Tuesday, June 6, 2017

(१०) अमेरिका - प्रचंड जंगलांचा स्वच्छ देश व छोट्या पनाम्यातील सफर

अमेरिका - प्रचंड जंगलांचा स्वच्छ देश व छोट्या पनाम्यातील सफर(१०)    

आमची गाडी वेगात धावत होती. अमेरिका हा प्रचंड मोठा देश (हिंदुस्थानच्या साडे तीन पट) आहे . लोकसंख्या मात्र हिंदुस्थानच्या एकचतुर्थांश इतकी आहे . यामुळे दोन गावांना जोडणारे रस्ते जंगलातूनच जात असतात. ते फुटपट्टी वापरून आखलेले असावेत , असे सरळ रेषेत मैलोगणती असतात. चार पदरी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष एकमेकांना चिकटून उभे असतात . इथे जंगलांचीही निगा राखली जाते . अनिर्बंध आणि बेकायदेशीर जंगलतोड नाही . ’वनमहोत्सव’ नाही . पण ’वनसंगोपन’ आदर्श आहे . स्वच्छ व सुंदर पर्यावरण सर्वत्र आढळते . मानवनिर्मित कचरा जंगलातील रस्त्यावरच काय पण शहरातील हमरस्त्यावरही आढळत नाही . रस्त्याच्या बाजूला ठराविक अंतरावर ’रेस्ट रूम्स’ आहेत . त्या कमालीच्या स्वच्छ असतात आणि वापर केल्यानंतर सर्वजण त्या तशाच स्वच्छ करून पुढे जातात . त्यामुळे तातडीच्या वेळची ’अपरिहार्यता’ इथे रस्त्यांच्या कडेने दिसत नाही . ठिकठिकाणी ठेवलेल्या कचराकुंड्या सुद्धा सुबक आणि सुंदर असतात . गुटखा नाही, त्यामुळे संपूर्ण रस्ता झाकून टाकणारी पाकिटे नाहीत . तसे पाहिले तर इथे प्रत्येक वस्तू कागदात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत ’सीलबंद’ स्वरूपातच मिळत असते . तरीही शोधून सुद्धा कागदाचा किंवा प्लॅस्टिकचा तुकडा दिसत नाही . ही अतिशयोक्ती नाही, निरपवाद वास्तवता आणि वस्तुस्थिती आहे .

गोभक्षकांचे गोसंवर्धन

       वाटेत अर्धगोलाकृती पांढरी घरे दिसली . टिनाचा पत्रा अर्धगोलाकृती स्वरूपात जमिनीवर बसवून केलेल्या अर्धगोलाकृती रचना आपल्याकडेही दिसतात. यात गाईच्या बछड्यांना ठेवतात. वर्षातले सहा/आठ महिने बर्फ पडत असल्यामुळे अशी ’खास व्यवस्था’ करून बछड्यांना सोसवेल असे तापमान  ए सी वापरून ठेवले जाते .

       गायींना दूध भरपूर असते . ते यंत्रानेच काढतात . गवळी आपल्या हाताने एकचतुर्थांश सुद्धा काढू शकणार नाहीत . दुधाचा थेंब अन् थेंब काढून घेतला जातो . वासरासाठी दूध वगळून ठेवणे आणि उरलेली ’धार’ काढणे हा प्रकार नाही .

       वासरांपैकी गाईंना वाढवून यांत्रिक पद्धतीने ’फळवतात’ . येथील गाई ’दूध देणारी यंत्रे आहेत . वासारांपैकी जे खोंड असतात त्यांची यांत्रिक रीत्या कत्तल करून ’बीफ’ तयार करतात. येथील गाईंचीच नव्हे तर सर्वच पशुधनानी उत्तम निगा राखली जाते . इथे ’गोसंवर्धन’ आहे . ’गोपालन’ किंवा ’गोपूजन’ नाही .

       इथे म्हशी नाहीत . ’गोपूजक’ हिंदुस्थान म्हशीचे दूध पितो . ’गोभक्षक’ अमेरिका मात्र गाईचे दूध पिते . इथे ’गोट मिल्कचे’ पुरस्कर्ते आहेत . पण ते शेळीचे दूध पिणार्‍या गांधीजींचे अनुयायी नाहीत . या सर्व गोष्टींमधला विरोधाभास विचार करायला लावणारा आहे .

दूध पिणे चांगले की वाईट ?

       दुधावरून आठवण झाली . दूध पिणे चांगले नाही,  ते निसर्ग नियमांना धरून नाही, असे एक मत पुढे येऊ लागले आहे . आपल्या ’आईचे दूध’ पिण्याचे बंद केल्यानंतर निसर्गातला कोणताही प्राणी दुसर्‍या पाण्याचे दूध पीत नाही . याला अपवाद फक्त एकच आहे, तो म्हणजे मानवाचा . या विषयीची शास्त्रीय चिकित्सा/शहानिशा  होऊन चांगले काय वाईट काय , हे जोपर्यंत नक्की ठरत नाही तोपर्यंत तरी दूध ,दही , लोणी , तूप , श्रीखंड , आम्रखंड , रसगुल्ले, रसमलाई या सारख्या पदार्थांवर ताव मारण्याचे थांबवण्याचे कारण नाही .

यंत्रयुगाला न मानणारे लोक

       आमची गाडी वेगाने पुढे धावत होती . वाटेत वीस/पंचेवीस लोकांची एक वसाहत दिसली . हे डच लोक होते. यांना ’यंत्रयुगच’ मान्य नाही. ते यंत्राने तयार केलेली एकही वस्तू वापरीत नाहीत. अन्नवस्त्रप्रावरणासकट सर्व वस्तू ते आपल्या ’हाताने व श्रमाने’ तयार करतात . त्यासाठी ते यंत्रांची मदत घेत नाहीत .

       आपल्या भारतातही अशा प्रकारे जीवन जगणारे लोक आढळतील . पण त्या मागे अज्ञान , दारिद्र्य , अगतिकता या सारखी कारणे आढळतील . गांधीवादी सोडले तर जाणीवपूर्वक आणि जगण्याची एक पद्धत म्हणून यंत्राची मदत न घेण्याचे तत्त्व उराशी बाळगून जीवन जगणारी (पंचेवीस का होईना) माणसे आजही अमेरिकेतील एका ठिकाणी (किंवा कदाचित अनेक ठिकाणीही) वास्तव्याला आहेत , ही गोष्ट नवलाची तसेच विचार करायला लावणारीच नाही का? अमेरिकन प्रशासन त्यांच्या या मुलखावेगळ्या/आगळ्यावेगळ्या जीवन पद्धतीचा मान राखून आहे, ही सुद्धा कमी नवलाईची गो्ष्ट नाही.

एका छोट्या पनाम्यातील सफर

       उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यामधली चिंचोळी पट्टी खणून पनामा कालवा तयार केला गेला आणि पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर यांच्या दरम्यान सागरी वाहतुक सुरू झाली. या मानवनिर्मित पनामा कालव्याची माहिती माध्यमिक शिक्षण घेतांना भूगोलाच्या पुस्तकात वाचली होती. याची छोटी प्रतिकृति बघण्याची आणि पनामा कालव्यात ज्याप्रकारे वाहतुक होते, तशीच वाहतुक अनुभवण्याची संधी साधण्यासाठी आम्ही आमची गाडी लॉकपोर्टच्या दिशेने वळविली .

इरी लेक कॅनालने घडविलेली क्रांती
       लॉकपोर्ट हे न्यूयॉर्क प्रांतातील नायगारा काऊंटीतील (जिल्हा) सुमारे वीस हजार लोकवस्तीचे गाव आहे. ते शिकागोपासून तीस मैल अंतरावर आहे . न्यूयॉर्क प्रांतातील अल्बानी शहरातील हडसन नदी पासून इरी लेक कॅनाल सुरू होतो. तो इरी सरोवराकाठच्या बफेलो शहरापर्यंत 363 (तीनशे त्रेसष्ट) मैलाचे अंतर कापून पोचतो.  न्यूयॉर्कपेक्षा बफेलो जवळजवळ सहाशे फूट उंचावर वसलेले शहर आहे . थोडक्यात असे की कमी उंचीच्या न्यूयॉर्कपासून जास्त उंचीच्या बफेलोकड, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आम्ही जलप्रवास करणार होतो. चाळीस फूट रुंद आणि चार फूट खोल असलेल्या या कालव्याने इरी, आँटोरियो सारखी सरोवरे तर जोडलीच पण त्याच बरोबर न्यूयॉर्कला लागून असलेला अटलांटिक समुद्रही या सरोवरांशी जोडला. इरी सरोवर एका बाजूला अमेरिका तर दुसर्‍या बाजूला कॅनडाशी लागून आहे. म्हणजे कॅनडा आणि अमेरिका या दोन देशांना जोडण्याचे काम या कालव्याने केले आहे . आज जागतिक कीर्ती असलेल्या न्यूयॉर्क बंदराच्या विकासात ह्या कालव्याचे योगदान फार मोठे आहे. हा कालवा बांधायला (खणायला) प्रारंभ 1816 मध्ये झाला आणि तो 1825 मध्ये पूर्ण झाला. ही जलवाहतुक सुरू झाल्यामुळे प्रवासाची गती खूपच वाढली. तोपर्यंत प्राण्यांनी ओढल्या जाणार्‍या वाहनांचा उपयोग होत होता, त्यामुळे गती खूपच कमी होती . तसेच वाहतुक खर्च पंच्याण्णव टक्क्यांनी कमी झाला.

पाण्यातल्या पाण्यात बोट वर चढविण्याची किमया

       आमचा जलप्रवास कालव्याच्या आरंभापासून नव्हे तर कालव्यावर  मध्येच कुठेतरी असलेल्या  लॉकपोर्ट या गावापासून (बंदरापासून) सुरू झाला . आम्ही तिकीटे काढून बोटीत दुसर्‍या मजल्यावरची जागा पटकावली. कालव्याच्या एका कप्प्यामध्ये असलेल्या पाण्यात बोट उभी होती. बोट सुरू झाली आणि थोडे अंतर जाऊन थांबली. आता हा कप्पा पाण्याने भरू लागला. बोटीमागचे कालव्याचे दार या पाण्याच्या लोटानेच बंद होऊ लागले. समोरचे दार याच पाण्याच्या लोटामुळे उघडू लागले . पाणी पंधरा/वीस फूट वर गेले आणि बोटही तितकीच वर उचलली गेली . या प्रकाराला ’वॉटर लॉकिंग’ आणि व उघड/बंद होणार्‍या दरवाज्यांना ’वॉटर कॅनाल लॉक्स’ असे म्हणतात. या पाण्याच्या लोटामुळे समोरचे दार पूर्णपणे उघडताच आणि या कप्प्यातील आणि समोरच्या कप्प्यातील पाण्याची पातळी सारखी झाली. बोट सुरू होऊन पुढे काही अंतर जाऊन पुन्हा थांबली . आता या कप्प्यात पाणी येऊ लागले आणि बोट पुन्हा पंधरा/वीस फूट वर उचलली गेली. आणि मागचा दरवाजा पाण्याच्या लोटामुळे बंद आणि समोरचा उघडला गेला. दोन्ही कप्प्यातील पाण्याची पातळी सारखी झाली आणि बोट सुरू होऊन पुढे गेली. अशी चौतीस ’वॉटर कॅनाल  लॉक्स’ आहेत. ती पार केल्यानंतर बफेलो हे ’मुक्कामाचे बंदर’ येते. हे बंदर आरंभ स्थानापेक्षा नक्की सांगायचे तर 614 फूट उंच आहे . थोडक्यात असे की वॉटर लॉक्सचा उपयोग करून ही बोट सहाशे फूट उंचावरच्या जागी नेण्यात येते . माल वाहतुकीसाठी ह्या कालव्याचा उपयोग आजही चालू आहे .

       वाटेत तीन पूल लागले . बोटीला पुढे जाता यावे म्हणून पूल वर उचलला जायचा. यासाठी विजेचा नाही तर जलशक्तीचा उपयोग केला जातो, हे आणखी एक विशेष आहे . बोट पुढे सरकली की पूल पुन्हा आपल्या पूर्वीच्या जागी यायचा आणि दोन्ही बाजूंना खोळंबून राहिलेली वाहतुक पुन्हा सुरू व्हायची. या कालव्यावर असे चौतीस पूल आहेत आमचा प्रवास तीन पुलांपुरताच मर्यादित होता. नंतर आम्ही आल्या मार्गाने याच पद्धतीने (मात्र आता प्रत्येक कप्प्यातील पाणी पंधरा/वीस फुटाने खाली खाली आणून) परत आलो .



No comments:

Post a Comment