Monday, October 8, 2018

(२२) आठवणी ११ सप्टेंबरच्या (नाईन एलेव्हनच्या)

(२२) आठवणी ११ सप्टेंबरच्या (नाईन एलेव्हनच्या)
वसंत गणेश काणे
न्यूयाॅर्कमध्ये ‘नॅशनल सप्टेंबर ११ मेमोरियल ॲंड म्युझियममध्ये’ एक फोल्डर ठेवलेले असून त्यात ट्विन टाॅवरच्या विध्वंसात मृत्यूमुखी पडलेल्या जवळजवळ ३००० व्यक्तींची नावे त्यांच्या जन्मतारखेनुसार चढत्याक्रमात (सुरवात जानेवारीपासून व शेवटाला डिसेंबर याप्रकारे) नोंदवलेली आढळतात. मेमोरियल व म्युझियम उघडायच्या अगोदर सकाळी कुणीना कुणी तिथे येते. फोल्डर उघडून त्या दिवशीच्या तारखेचे पान उघडते, त्यावर असलेली नावे लिहून काढते, फ्रिज उघडते, बळी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीगणिक पांढऱ्या गुलाबाचे एक फूल बाहेर काढते. ह्या त्या व्यक्ती असतात की जर त्या जीवित असत्या तर त्या दिवशी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला असता.
 नंतर ती व्यक्ती मेमोरियल भोवती असलेल्या पॅरापिट वाॅलपाशी जाते. या वाॅलवर बळी गेलेल्या व्यक्तींची नावे फोल्डरमधल्याच  क्रमानुसार तारीखवार  कोरलेली आहेत. नावाच्या पहिल्या अक्षरावर ती गुलाबपुष्प वाहते.  गुलाबपुष्प व नाव दिसेल अशी दोन छायाचित्रे घेते, एका छायाचित्रात नाव, फूल व पार्श्वभूमी म्हणून पॅरापिट वाॅल असते तर दुसऱ्यात क्षितिजाची पार्श्वभूमी असते. ही दोन्ही छायाचित्रे संबंधितांच्या कुटुंबीयांकडे त्याच क्षणी ईमेलने रवाना होतात. आतापावेतो म्युझियम उघडायची वेळ झालेली असते. ही व्यक्ती तिथून एक शब्दही कुणाशी न बोलता आल्या पावली निघून जाते.
 कुणाना कुणा व्यक्तीचा हा क्रम वर्षानुवर्षे अव्याहत सुरू आहे. आज तिथे आलेली व्यक्ती काहीशी वेगळी आहे. ११ सप्टेंबरला विमान टाॅवरला धडकल्यानंतर ४८ व्या मजल्यावरून खाली उतरून जिचा जीव वाचला होता ती ही व्यक्ती. म्युझियम एप्रिल २०१२ मध्ये तयार झाले होते. स्वत:ची सतत भळभळणारी आठवण थोडीतरी शांत व्हावी म्हणून तसेच अतिरेकी हल्यात बळी पडलेल्यांचे पुण्यस्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा त्याचा हा दिनक्रम अव्याहत सुरू आहे. ज्यादिवशी त्याला सवड असते, ते दिवस ही व्यक्ती  म्युझियमच्या निदेशकाला कळवते. यासाठीची फुले एक फुलविक्रेत्याने देऊ केलेली असतात.
१९९३ मध्ये हल्ला झाला तेव्हा बाहेर आल्यावर इतरांना मदत करण्यासाठी ही व्यक्ती थांबली होती. पण तिला तेव्हा फर्स्ट एडची माहिती नव्हती. आता त्या व्यक्तीने आवश्यक ते शिक्षण घेतले आहे. या सामान्य नागरिकाचे नाव आहे, जाॅर्ज मिरोनिस.


सावरलो कसे ते आठवतं
अनुवाद - वसंत गणेश काणे
११ सप्टेंबर म्हटले अमेरिकनांसमोर उभा राहतो अतिरेक्यांनी केलेला विवेकशून्य विध्वंस, विनाश. पण खरं सांगायचं तर माझ्या त्या आठवणी आता पुसट झाल्या आहेत.
 आजही मी खिडकीतून बाहेर पाहतो तेव्हा ट्विन टाॅवर्स दिसू लागतात. सूर्यप्रकाशात लखाखणारे. त्यावेळी शाळेत आमचा सोशल स्टडीजचा तास सुरू होता. कुणीतरी माहिती दिली ट्विन टाॅवर्सवर दोन विमाने येऊन धडकल्याची. शाळेतून घरी परततांना ट्विन टाॅवर्सच्या जागी फक्त धुराळा दिसत होता. माझ्या वडलांना त्या दिवशी घरी यायला खूप उशीर झाला होता. ते वाटेतच अडकून पडले होते.
आमच्या अगोदरच्या पिढीच्या स्मरणात पर्ल हार्बर वर झालेला जपानी हल्ला होता तसेच जाॅन एफ केनडीच्या खुनाची बातमी होती. मी वयाच्या बाराव्या वर्षी ट्विन टाॅवर्सवरचा हल्ला अनुभवत होतो.
पण न्यूयाॅर्क, वाॅशिंगटन किंवा शॅंक्सविले येथे आम्ही काय गमावले यापेक्षा त्यानंतर जे घडले त्याच्या आठवणी माझ्या मनात सतत घोटाळत असतात.
  मला आठवते ते ज्या ठिकाणी (झिरो ग्राऊंडवर) ट्विन टाॅवर्स होते तिथे झेंडा उभारतानाचे अग्निशमन दलाच्या तीन वीरांचे फ्रॅंकलीनने टिपलेले छायाचित्र, अध्यक्ष जाॅर्ज बुश यांचे भाषण, जाॅन स्टीवर्ट्स च्या विडंबनपर ‘दी डेली शो’चा पहिला भाग (एपिसोड).
विनाश नाही आठवत मला, मला आठवते पुनर्स्थापना
धुळीला मिळाले ते सुंदर मिनार पुन्हा गजबजण्यासाठी.
  इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात नसलेला धडा त्या दिवशी मी शिकलो. माजी अध्यक्ष कोलरीज म्हणाले होते, ’पुढे चला’. यातूनच आजवरचे मानवजातीसमोरचे प्रश्न सुटले होते आणि भविष्यातही सुटणार आहेत.
जीवन साधं, सोपं कधीच नसतं. सगळं कसं सुरळीत चाललंय असं वाटत असतांनाच एक दान नेमकं उलटं पडतं. अमेरिकेसाठी ११ सप्टेंबर हे असं दान होतं. देशाची वीण ताणली गेली  पण वाकली नाही की खचली नाही. उलट देश पुन्हा सावरून ताठ उभा राहिला.
 हे जे घडत गेलं, त्याच्याच आठवणी ताज्या आहेत . न्यूयाॅर्कचं क्षितिज(स्काय लाईन) दिसायला लागलं की घरी आल्यासाखं वाटायचं. आता मोठा झालो आहे. आता त्या क्षितिजाला एक वेगळाच अर्थ लाभला आहे. जीवनात कोणते का प्रसंग येईनात, मी पुन्हा सावरून उठेन, वाढत्या जोमानं.
  जे गेले त्यांना, जे गमावले त्याला व तेव्हापासून जे बदलले त्यालाही मी कधीच विसरू शकणार नाही. - ॲंथोनी मॅकेन्स्की, वार्ताहर, याॅर्क डेली रेकाॅर्ड


No comments:

Post a Comment