Tuesday, June 6, 2017

(७) अमेरिकेच्या राजधानीत आम्ही

२५.५.२०१७ प्रवास, अमेरिकेच्या राजधानीत आम्ही(७)  

     आमची ही सहल सर्वात जास्त कालावधीची होती.  आठ ऑगस्ट 2009 ते तेरा ऑगस्ट 2009 या सहा दिवसात आम्ही अनेक स्थानांना भेटी दिल्या. त्या म्हणजे वॉशिंगटनवर हल्ला करण्यासाठी निघालेले विमान ज्या शँकव्हिले या गावी पाडण्यात आले ते स्थळ, अमेरिकेची राजधानी वॉशिंगटन, गुलामगिरीच्या विरोधात निर्णायक लढाई ज्या गावी लढली गेली ते गेटिसबर्ग, जग प्रसिद्ध हर्षे चाकोलेट फॅक्टरी, खाणीतील आगीमुळे भस्मसात झालेले गाव सेंट्रेलिया, नैसर्गिक चमत्कार म्हणून गाजलेली आणि पाण्याने तुडुंब भरलेली पेन्स केव्ह, पनामा कालव्यात आहेत तशी लॉकपोर्ट गावाची वॉटर लॉक्स, जगातील वयाने सर्वात लहान पण अवखळपणात पहिला क‘मांक असलेली नायगारा नदी, आणि जगातला उंचीत दुसर्‍या क्रमांकाचा असलेला नायगारा धबधबा, किंग्ज डॅम, केन काऊंटी अशी ही स्थळांची लांबलचक यादी आहे.
     दिनांक आठ ऑगस्टला सकाळी साडे सातला मी आणि अजू क्लीव्हलंडला गेलो, कारण इरी गावातल्या सर्व भाड्याच्या गाड्या ’बुक’ झाल्या होत्या. डी ई टी 6620  क्रमांकची सात सीटर गाडी भाड्याने घेऊन अकरा वाजता इरीला परत आलो आणि वॉशिंगटनसाठी प्रस्थान ठेवले.  रात्री साडे आठ वाजता सौ सुमती पोंक्षे- प्रभू पोंक्षे यांचेकडे मुक्कामाला गेलो. आठ, नऊ आणि दहा ऑगस्टची रात्र त्यांच्याकडे मुक्काम केला आणि अकरा ऑगस्टला सकाळी नऊ वाजता त्यांच्याकडून परतीच्या वाटेने निघालो.
     अकरा ऑगस्टला रात्री ब्लूमबर्गला मुक्कामाला गेलो. बारा ऑगस्टला पेन्स केव्ह, वॉटर लॉक्स पाहून रात्री बफेलो येथे आलो. रात्री घाईघाईने जेवण आटोपून नायगारा धबधब्यावरची रंगीत रोषनाई पाहून परत बफेलोला मुक्कामाला आलो. तेरा ऑगस्टला नायगारा, किंग्ज डॅम आणि केन (के-ए- एन -ई म्हणजे काणेच का नाही?) काऊंटी (जिल्हा) पाहून इरीला परत आलो.
फ्लाईट -93 आणि शँकव्हिलेची अमर कथा
     आठ ऑगस्टला वॉशिंगटनच्या दिशेने येतायेता एक महत्त्वाचे ठिकाण आमच्या वाटेला लागूनच होते. अकरा सप्टेंबरला अमेरिकेवर फार मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दोन आणि पेंटॅगॉनवर एक अशी तीन विमाने धडकली होती. चौथे विमान वॉशिंगटनच्या दिशेने निघाले होते. हीच ती फ्लाईट-93 होय. या विमानातील चार अतिरेक्यांनी कॉकपिटचा ताबा घेतला होता आणि विमान वॉशिंगटनच्या दिशेने वळवण्यास सांगितले होते. वॉशिंगटन अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर असतांना विमानातील प्रवासी आणि कर्मचारी यांनी अतिरेक्यांचे मनसुबे हाणून पाडले. विमान भेलकांडत एका शेतात पडून सर्व प्रवाशांसकट बेचिराख झाले पण वॉशिंगटनवरचा हल्ला थोपवला गेला. या स्थळाला आता तीर्थस्थळाचे माहात्म्य प्राप्त झाले असून दररोज हजारो लोक या स्थळाला भेट देऊन आपली श्रद्धांजली अर्पण करीत असतात, या घटनेला आता 2009 साली आठ वर्षे लोटली होती तरी हा क्रम अव्याहत सुरू होता. भविष्यातही तो असाच चालू राहील, यात शंका नाही. अमेरिकेच्या हवाई इतिहासातली एक अगदी ’वेगळी आणि स्फूर्तिदायक बलिदानाची कथा’ सांगणारी विमान फेरी म्हणून फ्लाईट -93 चा उल्लेख करावयास हवा. हमरस्त्यावरून वाकडी वाट करून इथे यावे लागते. या ठिकाणी एक मोठे स्मृतिस्थळ उभारले जाणार आहे.  विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी यांची नावे एका स्मृतिस्तंभावर कोरलेली आहेत. अगोदर सव्वा नऊच्या सुमाराला दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर धडकली होती. ही माहिती जगातील इतर लोकांप्रमाणेच या विमानतील लोकांनाही कळली होती. त्यामुळे अतिरेक्यांनी कॉकपिटचा ताबा घेतला आहे, हे कळताच , ’आपण काय करायचे’, या विषयावर मतदान घेऊन, ’अतिरेक्यांशी दोन हात करायचे’, असा निर्णय या विमानातील प्रवाशांनी घेतला.  विमानातील रेकॉर्डर आणि प्रवाशांनी केलेले मोबाईल फोन यावरून हा इतिहास जगाला कळतो आहे. या झटापटीमुळे अतिरेक्यांना विमानाला लक्ष्यापर्यंत नेता आले नाही आणि ते मध्येच कोसळले. गावकर्‍यांनी विमान भेलकांडत जातांना आणि पडतांना पाहिले होते. व्हाईट हाऊस म्हणजे अमेरिकन अध्यक्षांचे निवासस्थान  आणि कॅपिटल म्हणजे अमेरिकेचे संसद भवन, यापैकी एकावर जाऊन धडकायचा अतिरेक्यांचा मनसुबा होता. तो असफल झाला. हे विमान ज्या गावी पडले ते ’शँकव्हिले’ हे गाव तोपर्यंत एक नगण्य गाव होते. आता त्याचे नावही सर्वतोमुखी झाले आहे. आम्ही या स्थळाला भेट दिली आणि आपली श्रद्धांजली अर्पण केली. तिथल्या एका छोटेखानी प्रदर्शनात लहान बाहुल्यांचे अवशेष, कपड्याचे तुकडे, बटना, पिना आणि गोळा करता येण्यासार‘या आणि टिकण्यासारख्या असंख्य वस्तू रांगेत वर्तुळाकृती रचनेत मांडून ठेवल्या आहेत. त्या पाहून गहिवरून येते, तसेच बलिदान करणार्‍या ’त्या’ पन्नास बहाद्दुरांना मनोमन मानवंदना द्यावीशी वाटते.
’नेव्हर अगेन’हेब्रीदवाक्य असले पाहिजे.
     आपण जागरूक राहिलो असतो तर 21 जून 2012 चा मुंबईच्या सचिवालयातील अग्निप्रलय कांड घडलेच नसते. निदान ते इतके भीषण होण्याआधीच शमवता आले असते. मागे ’सुनामी’ आली आणि आपण खडबडून जागे झालो. पण कोकण किनार्‍यावर ’फयान’ आले तेव्हा आपल्या लक्षात आले की, आपल्या स्मरणातून ’सुनामी’ केव्हाच विसरली गेली आहे. सव्वीस नोव्हेंबरचा अतिरेकी हल्ला झाला तेव्हाही आपण ’पेटून’ उठलो. पण पुन्हा सर्व प्रकारची शिथिलता आलेली आहे. या काळात ’हेडलीचे पाठिराख्यांनी’ (26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्याची आखणी करणारा एक मुख्य सूत्रधार) आपली झोप उडविली होती पण पुन्हा निद्रिस्त अवस्थेकडे गेलो आहोत की काय अशी शंका येते. 21 जून 2012 चे मंत्रालय अग्निकांड काहीकाळ ’ताजे’ राहील  पण ते केव्हा ’शिळे’ होईल ते सांगता येत नाही. मागे दिल्लीला यासारखाच  प्रकार घडला. तेव्हा दिल्ली उच्च न्यायालयाने नुसते फटकारलेच नाही तर कालबद्ध कार्यक्रमाचे जणू वेळापत्रकच आखून दिले. आता ही जाग किती दिवस टिकते ते पहायचे.
     अमेरिकेवर ट्रेड सेंटर बेचिराख करणारा अतिरेकी हल्ला झाला, पेंटॅगॉनच्या लष्करी कार्यालयाला जबरदस्त धडक बसली आणि अमेरिकन राष्ट्र खडबडून जागे झाले. ’नेव्हर अगेन’, ’भविष्यात पुन्हा असे कधीही होऊ देणार नाही’, असा निश्‍चय त्या राष्ट्राने केला. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता येणार्‍या प्रत्येक पाहुण्याची अंगझडती घ्यायला सुरवात केली. रागलोभाकडे साफ दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर अमेरिकेने संपूर्ण प्रशासनव्यवस्था, संरक्षणव्यवस्था, गुप्तहेरयंत्रणा परिपूर्ण आणि ’नित्यसिद्ध’ ठेवली आहे. सर्वसाधारण अमेरिकन नागरीकही जागा झाले आहेत. केव्हाही, कुठल्याही आपत्तीचे निवारण आणि व्यवस्थापन करण्यासाठी ही प्राथमिक पण प्रथम दर्जाची आवश्यकता आहे. हे मूल्य चुकविल्याशिवाय नैसर्गिक, मानवी, घातपाती किंवा अपघाती आपत्तीवर मात करता येणार नाही, हे आपल्या लक्षात येईल तेव्हा खरे. मुंबईच्या अग्निप्रलयानंतर तरी आपल्याला जाग येवो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना!
मुक्काम वॉशिंगटन
     ही वाटेतली भेट आटोपून आम्ही वॉशिंगटनच्या दिशेने निघालो. साडे आठच्या सुमारास पोंक्षे यांच्या घरासमोर  आमची गाडी उभी राहिली. पोंक्षे दांपत्य(सौ पुष्पाची मोठी बहीण ताई गाडगीळ यांची कन्या व जावई) आपल्या निखिल (मोठा) आणि समीर (धाकटा) या दोन मुलांसह 1042 बेल व्यू रोड , मकीन येथे राहतात. हे गाव व्हर्जिनिया प्रांतात  वॉशिंगटनपासून  अवघ्या वीस मिनिटांच्या अंतरावर (ताशी वेग 70 मैल) आहे. त्यामुळे आठ आणि नऊची रात्र  त्यांच्याकडे राहून रोज सकाळी वॉशिंगटनचा फेरफटका मारणे सोपे झाले. बेसमेंट, त्यावर पहिला मजला व वरती दुसरा मजला  असे त्यांचे प्रशस्त घर आहे. आमच्यासाठी त्यांनी सगळे बेसमेंट त्यांनी उपलब्ध करून दिले होते. खास पुणेरी मसाले वापरून केलेला मसाले भात , कोकणस्थी आमटी, मटकीची उसळ, दह्यातील कोशिंबीर आणि निरोपाच्या निमित्ताने पिझ्झा असा बेत दोन दिवस होता .
     रोज सकाळी आम्ही घरून निघून युनियन स्टेशनवर कार ठेऊन ’हॉप ऑन, हॉप ऑफ’, पद्धतीने दोन दिवस चालणार्‍या तिकिटांच्याआधारे फेरफटका मारला. कोणत्याही स्टॉपवर बसमध्ये बसायचे, मुक्काम आला की खाली उतरून ते ठिकाण पहायचे, पाहून झाले की मागून येणार्‍या बसमध्ये बसून पुढच्या मुक्कामासाठी कूच करायचे अशी एकूण तीस ठिकाणी चढण्या किंवा उतरण्याची सोय असलेली बस आम्हाला नऊ व दहा ऑगस्टला वॉशिंगटन शहराच्या विविध भागात फिरवीत होती. बस दुमजली होती . मात्र बसच्या वरच्या मजल्याला छत नव्हते .त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी वरच्या मजल्यावर बसूनच सर्वच्या सर्व म्हणजे तीस ठिकाणे दुरूनच बघितली आणि त्यांना प्रकाशचित्रित केले. (आम्ही एकूण सत्तर फोटो काढले आहेत.) हे पाहून झाल्यानंतर  काही वेळ उरला होता म्हणून  आम्ही ’नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम ’ पाहिले. दुसरे दिवशी  म्हणजे दहा तारखेला निवडक तीन स्थळेच पाहिली. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी , मॅडम तुसाचे मेणांच्या पुतळ्यांचे म्युझियम आणि लिंकन मेमोरियल.
नॉन व्हेज, व्हेज आणि व्हेगन
     वॉशिंगटनचे युनियन स्टेशन ही अतिभव्य आणि टोलेजंग इमारत आहे. ती पाहून डोळे दिपतात. रेल्वेच्या गाड्यांच्या येण्या जाण्याच्या वेळा दाखविणारा फलक दिसतो, म्हणूनच केवळ हे स्टेशन आहे, हे समजते. एखादा राजवाडा शोभावी, नव्हे अनेक राजवाडे एकत्र असावेत, अशी ही इमारत आहे. अनेक मजले, सरकते जिने, दुकानांच्या रांगा, प्रवाशांची ’शांत’ वर्दळ यापैकी कशाकशाचे वर्णन करावे, ते कळत नाही. स्टेशनवरच्या इंडियन किचनमध्ये एका डॉलरला एक (एक डॉलर म्हणजे जवळजवळ पन्नास रुपये) या ’माफक दराने’ आम्ही ’भारतीय नाश्ता’ केला. या किचनचा मालक एक सरदारजी होता. भारतीय माल विकणार्‍या मॉलचे चालक-मालक मात्र हटकून गुजराथी आढळले.
     एरवी ब्रेडच्या दोन तुकड्यात चीज, कांदा टोमॅटोचे काप, बेकन (डुकराचे मास) किंवा बीफ (गाईचे मास) यांचे काप येथे सर्वत्र नाश्त्याला मिळतात. शाकाहारी लोक यातील अभक्ष भाग वगळून उरलेला नाश्ता करतात. नॉनव्हेज (बेकन किंवा बीफ काहीही खाणारे), नॉनव्हेज पण बेकन किंवा बीफ न खाणारे, व्हेज आणि व्हेगन असे चार प्रकारचे आहार अमेरिकेत प्रचारात आहेत. पहिले तीन प्रकार समजले. पण व्हेगन म्हणजे काय ते समजेना. हे लोक खरे शाकाहारी म्हटले पाहिजेत. कारण यांना दूध, दही, तूप (इकडे तूप नसतेच), तसेच दुधाचे सर्व पदार्थ वर्ज्य असतात. त्यांच्या मते हाही (दूध, दही वगैरे) मांसाहाराचाच प्रकार आहे. हे लोक सोयामिल्क (सोयाबीनपासून तयार केलेले दूध) तसेच सोयाकर्ड, (सोयामिल्कपासून तयार केलेले दही) यावर आपली ’दुधाची तहान’  भागवतात.  बर्गर , हॉट डॉग यात मास असणारच. पण व्हेगन लोक हे सर्व पदार्थ सोयामिल्कपासूनच तयार करून आपली हौस भागवतात. शाकाहार म्हणून मिळणारे पदार्थ तयार करतांना ’इकडचे हात तिकडे’ लागणारच. म्हणून ’खरे शाकाहारी’ घरून ’शिदोरी’ बांधून घेतात. प्रत्येकजण आपल्या प्रथा, परंपरा, निष्ठा, आस्था जपत असतांना अत्यंत ’लगबगीचे’ जीवन जगत असतो. वाहनांप्रमाणे ही माणसे सतत धावतच असतात.
अशी माणसे, अशी रहदारी !
     ’माणसे धावतात ’, असे म्हटले खरे, पण माणसे दिसली तर! इरीहून वॉशिंगटनला येताना रस्त्याला लागून पायी चालणारी, शेतात काम करणारी, माणसे दिसलीच नाहीत. शेकडो मोटारी व ट्रक्स (कधीकधी वीस-वीस चाकी) यांची वर्दळ मात्र सहा लेनच्या रस्त्यांवरून तशी सत्तर ते ऐंशी मैल वेगाने  अखंड व अहोरात्र सुरू असते. यात ’कामाच्या वेळात’ आणखीनच वाढ होत असते. उलटसुलट दिशांनी जाणारे, मधोमध 40/50 फुटांचा रिकामा पट्टा असलेले, तीन तीन लेन्स असलेले रस्ते मैलोगणती एकमेकांना समांतर असतील, अशाप्रकारे ’फुटपट्टी लावून सरळ आखलेले’ आढळतात. अमेरिकेत येऊन आता दोन महिने होत आहेत, पण दोनचारदा सुद्धा ’हॉर्नचा आवाज’ ऐकू आला नाही. ’हॉर्न क्यूं नही बजाया?; बजाया था, सुनाई नही देता क्या?’, वगैरे संवाद ऐकण्याचा योग आला नाही. रस्त्याने चालत जाणारी चार माणसे सुद्धा दिसली नाहीत. सगळे बंद मोटारीत, सर्व काचा बंद करून, एसी ऑन करून, मोटारीत बसूनच, धावताधावता, न चुकता एकमेकांना ’हाय! हॅलो!’ करीत जात असतात.
अमेरिकन आणि इंडियन
  शहरात मात्र रस्त्यावर किंवा दुकानात लोक दिसतात. ’अगत्याला’ सुमारच नसतो. प्रत्येकजण दार उघडून किंवा उघड्या दाराशी उभा राहून दुसर्‍याला ’पहिले आप’ म्हणत असतो. दुसरा ’थँक्यू’ म्हणतो तर ,पहिला ’वेलकम’ म्हणून, आभारांचा स्वीकार करतो किंवा परतफेड करतो. ’दूर हटो’ ऐवजी ’एक्सक्यूज मी’ म्हणून वाट मोकळी करून दिली/घेतली जाते. टुणटुणीत आणि ठणठणीत म्हातारे आणि म्हातार्‍या यांची सुद्धा लगबग जाणवत असते . दुसरी गर्दी असते ’बच्चा कंपनीची’. बिनधास्त धावत असतांना सुद्धा ही मंडळी ’थँक्यू’, ’वेलकम’, ’’एक्सक्यूज मी’ म्हणायला विसरत नाहीत. भरपूर उंचीची आणि भरभक्कम देहाची ही माणसे देशाच्या संपन्नतेचे प्रतिनिधित्व करतात. आम्ही साठाव्या वर्षीच ’टायर्ड’ होऊन ’रिटायर’ झालो. सध्या ’जेमतेम पंचाहत्तरीत’ असतांनाच स्वत:ला ’म्हातारे’ समजतो, याचे इकडे आश्‍चर्य वाटते.                                      
                                   पंच्यांऐंशी वर्षाचा तत्पर तरूण
          वयावरून आठवण झाली. नातवाला शाळेत पोचवायला म्हणून एकदा आम्ही आपल्या गाडीने शाळेजवळ पोचलो. आमचे लक्ष एका तरूण म्हातार्‍याकडे गेले. हातात छत्री पाठीवर ऑक्सीजनचा सिलेंडर आणि तोंडाला ऑक्सीजन मास्क लावून हा म्हातारा  इथे काय करीत असावा, हा विचार मनात आला. थोड्याच वेळाने कळले की, तो बालगोपालांना रस्ता क्राॅस करायला मदत करीत होता. आणखी चौकशी केल्यावर कळले की शाळा सुरू व्हायच्या आणि सुटण्याच्या वेळेला हा तरूण म्हातारा अगदी नित्यनियमाने ठरावीक ठिकाणी पंधरा मिनीटे अगोदरच येऊन उभा राहतो आणि मुलांना रस्ता क्राॅस करण्यास मदत करतो. त्याचे वय पंच्याऐंशी वर्ष होते. ऑक्सीजन सिलेंडर हा त्याचा चोवीस तासांचा सोबती होता. रस्ता क्राॅस करून देण्यासाठी लागणारी पंधरा/वीस मिनीटे संपली की आल्या पावली परत जातो आणि नंतर दुसर्‍या दिवशी पुन्हा न चुकता ’ड्यूटीवर’ हजर होतो. वयाच्या ऐंशी किंवा पंचाऐंशी वर्षी सुद्धा काम करणार्‍या या लोकांच्या मनात, ’मजा आहे बुवा तुम्हा हिंदुस्थानी लोकांची , जेमतेम साठ वर्षांचे होताच सेवानिवृत्तीची मजा चाखायला मिळते तुम्हाला ’, असा भाव असावा.
सगळे इंडियनच
     ’हिंदुस्थानी’ किंवा ’इंडियन’ या शब्दावरून आठवण झाली. हिंदुस्थानी, पाकिस्तानी, सिलोनी, बंगलादेशी हे सगळे लोक यांच्या हिशोबी ’इंडियनच’ असतात. यापैकी कुणी आपली वेगळी ओळख सांगितली तर वरकरणी ’आय सी !’(असं का !),म्हणत हे लोक ’म्हणजे इंडियनच’ असे पुटपुटतात. चिनी, जपानी मंगोली हे वेगळे ओळखू येतात. उरलेले सगळे इंडियन किंवा फारतर एशियन.
दिमाखात डार्विन
     नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी ,मॅडम तुसा म्युझियम, लिंकन मेमोरियल, नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम मध्ये काढलेले साठ फोटो आर्कुटवर दिसतीलच. त्यातले काही फोटो इथेही दिसतील .
     नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीमध्ये डार्विनचा प्राण्यांच्या जन्म आणि विकासासंबंधातील उत्क्रांतिवाद सजीव होऊन ( समोर मृत प्राण्यांचे फॉसिल्स आणि सांगाडे असले तरी) उभा ठाकतो तर मॅडम तुसाचे पुतळे जरी मेणाचे असले तरी प्रत्यक्ष संवाद करीत आहेत, असे वाटते. लिंकन मेमोरियल मधील लिंकनची भाषणे वाचून माणुस पुलकित, प्रभावित आणि रोमांचित होतो. ’ईश्‍वराने जर सगळ्यांना स्वतंत्र म्हणून जन्माला घातले आहे तर एक माणूस दुसर्‍याचा गुलाम होऊच कसा शकतो?’, हा त्याचा प्रश्‍न मेमोरियल पाहणारा विसरणे शक्यच नाही.
     एका गोष्टीचे मात्र नवल वाटले. अमेरिका हे ख्रिश्‍चन राष्ट्र आहे. डार्विनचा सिद्धांत बायबलच्या शिकवणुकीच्या विरुद्ध असल्यामुळे, बायबल मानणार्‍यांच्या दृष्टीने निषेधार्ह आहे. धार्मिक शिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये हा सिद्धांत शिकवण्यावर बंदी आहे. पण केवळ वॉशिंगटनमधल्याच नव्हे तर अन्य शहरातील म्युझियममध्ये डार्विनचा सिद्धांत मांडणारी सामग्री (हाडे , सांगाडे , फॉसिल्स) वैभवात आणि दिमाखात उभी आहे , आणि हजारो प्रेक्षक ही सामरी ’आ वासून’ पहात आहेत, हे कसे?


No comments:

Post a Comment