धा कळत असावा, असे मत सौ पुष्पाने (पत्नी) व्यक्त केल्यानंतर  सामानाची निवड करतांना घेतलेल्या खबरदारीबद्दल मला वाटणारा अभिमान गळून पडला.
फिरते जिने टाळले
     आमच्या अगोदरच सामान विमानतळावरून बाहेर आले होते. आम्ही ’फिरत्या जिन्याने’ न येता पायर्‍या उतरून खाली उतरत होतो. ’हे कोण नवीन’, असा भाव अमेरिकन लोकांच्या चेहर्‍यावर दिसत होता.पण गालातल्या गालात स्त:शीच हसण्याव्यतिरिक्त वेगळी प्रगट प्रतिक्रिया त्यांच्या चेहर्‍यावर दिसली नाही. ओम्कारने सामान अचुक ओळखले होते. तेवढ्यातच आम्ही जिना उतरून खाली आलो. ’लिफ्ट होते की’, असे अजित म्हणाला. हे ऐकून सौ पुष्पाने एक कटाक्ष माझ्याकडे टाकला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी पुढच्या तयारीला लागायचे ठरविले. तेवढ्यात अजित गाडी घेऊन आलाच.
क्लच नसलेली इंपाला गाडी,मार्गदर्शन आणि रहदारीचे नियम
     आमची ’इंपाला’ गाडी होती. गाडीला वेगळा ’क्लच’ नव्हता.वेग जसजसा कमी जास्त होई तसतसे गिअर आपोआप पडत होते. ’इंपाला’ हे नाव ऐकताच कै आचार्य प्र के अत्रे यांची आठवण झाली. ते विधान सभागृहाचे सदस्य होते, तेव्हाची म्हणजे निदान तीस/पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. त्यांनी त्यावेळी ’इंपाला’ ही विदेशी बनावटीची गाडी विकत घेतली होती. ही गाडी अगदी ’पॉश’ समजली जायची. मंत्र्यांच्या ’अँबॅसेडर’ गाड्या या गाडीच्या तुलनेत अगदी फिक्क्या वाटायच्या. विधान सभागृहाच्या कंपाऊंडच्या आत शिरणार्‍या प्रत्येक गाडीला तपासणीसाठी थांबावे लागत असे. गंमत म्हणून अत्र्यांनी ड्रायव्हरला गाडी फाटकात न थांबवता तशीच पुढे नेण्यास सांगीतले. कुणातरी ’खास’ माणसाची ’खास’ गाडी असावी, असे वाटून दारावरच्या तपासनिसांनी त्यांना हटकले नाही. दुसर्‍या दिवशीच्या वृत्तपत्रात ही बातमी चौकटीत छापून आली होती. याच गाडीने आता ’आम्ही’ जात होतो. शिवाय हया गाडीत आता आणखी सुधारणा झाल्या होत्या. ती ’क्लचलेस’ झाली होती आणि सामान्यांच्या आटोक्यात आली होती.
     गाडीत ’ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम’ची(जी पी एस)होती. ’आता उजवीकडे  वळून दोन मै उजवीकडे जा.नंतर डावीकडे वळा’ अशा सार‘या सूचना मिळत होत्या. अगोदर मुक्कामाची कमांड दिली की हे यंत्र मार्गदर्शक म्हणून वेळोवेळी सूचना देते. मिळणार्‍या सूचनांचे पालन करीत गाडी हाकीत आम्ही घराच्या दिशेने निघालो.दुतर्फा मोटारींची तशी आठ/आठ चाकी ट्रक्स धावत होत्या. पण कुणीही हॉर्न वाजवीत नव्हते. (हॉर्न वाजविणे हे शिव्या देण्यासारखे मानले जाते, असे कळले.) रस्त्यावर कुठेही पोलीस दिसत नव्हते. सिग्नल चालूबंद होत होते. प्रत्येकजण त्याबरहुकूम ’चालला’ होता. घरी येईपर्यंत एकही पादचारी दिसला नाही. दिसत होत्या फक्त सुसाट वेगाने पण मुकाटपणे धावणार्‍या ट्रक्स किंवा मोटारी . चौपदरी रस्त्यावर त्या आपापल्या ’लेनमधून’ धावत होत्या. (दिलेल्या वेगमर्यादेपेक्षा कमी वेगाने गेलेलेही इथे चालत नाही.) रस्त्यावर ठिकठिकाणी लावलेल्या फलकांवरील सूचनांचे पालन होत होते. ’लेफ्ट हँड ड्राइव्ह’ असलेल्या गाड्या पाहून सुरवातीला ’बुचकळल्यासारखे’ वाटत होते पण त्याची नंतर सवय झाली. रहदारीचे नियम वेगळे (म्हणजे आपल्या जवळजवळ अगदी उलट आहेत), हे लक्षात यायला वेळ लागला.
भारतीय गृहिणी या राजकन्या
सुनबाईची (सौ नीलम) शेजारीच राहते. तिचे नाव ’केली’ असे आहे. तिला तीन मुले आहेत. तिच्या पाठीच्या कण्याच्या आठ शस्त्रक्रिया व्हायच्या आहेत. त्यापैकी पाच/सहा झाली आहेत. दर शस्त्रक्रियेच्या वेळी तिची मुले आमच्या घरी असतात. शस्त्रक्रिया आटोपली की दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी ती घरी परत येते आणि स्वत:ला कामाला जुंपून घेते. इथे घरगडी, मोलकरणी नाहीत. धुणीभांडी, स्वयपाकपाणी सर्व घरच्याघरी असते. नाही म्हणायला, अर्धे तयार अन्नपदार्थ, ब्रेडसारखे पदार्थ विकत विकत मिळतात. ते शिजवले, उकडले, भाजले की जेवण तयार होत असल्याने गृहिणींची सोय होत असते, हे खरे आहे. धुणीभांडी करायला यंत्रे सज्ज असतात. वीजपुरवठा कधीच खंडित होत नाही. बहुतेक नवरे कामावरून घरी परत आल्यानंतर बायकोला घरकामात मदत करतात. पण तरीही इथल्या गृहिणी घरकाम व बाजारहाट करण्यात सतत गुंतलेल्या असतात. त्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम आखून कारनेच जावे लागते. समोरच वाण्याचे दुकान आहे, असा प्रकार नाही. त्यामुळे त्यांना भारतीय गृहिणींचा हेवा वाटतो. घरकाम, धुणीभांडी, स्वयपाक करायला  नोकर असलेल्या भारतीय गृहिणींची तुलना त्या ’राजकन्यांशी’ करतात. दिवसभर या काय काम करीत असतात, त्या आपला वेळ कसा घालवतात, असे प्रश्‍न त्यांना पडलेले असतात. भारतीय गृहिणींची कैफियत त्यांच्यासमोर मांडण्याचा विचार ’भारतीय गृहिणीवर्गाने’ केला आहे.
अर्थयुक्त हिंदु नावांचे आगळेपण
     ’केलीचा’(सुनबाईची मैत्रीण) घटस्फोट झालेला आहे. पण तिचे आपल्या नवर्‍याशी फोनवर हसणे, बोलणे, एवढेच नव्हे तर खिदळणे सुद्धा सुरूच आहे. या गोष्टीचा तिच्या आईला खूप राग येतो. ’ही भोळी याने तिला फशी पाडले, घटस्फोटापर्यंत पाळी आली, तरी हसणे खिदळणे सुरूच आहे’, हे पाहून ती खूपच चिडते . ’सगळे जावई हरामखोर असतात’, असे येथील यश्‍चयावत सासवांचे पक्के मत असते, असे ऐकतो. (भारतीय सासवांना आपल्या जावयांचे खूप कौतुक असते, असे माझे मत असून ते अजूनही कायम आहे.)
’कशमाचा’ अर्थ काय?
     केलीने हिंदु धर्म स्वीकारला आहे. आम्ही तिच्यासाठी भारतातून रुद्राक्षाची माळ आणली आहे. असे असले तरी तिची मुले मात्र ख्रिश्‍चनच आहेत. वसंत, अजित, पुष्पा, अजित, नीलम, ओम्कार, अनुषा या आमच्या नावांना अर्थ आहे, एवढेच नव्हे तर प्रत्येक हिंदु नावाला अर्थ असतो, असे कळल्यानंतर केलीने ’माझ्या’ (म्हणजे तिच्या)  ’कशमा’ या हिंदु नावाला अर्थ काय आहे, असे विचारले. आम्हालाही या शब्दाचा अर्थ कळेना. शेवटी तिने आपल्या नावाचे स्पेलिंग सांगितले आणि खुलासा झाला . ’के-एस-एच-ए-एम- ए ’हे तिच्या नावाचे स्पेलिंग ऐकल्यावर तिचे नाव ’क्षमा’ आहे, हे कळले आणि आमच्या अक्षम्य चुकीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली. दया, क्षमा, शांती, हे शब्द त्यांच्या अर्थासह आणि त्यांच्या मागच्या संकल्पनेसह  नीलमने तिला समजावून सांगितले.
हिंदु धर्माबद्दल उत्सुकता
     हिंदु धर्माबद्दल उत्सुकता असलेली माणसे अमेरिकेत खूप आहेत. त्यांनी हिंदु धर्माबद्दल अनेक प्रश्‍न मुलाला आणि सुनेला विचारले आहेत. देवांची संख्या तेहतीस कोटी आहे, हे ऐकून ते आश्‍चर्यचकित होतात. ’हे देव’, ’तसे देव’ नसून तुमच्याकडच्या ’सेंटस’प्रमाणे (संतांप्रमाणे) आहेत, असे आम्ही त्यांना सांगीतले. ’ब्रह्मा’ हा निर्मिती करणारा देव, ’विष्णू’ हा पालन कर्ता देव आणि ’शिव’ हा संहारक देव , असे स्पष्टीकरण ऐकल्यावर ,’देव संहारक कसा असू शकतो’, हे कोडे त्यांना उलगडत नाही. उत्पत्ती, स्थिती इतकेच लयालाही महत्त्व आहे, हे त्यांना समजावून सांगावे लागते. जुन्याच्या विनाशाशिवाय नव्याची निर्मिती होणार नाही,हे कळायला आणि सृष्टीचा हा नियम समजायला त्यांना कष्ट पडतात.
’मी हे वाचले आहे, तुम्ही?’
     ’आम्ही हिंदु आहोत’, हे कळल्यावर एका अमेरिकन महिलेने आठ, दहा स्वामींची आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांची नावे घडाघड म्हणून दाखविली आणि ’यातले’ तुम्ही काय वाचले आहे, असा प्रश्‍न केल्याचे मुलाने सांगीतले. यावर यातील शिकवणुकीनुसार आम्ही हिंदु आपले जीवन जगत असतो, त्यामुळे ही पुस्तके वाचण्याची वेळ आली नाही किंवा आवश्यकताही पडली नाही, असे सांगून मुलाने वेळ मारून नेली. ऋग्वेदावर पीएच डी करणारा एक विद्यार्थी या विषयी चर्चा करण्यासाठी आला होता, असेही त्याने सांगितले.
     पहिल्या आठवड्यातील अनुभवांचे हे सार आहे, ’देखते है आगे आगे होता है क्या?’


No comments:

Post a Comment