Tuesday, June 27, 2017

(१५) व्यक्तिचित्रे

एका अफलातून अवलियाची अफलातून  कल्पना
        अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील याॅर्क शहराच्याजवळच जोड्याच्या आकाराची इमारत आहे.जोड्याच्या आकाराचेशू हाउसही एक अजब कमाल आहे. याची रचना करणारा एक अवलियाच म्हटला पाहिजे. याची बांधणी कर्नल मालोन हेन्स याने केली आहे. याचा पादत्राणे तयार करण्याचा व्यवसाय होता. माणूस हाडाचाबेपारीहोता. या व्यवसायातला तो बादशहा (विझार्ड) मानला जातो. निरनिराळ्या ठिकाणी त्याची चाळीस दुकानांची मालिका होती. आपल्या इथे आमची कुठेही शाखा नाही, अशी जाहिरात आपण पाहिली असेल. 'आमची शाखा कुठे नाही?', असा जणू याचा सवाल असे. आपली आणि आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी व्हावी म्हणून त्याने  चक्क जोड्याच्या आकारचेशू हाउसबांधले आहे. ४८ फूट लांब, १७ फूट रुंद आणि २५ फूट उंचीचे हे पादत्राणगृह हेन्सने १९४८ साली बांधले. बांधकामात लाकडाचा उपयोग मुख्यत: करण्यात आला असून आवश्यक तिथे तारा आणि सिमेंटचा वापर मजबुतीसाठी केला आहे. यात तीन बेड रूम्स, दोन बाथ रूम्स एक किचन आणि लिव्हिंग रूम आहे..
     सुरवातीला हेन्स वयस्कर दाम्पत्याला यागेस्ट हाउसमध्येरहायला बोलवी. त्यांची राजेशाही बडदास्त ठेवी. जातांना त्यांना कपडेलत्ते देऊन त्यांची बोळवण करी. पुढे तो हेगेस्ट हाउसमधुचंद्राला येणाऱ्या जोडप्यांना देऊ लागला. हेन्सच्या आरोग्यविषयक सवयी वाखाणण्यासारख्या होत्या. तो स्वत: निर्व्यसनी तर होताच पण धुम्रपानविरोधी मोहीम सुरु होण्या अगोदारपासूनच त्याचा धुम्रपानाला विरोध होता. रस्त्याने  कोणी सिगरेट ओढत जाताना दिसला तर तो त्याच्या तोंडातील सिगरेट काढून घेई. त्याने सिगरेट पिणे सोडल्यास त्याला पैसे देऊ करी. त्याने जसा भरभरून पैसा मिळवला तसाच तो वाटून टाकला. ‘मी या जगात निष्कांचन अवस्थेत जन्माला आलो आहे, निष्कांचन अवस्थेतच जगाचा निरोप घेईन’, असे तो म्हणत असे. हे ऐकले की, ‘मुठ्ठी बांधके आये हो,(मूल जन्माला येत तेव्हा त्याच्या मुठी आवळलेल्या असतात), हाथ पसारे जावोगे’, या (बहुदा) महात्मा  कबीराच्या दोह्यातील पंक्तीची आठवण होते.असो. आज हेशू हाऊसएक पर्यटन स्थळ झाले आहे. ते व्यापारी तत्त्वावर भाड्याने मिळते. नुकताच या वास्तूत एक कार्यक्रम आयोजित झाला. बाल साहित्याचा एक लेखक आपले पुस्तक विकत घेऊन येणाय्रा बाल वाचकाला त्या पुस्तकावर स्वाक्षरी देणार आहे. बालगोपाल मंडळी आणि त्यांचे पालक यांना अनुक्रमे खाऊ आणि चहा ( नव्हे कॅाफी) फराळासाठीही थांबवून घेणार आहेत
                               अमेरिकन स्त्रीचे हिंदू नाव

     नीलमच्या ओळखीची एक अमेरिकन स्त्री आहे. ती व्यवसायाने नर्स असून घटस्फोटिता आहे. तिने बहुदा इस्कॅान फाऊंडेशन किंवा चिन्मय मिशनच्या सहकार्याने हिंदू धर्म स्वीकारला आहे. तिला आम्ही हिंदुस्थानातून रुद्राक्षाची माळ भेट म्हणून दिली होती. धर्म परिवर्तनानंतर तिने आपले मूळचे 'केली' हे नाव बदलून हिंदू नाव स्वीकारले होते. पण तिची एक खूप मोठी अडचण होती. तिला आपले नाव उच्चारताच येत नसे. तिचे जुने परिचित आप्तेष्ट तिला जुन्याच 'केली' या नावाने हाक मारीत. पण आपल्या नवीन नावाचा आपल्याला उच्चारही करता येऊ नये, याचे तिला सारखे वैषम्य वाटत असे. तिच्या गुरूने तिला एकदा तिचे नाव कसे उच्चारायचे ते सांगितलेही होते. पण ते ती विसरून गेली होती. तिला दुसरीही एक गोष्ट माहीत होती ती ही की, प्रत्येक हिंदू नावाला अर्थ असतो. आपल्या नावाचा अर्थ काय आहे हेही तिला जाणून घ्यायचे होते. गुरू आता बरेच दूर राहत असल्यामुळे भेटी होत नव्हत्या. त्यामुळे तो मार्ग खुंटला होता.
   आम्ही भारतीय म्हणून तिने आम्हाला तिचे नाव कसे उच्चारायचे आणि त्याचा अर्थ काय ते विचारले. तिने तिचे नाव आपल्या परीने उच्चारूनही दाखविले पण आम्हालाही काही बोध होईना. 'कशमा' असा काहीसा उच्चार ती करीत होती. तोही तिला धड उच्चारता येत नव्हता. बराच वेळ विचार केल्यानंतर आम्हाला एक कल्पना सुचली. तुझ्या नावाचे स्पेलिंग करून सांगता येईल का, असे विचारताच तिने पटकन स्पेलिंग लिहून दाखविले. ते होते 'के एस एच एम '.  'क्षमा' आम्ही चटकन ओळखले. पण तिला हा शब्दच उच्चारता येत नव्हता. त्यावर उपाय म्हणून जिभेला बरीच वेडीवाकडी वळणे देत तिने प्रयत्न चालवला होता. 'क्ष' या अक्षराचा उच्चार तिला काही करता येईना. शेवटी तो नाद तिने सोडला. 'ते जाऊ द्या', पण याचा अर्थ काय? आम्ही आपल्या परीने तिला दया, क्षमा, शांती या तत्त्वत्रयींचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. हे मात्र तिला कळले. काही संकल्पनांना देशकालाचे बंधन नसते, हे या निमित्ताने जाणवले.
अमेरिकन सासू
नीलमची मैत्रीण 'केली' हिचा घटस्फोट झाला आहे. तरीही तिचे आपल्या नवय्राशी अधूनमधून फोनवर बोलणे खिदळणे चालू असते. हे पाहून केलीची आई खूप चिडते, चडफडते. भांडणं तर होतच होती. आता घटस्फोटापर्यंत पाळी आली तरी हसणं खिदळणं सुरूच आहे. मझाझी लेक बिचारी साधी भोळी. हा पक्का बिलंदर. त्यानेच तिला फशी पाडले. 'सर्व जावई शेवटी हरामखोर असतात', हे तिचे ठाम मत आहे. असे मत असणारी केलीची आई ही एकटीच सासू नाही, असे ऐकतो.

भारतीय गृहिणी म्हणजे राजकन्या


केलीला दोन मुले आहेत. ती आळीपाळीने तिच्याजवळ किंवा तिच्या घटस्फोटित नवय्रासोबत राहतात. केलीला पाठीच्या कण्याचे दुखणे आहे. ओळीने तिची सात, आठ आॅपरेशन्स व्हायची आहेत. तीनचार आॅपरेशन्स झाली आहेत. तेवढीच व्हायची आहेत. ही आॅपरेशन्स खूपच वेदना देणारी असतात. तिला आॅपरेशनसाठी दवाखान्यात दाखल व्हावे लागते, तेव्हा तिची मुले आमच्याकडेच असायची. शस्त्रक्रिया झाली की, तिला लगेच डिस्चार्ज मिळतो. घरी येताच ती स्वत:ला कामाला जुंपून घेते. इथे घरगडी मोलकरणी नसतातच, असे म्हटले तरी चालेल. धुणी भांडी, केरवारे, स्वयंपाक घरीच करायच्या गोष्टी आहेत. अर्धे अधिक अन्न अर्धे शिजवलेलेच असते. पोळ्यांऐवजी ब्रेड असते. बाजारातून आणलेले पदार्थ तळले, भाजले, परतले, उकडले की मीठ मिरपूड टाकून जेवण तयार. घरच्या घरी धुणीभांडी करावी लागतात पण दिमतीला डिश वाॅशर वाॅशिंग मशीन सज्ज असतात. वीज जात नाही. शिवाय खरकटी भांडी खरकटे काढून विसळणे, डिश वाॅशर लोड करणे (डिश वाॅशर मध्ये भांडी नीट रचावी, लटकवावी, मांडावी लगतात ), अनलोड करून भांडी जागच्या जागी लावणे हे काम नवरोजीचेच असते. तरीही गृहिणीवर घरकामाचा ताण पडतोच आणि तो तसा पडणारही. त्यामुळे धुणीभांडी, झाडूपोचा या अशा कामांसाठी मोलकरीण किंवा मोलकरणी दिमतीला असलेल्या भारतीय गृहिणींची तुलना अमेरिकन गृहिणी कथेतल्या राजकन्येशीच करतात. 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे', हे त्यांना सांगूनही पटत/समजत नाही. त्यामुळे 'दुरून डोंगर साजरे', या अर्थाची एखादी म्हण इंग्रजीत आहे का, याचा शोध येथील भारतीय गृहिणी घेत आहेत, असे ऐकतो.

No comments:

Post a Comment