Tuesday, June 6, 2017

(८) ’स्वातंत्र्याचा पुनर्जन्म - गेटिसबर्गची निर्णायक लढाई ’

२६.५.२०१७ प्रवास ’स्वातंत्र्याचा पुनर्जन्म - गेटिसबर्गची निर्णायक लढाई ’ (८)

दिनांक 18 -8-2009 ला आम्ही सकाळी वॉशिंगटनहून निघालो.वाटेत शक्य तेवढी ’शाकाहारी’(इकडचा हात तिकडे लागून ती काहीशी मांसाहारी झाली असण्याच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करीत) न्याहारी विकत घेतली आणि चालत्या गाडीतच खा‘ी. पहिला बाजीराव लढाईवर जातांना शेतातली कणसे तोडून ती दोन्ही हातांनी घोड्यावर बसल्याबसल्याच चुरायचा आणि तिचे फक्के मारीत आपली घोडदौड कायम राखायचा. आमचेही तसेच होते. फक्त घोड्याऐवजी गाडी होती आणि कणसांऐवजी ब्रेडच्या दोन तुकड्यात दडपलेली आणि कांदा, काकडी, टोमॅटो यांचे काप यांची भर घातलेली  आणि शिवाय चीज व ऑम्लेटयुक्त सँडविचेस होती. (बेकन  व बीफ  म्हणजे अनुक‘मे डुकराचे व गाईचे मास नक्की नाही याची खात्री करून घेतली होती). वीस ते पंचेवीस मिनिटांच्या अंतरावर असलेले वॉशिंगटन ते गेटिसबर्ग हे अंतर हां हां म्हणता पार करून आम्ही गेटिसबर्गच्या सीमेवर दाखल झालो.
गृहयुद्ध - भावाभावातली लढाई
     अमेरिकेतील गृहयुद्ध ज्या दोन पक्षात (गटात ) झाले, त्यातला लिंकन हा ’एकराष्ट्रवादी’(युनियन) आणि दुसरे ’संघराज्यवादी’ (कॉनफेडरेट्स - अनेक राज्यांचे संघटन) होते. वादाचा पहिला मुद्दा होता तो म्हणजे ’अमेरिका हे एक राष्ट्र मानायचे की अनेक राज्यांचे संघटन मानयचे?’. वादाचा दुसरा मुद्दा असा होता, ’गुलामांची प्रथा चालू ठेवायची की त्यांना बरोबरीचा दर्जा  द्यायचा?’.
     संघराज्यवादी (कॉनफेडरेट्स)चा सेनापती रॉबर्ट ली विजयामागून विजय संपादन करून वॉशिंगटनच्या दिशेने निघाला होता. त्याच्या सैन्याचे मनोबल उंचावले होते. पण या बरोबर त्याला फाजील आत्मविश्‍वासाची बाधा झाली होती. लिंकनच्या फौजा पराभवामागून पराभव पत्करित  उत्तर टोकाला मागे मागे सरकत होत्या. त्याच्या फौजेचा सेनापती होता जोसेफ हूकर. त्याच्या डावपेचांवर सगळे नारज होते. त्यामुळे त्याने राजीनामा देण्याची तयारी दाखवताच तो ताबडतोब म्हणजे गेटिसबर्गच्या लढाईच्या फक्त तीन दिवस अगोदर म्हणजे 28 जूनला मान्य करण्यात आला होता. ब्रिटिश लिंकनच्या विरोधात होते. कॉनफेडरेटस जिंकणार असे मानूनच सर्व युरोपात कॉनफेडरेट्सच्या ’वॉर बाँडसचा’ भाव भलताच वधारला होता.
गेटिसबर्गची निर्णायक लढाई
     अशा आणीबाणीच्या प्रसंगी युद्धाला कलाटणी देणारी निर्णायक लढाई गेटिसबर्ग येथे एक जून ते तीन जून 1863 या काळात लढली गेली. कॉनफेडरेट्सचा सेनापती जनरल रॉबर्ट ली होता. तर एकराष्ट्रवाद्यांचा (युनियन -लिंकन) नवनियुक्त सेनापती होता जनरल जॉर्ज गॉर्डन मीड. युद्धक्षेत्राच्या मधोमध उंच उंच टेकाड्या असलेले एक सपाट मैदान होते.
     दोन्ही पक्षांची सैन्यदले चंद्रकोरीच्या स्वरूपात होती. रॉबर्ट लीच्या सैन्याची चंद्रकोर मोठी होती. त्याच्या सैन्यात 94,000 सैनिक होते. आतली छोटी चंद्रकोर जॉर्ज मीडच्या 72,000 सैनिकांची होती. तीन दिवस प्रचंड संघर्ष होऊन न भूतो न भविष्यती म्हणावा असा नरसंहार झाला. तोफा, बंदुकाचीच नव्हे तर हातघाईची लढाई सुद्धा झाली. या लढाईत एकमेकांच्या विरोधात लढणारे दोन सख्खे भाऊ एकमेकासमोर ठाकले होते.(अमेरिकेतील गृहयुद्ध खरोखरच भावाभावांमधले युद्ध ठरले.)
     एका भावाचे नाव होते जेड , दुसर्‍याचे नाव होते ब्यू . कौरव पांडवांचे युद्ध रात्री थांबायचे. उभय बाजूंचे लोक आपल्या जखमी वा मृत आप्तेष्टांच्या शोधात रणांगण पालथे घालीत , अशी वर्णने आपण वाचतो. गेटिसबर्गला असाच प्रकार घडला . आपल्या सख्या भावाचा शोध घेणार्‍या भावाला (जेडला) ब्यू जखमांनी विव्हळत मृत्यूची वाट पहात पडलेला आढळला .जेडने आपल्यविरुद्ध लढलेल्या पण आता मृत्यूच्या दारात घोटाळणार्‍या भावाचे डोके आपल्या मांडीवर घेतले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता . ब्यू ने आपल्या आईला (म्हणजे जेडच्याही आईला) लिहिलेली पत्रे जेडच्या स्वाधीन केली. ही पत्रे आईला नक्की मिळणार, हे कळल्यानंतर त्याने भावाच्या मांडीवरच प्राण सोडले . त्याचे प्राण एवढ्यासाठीच तर खोळंबले नसतील ना ?
 वॅगन भरेल एवढे तुटलेल्या हातापायांचे ढीग
      या युद्धात एक्कावन हजारावर सैनिक गारद झाले. दोन्ही पक्षांचे जवळजवळ सारखेच सैनिक गारद झाले होते. लढाईत जायबंदी झालेल्यांच्या हातापायांच्या जखमा चिघळायच्या. यावर त्या काळी इनफेक्शन पसरू नये म्हणून ’तो’ हात किंवा पाय सरळ कापून टाकीत. अशा हातापायाचा ढीग एवढा मोठा झाला होता की त्यांनी रेल्वेची एखादी वॅगन पूर्ण भरून जावी. अशी रक्तरंजित लढाई कदाचित पानिपतला किंवा दुसर्‍या महायुद्धात नॉर्मंडी बीचला (विखुरलेल्या स्वरूपात जमिनीवर आणि सागरात) झाली असावी. पहिले दोन दिवस रॉबर्ट लीच्या सैन्याला ठिकठिकाणी विजय मिळत  होते.
हे असतील का शेवटचे गुलाम ?
     पेनसिलव्हॅनिया प्रांतातील यॉर्क नावाच्या गावी कॉनफेडरेट्सच्या हाती 40 (चाळीस) आफ्रिकन सापडले त्यांची रवानगी गुलाम म्हणून ताबडतोब करण्यात आली. असे असले तरी जॉर्ज मीडचे सैन्य तग धरून होते. तीन जूनला निर्णायक लढाई झाली. रॉबर्ट ली याला फाजील आत्मविश्‍वास नडला , अननुभवी सेनापतींच्या हाती लढाईची सूत्रे होती,त्यातून ते सूचनांचे पालन न करणारे होते. असे असूनही रॉबर्ट ली ने या बेशिस्तीकडे दुर्लक्ष केले. ’गेटिसबर्गहून डावपेचाची माघार घ्यावी (टॅक्टिकल विड्रॉवल), सुरक्षित जागी पाय मजबूत रोवावेत आणि मग चढाई करावी’, हा विचार मागे पडला. सैन्यावरची सेनापतीची पकड सैल झाली आणि याचा परिणाम व्हायचा तोच झाला . तीन जुलैला कॉनफेडरेट्सचा सपशेल पराभव झाला. या युद्धाचा परिणाम असा झाला की लिंकनला राजनैतिक आणि युद्ध अशा दोन्ही आघाड्यांवर निर्विवाद सफलता प्राप्त झाली. युद्धाच्या प्रारंभापासून पाठ न सोडणारी माघार कायमची संपली. मीडने दोन जूनला लढाईत जिंकलेले चाळीस आफ्रिकन हे बहुदा ’रीतसर लढाई करून जिंकलेले शेवटचे गुलाम’ असतील का ?
लिंकनचा अमर संदेश
लोकशाहीची साधी,सोपी व सुटसुटित व्याख्या
     ही निर्णायक लढाई जिंकल्यावर लिंकन गेटिसबर्गला आला. त्याने 272 शब्दांचे दोन मिनिटांचे मोजके व नेमके भाषण केले. गेटिसबर्गचे हे भाषण अतिशय गाजले.
     ’हे बलिदान व्यर्थ जाणार नाही.आज स्वातंत्र्याचा पुनर्जन्म होतो आहे. लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य (गव्हर्मेंट ऑफ दि पीपल, गव्हर्मेंट बाय दि पीपल, गव्हर्मेंट फॉर दि पीपल) या भूतलावरून कधीही नष्ट होणार नाही.’ 19 नोव्हेंबर 1863चा हा संदेश केवळ अमेरिकेपुरताच मर्यादित नाही.
चोवीस मैलांचा परिसर आणि सोळा महत्त्वाची ठिकाणे
     या लढाईच्या खुणा एकूण सोळा ठिकाणी रेखित केल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी स्मृतिचिन्हे आहेत आणि तिथे केव्हा काय घडले याचा तपशील दिला आहे . हा एकूण चोवीस मैलांचा आणि सोळा टप्पे असलेला प्रवास आम्ही गाडीत बसून केला. सोबत ऑडिओ टेप माहिती देत होती. प्रत्येक टप्पा आला की आम्ही खाली उतरून स्मृतिचिन्ह प्रकाशबद्ध करीत होतो आणि मजकूर मनात साठवीत होतो .
इतिहासाच्या खुणा जपल्या
     ह्या सर्व रचनेत इतिहास कसा जपावा, कसा सांगावा, याचा आदर्शच आपल्यासमोर उभा केला आहे .1857 च्या किंवा पानिपतच्या लढाईच्या खुणा आपण अशाच जपायला हव्या होत्या, असे वाटून गेले. नोंदी व डॉक्युमेंटेशन  याबाबत आपण बरेच कच्चे आहोत, हे जाणवले.
लिंकनचे एक स्वभाववैशिष्ट्य
     या निमित्ताने लिंकनच्या स्वभावाचा आणखी एक पैलू आपल्यासमोर येतो. पराभूत ली ( कॉनफेडरेट्सचा सेनापती) मोठ्या मुष्किलीने आपली उरलीसुरली फौज घेऊन परत फिरला.  यावेळी मीडने (एकराष्ट्रवादींचा सेनापती) परत चठाई करून त्याचा पाठलाग केला असता तर पिन्सर मूव्हच्या (शत्रूला वेढा घालून दोन्ही टोके आवळणे) आधारे ली ला चांगलेच पेचात आणता आले असते, आणि लढाई लगेच संपली असती. पण मीडने चिमटीचे तोंड उघडे ठेवले ठेवले . वारंवार सूचना मिळून सुद्धा त्याने शत्रूला पळून जाण्यासाठी वाव मिळू दिला , चिमटीचे तोंड आवळून बंद केले नाही , की रॉबर्ट ली ला जेरेबंद केले नाही. त्यामुळे चिमटीच्या उघड्या तोंडातून ली निसटून गेला. हे कळताच लिंकन अतिशय संतापला . त्याने मीडला एक खरमरीत पत्र लिहिले, ’जी लढाई काही दिवसात संपली असती, ती आता काही वर्षे रेंगाळणार ,(प्रत्यक्षात तसेच घडले) ही साधी गोष्ट तुमच्यासाख्या अनुभवी सेनापतीला वारंवार सूचना देऊनही समजू नये, याला काय म्हणावे?’, अशा आशयाचे हे पत्र होते . पण लिंकनने प्रत्यक्षात हे पत्र मीडला पाठविलेच नाही. लिंकनच्या मृत्यूनंतर त्याच्या कागदपत्रात हे कागद सापडले. लिंकनने हे पत्र का पाठवले नसावे, याबाबत इतिहासकार आजही निरनिराळी मते मांडतात. पण लिंकनने आपल्या सेनापतीची जाहीर, उघड व रीतसर निर्भर्त्सना केली नाही, हे मात्र खरे आहे.
हर्षे चाकोलेट फॅक्टरी
     सोबत दोन लहान मुले ( ओम्कार  आणि अनुषा) होती. तेव्हा काही ठिकाणे त्यांच्याही आवडीची असावीत, असा विचार करून हे स्थळ आम्ही ठरविले होते.प्रत्यक्षात एखादी गोष्ट लहान आणि मोठ्या अशा दोहोंच्याही पसंतीला उतरणारी कशी असू शकते, हे ही फॅक्टरी पाहून लक्षात आले. अशा अनुभवातूनच या गोष्टी लक्षात येतात, नाही का?
     दूध , कोकोच्या बिया , साखर आणि आणखी काही सामग्री यांच्या साह्याने निरनिराळी चाकोलेट्स व तत्सम खाद्यवस्तू या कारखान्यात तयार होतात.  या कारखान्याची आखणी वर्तुळकृती असून  सर्व विभागांचे मिळून एक प्रचंड मोठे वर्तुळ तयार केले आहे. या वर्तुळाचा व्यास निदान अर्ध्या मैलाइतका तरी  नक्कीच असावा. या वर्तुळाच्या आत वर्तुळाकृती ’रेल्वे मार्ग’ असून त्यावर तेवढ्याच आकाराची एक ’मेरी गो राऊंड’ स्वरूपाची गाडी सारखी फिरत असते. या गाडीला अनेक उघडे डबे असून  प्रत्येक डब्यात सहा ते आठ व्यक्ती बसू शकतात. गाडी सतत फिरत असते. चालत्या गाडीत उतरण्यासाठी आणि बसण्यासाठी साह्य करण्यासाठी तरबेज व्हॉलिंटिअर सज्ज होते. ते प्रेक्षकांना अलगद डब्यात बसवायचे आणि उतरून सुद्धा घ्यायचे.
सबके सब खूष
     कारखान्याची यंत्रे प्रचंड खोल्यात बसविली आहेत. त्या खोल्यांची  एक बाजू काचेची म्हणजे पारदर्शक आहे . त्यामुळे आत घडणार्‍या प्रक्रिया फिरत्या गाडीतील प्रवाशांना सहज आणि स्पष्ट दिसतात. सुरवातीला तीन गाईंनी आमचे स्वागत केले . आता आमच्या दुधापासून चाकोलेट कसे तयार करतात, ते पहा असेच जणू त्या सांगत होत्या. दूध , दुधाचे आटणे ,  कॉफीच्या बियांची भुकटी होणे , साखरेसह ही भुकटी दुधात मिसळणे , उकळून घट्ट होणे या सर्व प्रक्रिया आम्ही ’फिरत्या गाडीत’ बसून पाहिल्या . वर्तुळ केव्हा पूर्ण झाले ते कळलेच नाही .  कर्मचार्‍यांच्या सहकार्याने आम्ही खाली उतरलो , तेव्हा एकाने आमच्या हातावर चारचार चाकोलेट्स ठेवली आणि ’हाय, हॅलो, वेलकम ’ आटोपून आम्ही बाहेर आलो. प्रत्येक चाकोलोट मोदकाच्या आकाराचे आणि लहानशा बोराच्या आकाराचे होते .’बच्चा खूष, बच्चेके केवल माबाप ही खूष नही तो दादा दादी भी खूष’, अशी ही किमया पाहण्यासाठी प्रेक्षकांची रांगच रांग, आपली पाळी केव्हा येते याची वाट पहात उभी होती . सुट्टीच्या दिवशीची धमाल तर विचारायलाच नको.
एका दगडात अनेक पक्षी
     हे प्रदर्शन पहायला यात्रेसारखी गर्दी जमली होती . तिकीट लावले होते , त्याची कमाई होती. चाकोलेट्स विकली जात होती, म्हणजे तीही कमाई होती. शिवाय खाण्यापिण्याची सोय असल्यामुळे येणारी मंडळी त्या पदार्थांची चव पाहणारच . मालाची , कंपनीची जाहिरात होत होती, ते वेगळेच. चाकोलेट तयार करण्याची प्रक्रिया अगदी दहा पंधरा फुटावरून पाहता येत होती म्हणजे प्रबोधनही आलेच . व्यापार आणि शिक्षण यांचा सुंदर मिलाफ यापेक्षा आणखी परिणामकारक रीत्या  झालेला कुणी पाहिला आहे का ? बच्चा कंपनी तर हे सर्व पाहिल्यानंतर हर्षेच्याच चाकोलेटचा आग्रह धरणार, हे नक्की. अशी योजकता दुर्मीळच म्हणावी लागणार ! नाही का ?  एका दगडात दोनच नव्हे तर अनेक पक्ष्यांची शिकार झालेली अशी उदाहरणे अपवादानेच आढळणार. याला म्हणतात, व्यापारी डोके!
पार्किंगची जागा की फुटबॉलचे मैदान ?
     जिथेजिथे आम्ही गाडी पार्क करीत होतो, तिथेतिथे फुटबॉलच्या मैदानाएवढे किंवा त्याहीपेक्षा मोठे ’कार पार्किंग’ असायचे . कारण येथे गरीबश्रीमंत सगळेच गाड्या वापरतात . काहींच्या गाड्या त्यांच्या मालकीच्या असतात तर इतरांच्या भाड्याच्या. पण असतात चार चाकी गाड्याच ! कार पाकिंगसाठी बहुतेक ठिकाणी पैसे द्यावे लागत नाहीत, हा दुसरा विशेष.

No comments:

Post a Comment