Wednesday, October 10, 2018

(२६) अमेरिकन गवळी

(२६) अमेरिकन गवळी
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
अमेरिकेत पाश्चराइज्ड दूध मिळते. गॅलनभर दूध सोयीनुसार मॉलमधून घेऊन यायचे आणि ते फ्रीजमध्ये ठेवून लागेल तसे वापरायचे, अशी पद्धत इथे रूढ आहे. हे दूध पाश्चराइज्ड तसेच होमोजीनाईजड असते. हे दूध फ्रीजमध्ये ठेवायचे आणि लागेल तसे वापरायचे. ते न तापवता वापरले तरी चालते. तसेच हे दूध कितीही तापवले तरी साय येत नाही किंवा यातील स्निग्ध पदार्थ वेगळे करता येत नाहीत. सौ नीलमने ‘रॉ’ (निरसं दूध) मिल्क म्हणजे कोणतीही प्रक्रिया न केलेले दूध मिळू शकेल का, याचा शोध घेण्यास सुरवात केली. इथल्या ‘मंडईमध्ये’ असं निरसं  दूध ती शेतकऱ्याकडून बाजारात जाऊन घेत असे.  आणि काय आश्चर्य? एक  दिवस तिला फेसबुकवर एक जाहिरात दिसली. त्यात दुधाचे सगळे प्रकार (यात ‘रॉ’ मिल्कही - निरसं दूध - समाविष्ट होतं) घरपोच देण्याचा उल्लेख होता. डिलिव्हरी चार्जेस फक्त चार डॉलर इतकेच(!) होते. एका गॅलनला (साडे चार लिटर ) दहा डॉलर असा दर होता. त्यामुळे दर आठवड्याला दूध न घेता दर दोन आठवड्यानी घेण्याचे ठरविले. हे दूध तापविले की चांगली जाड साय येते. तूप वेगळे खरेदी करण्याची गरज पडत नाही.
पण गवळ्याला एक अभिवचन (डिक्लरेशन ) द्यावे लागते. गाईचे पोषण कशाप्रकारे झाले आहे, त्याबद्दल  आश्वासन द्यावे लागते.
अ) दूध वाढावे,म्हणून गाईला  हार्मोनचे इंजेक्शन दिलेले नाही. ब)तिला अँटीबायॉटिक औषधे/ इंजेक्शने दिलेली नाहीत. क) तिने जे गवत किंवा वनस्पती किंवा अन्य प्रकारचे अन्न खाल्ले आहे त्यावर कीटकनाशके फवारलेली नाहीत ड) रासायनिक खाते दिलेल्या गवतावर तिचे पोषण झालेले नाही.
 तिचे पोषण पूर्णपणे नैसर्गिक अन्नावर झालेले आहे.
 ती जी एम ओ (जेनेटिकली मॉडिफाइड  ऑरागॅनिझम) या प्रकारात मोडत नाही.
अशा प्रकारची गाय असेल तर दुधाचा भाव दहा डॉलरला एक गॅलन असा भाव असतो एरवी तो  तीन डॉलरला  एक गॅलन असा भाव असतो.
    मुद्दा वेगळाच आहे. अमेरिकेतही घरपोच दूध पोचवणारे गवळी आहेत. हे गवळी ट्रकमध्ये कॅन भरभरून दूध आणतात आणि चार डॉलर डिलिव्हरी चार्जेस घेऊन घरोघर दूध पोचवतात ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती. म्हणून या ‘घरपोच दूध’ प्रश्नाकडे साहजिकच माझे लक्ष गेले.
अमेरिकेतील गोपालन आणि गोसंवर्धन
या प्रदेशात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे इथले ‘गोठे’ वातानुकूलित असतात. इथल्या गाईंना कृत्रिम रीत्या फळवतात. वासरू जन्माला येताच त्याला वेगळे करून बाटलीने दूध पाजून वाढवतात. त्यांना वातानुकूलित  खोल्यात वाढवतात. ज्या वासऱ्या असतात, त्यांना गाई म्हणून वाढवतात. जे खोंड असतात, ते पुरेसे वाढले ही, त्यांची कत्तलखान्यात नेऊन हत्या करतात आणि त्यांच्या मासाचे पावाच्या आकाराचे तुकडे करून ते पॅक करून वातानुकूलित मॉलमध्ये विक्रीला ठेवतात.
याबाबत एक कथा कानावर आली. एक माणूस गायी पाळत आहे. जन्मलेले वासरू खोंड असेल तर त्याला पुरेसे वाढवून तो त्याला कत्तलखान्यात घेऊन जातो. त्याच्या मासाचे घनाकार तुकडे करून घरी घेऊन येतो. ते भल्यामोठ्या फ्रीज मध्ये रचून ठेवतो. रोज एक तुकडा काढून तो ओव्हनमध्ये शिजवतो. आणि मिरे मीठ लावून खातो. हा साठा संपतो तोपर्यंत दुसरा खोंड मोठा झालेला असतो. आपल्यासारख्या गोपूजकांच्या आणि गोभक्तांच्या अंगावर शहारे आणणारा हा सर्व प्रकार आहे.
गोपूजक हिंदुस्थान म्हशीचे दूध पितो
    एक मात्र नक्की आहे. इथे गोसंवर्धन आणि गोपालन मात्र उत्तम रीत्या होते. पण त्याचे कारण अगदी वेगळे आहे. खोंड कापून भरपूर मांस मिळते. ते चविष्टही असते, असे म्हणतात. या साठीच येथे गायींची निगा राखली जाते येथे गोपूजन ही संकल्पनाच नाही. गोपूजाकांच्या आपल्या देशात गायींची काय अवस्था आहे, ते आपण पाहतोच आहोत. आपल्या येथे गोपूजन आहे. पण गोपालन आणि गोसंवर्धन याबद्दल न बोललेच बरे. याउलट अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशात गोपालन आणि गोसंवर्धन उत्तम आहे पण गाई विषयी उत्तम दूध आणि भरपूर मांस देणारा प्राणी या व्यतिरिक्त  दुसरा भाव नाही. आणखीही एक विरोधाभास आहे. गोपूजन करणारा हिंदुस्थान म्हशीचे दूध पितो. गोभक्षण करणारा अमेरिकन गायीचेच दूध पितो.
    गायींना भरपूर दूध असते. सर्व दूध यंत्राने काढून घेतात. अगदी थेंब न थेंब काढून घेतात. आपल्या येथे दूध काढल्यानंतर वासरासाठी दूध राखून ठेवतात. इथे वासरांना  बाटलीने दूध पाजून वाढवतात. त्यामुळे वासरांसाठी दूध राखून ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच वासरांना वातानुकूलीत गोठ्यांमध्ये वाढवतात. कारण निदान सहा महिने तरी इथे भरपूर बर्फ पडत असतो. ही थंडी गाईंना किंवा वासरांना मानवत नाही. म्हणून ही व्यवस्था करावी लागते.
नॉनव्हेज, व्हेज आणि विगन
    अमेरिकेत विविध प्रकारचे, प्रथा परंपरा जपणारे लोक आढळतात. नॉनव्हेज म्हणजे मांसाहारी हे आपल्याला माहित आहे. यातही दोन प्रकार आहेत. काहींना बीफ(गोमांस ) चालत नाही. इतर सर्व मांसाहार त्यांना चालतो. काहींना हॅम (डुकराचे मांस) चालत नाही. बाकी सर्व प्रकार चालतात. व्हेजिटेरियन (शाकाहारी) यांना मांसाहार चालत नाही, हे आपल्याला माहित आहे. पण दूध, दही चालते. आहार पद्धतीनुसार माणसांचा आणखी एक प्रकार इथे आहे. त्यांना ‘विगन’ असे म्हणतात. यांना दूध सुद्धा चालत नाही. दुधालाही ते मांसाहारच मानतात. प्राण्यापासून मिळालेला कोणताही पदार्थ त्यांच्या दृष्टीने   नॉनव्हेजच असतो. अपवाद असतो तो फक्त आईच्या दुधाचा! ही मंडळी वनस्पतीपासून दुधासारखा पदार्थ तयार करून तो दूध म्हणून वापरतात. आपल्या इथे तर आजीबाईच्या उपासाला सुद्धा दूध, दही, ताक, तूप हे प्रकार चालतात. दुधाला मांसाहार समजायचे की शाकाहार हा वादाचा मुद्दा आहे, हा विषय  तर्काच्या कसोटीवर न्यायचा म्हटले तर दूध हा मांसाहारच ठरणार नाही का?  मात्र तर्काचा आधार आपण अनेकदा घेतच नाही. म्हणून शाकाहारी मंडळींनी श्रीखंड, बासुंदी, रसगुल्ले यावर ताव मारायला हरकत नाही.        

(२५) गाठभेट डॉल्फिनशी

(२५) गाठभेट डॉल्फिनशी
(माझी अमेरिकावारी)
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
अमेरिकेतील न्यूजर्सी प्रांतातील अटलांटिक सिटी या नावाच्या गावची  (बीच)चौपाटी फारच चांगली मानली जाते. त्यामुळे या चौपाटीला भेट देण्याचा आमचा विचार ऐकून, ‘जाताच आहात तर डॉल्फिन पाहण्याच्या सफरीवर का जात नाही’, असे म्हणून कामवालीने  आमच्यातल्या  सिंद्बादला जागे केले. ‘सफारी काय फक्त सिन्द्बाद्नेच कराव्यात?’, असा प्रश्न स्वत:लाच विचारून आम्ही माहिती काढली आणि सफरीला निघालो.
दुसरा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
यॉर्क हे आमचे राहते गाव सोडले आणि लगेच एक नदी लागली. इथल्या नद्यांना भरपूर पाणी असते. ही नदी त्याला अपवाद नव्हती. ही नदी वाह्तावाहता  लक्षावधी लोकांच्या पीकपाण्याच्या आणि काही प्रमाणात जलप्रवासाच्या गरजा भागवते. ‘ससक्वेहॅना’ अशा काहीशा नावाची ही नदी जगातल्या सर्वात प्राचीन नद्यांपैकी एक आहे. या नदीची दुसरी विशेषता अशी की हिच्या पात्रात ती समुद्राला मिळते त्याच्या जवळपास जगप्रसिद्ध ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ च्यापेक्षा तुलनेने एक लहानसा ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ आहे. हा पुतळा इथे कसा आला हे बरेच वर्षेपर्यंत एक रहस्यच होते. तिची कुळकथा अशी की, मूळच्या मोठ्या स्टॅच्यूला शंभर वर्षे झाली याची आठवण म्हणून स्त्लीप नावाच्या एका वकिलाने हा पुतळा  गुपचूप बांधून घेतला आणि नदीच्या पात्रात नेऊन बांधला. त्याची ही कृती बेकायदेशीर तर होतीच पण तो कोसळला असता तर येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना धोका संभवला असता आणि सहा वर्षांनी  घडलेही तसेच. तो पुतळा वादळाने उन्मळून पडला.  पण तोपर्यंत लोकांना ही कल्पना भलतीच आवडली आणि भावली होती. आपल्या राज्याचाही एक ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ असला पाहिजे या विचाराने चांगलेच मूळ धरले होते. आता त्याच जागी एक भरभक्कम, पूर्वीच्या पुतळ्यापेक्षा  उंच आणि वजनदार पुतळा गेली चौदा वर्षे दिमाखात उभा आहे. याच नदीवरील पुलावरून आम्ही पुढे निघालो.
रस्ते आणि रहदारीचे नियम
रस्ते दहा दहा लेनचे होते. पाच लेन्स एका दिशेने जाण्यासाठी तर पाच विरुद्ध दिशेने जाण्यासाठी. प्रत्येक लेनमधून ठराविक अंतर सतत ठेवीत ओळीने मोटारी  ताशी सत्तर मैल (किलोमीटर नाही) वेगाने धावत होत्या. इथे येऊन आता महिना होऊन गेला आहे पण हॉर्न ऐकला नाही की रस्त्याने चालत जाणारी माणसे पहिली नाहीत. साडेसात हॉर्स पावरच्या मोटरसायकली धडाडत ओव्हरटेक करून जात. मोटरसायकली मागे, पिझ्झा घरपोच पोचवणारे ज्याप्रमाणे एक डब्बा लावून जात असतात, तसे थोडे मोठे डबे लावलेले असत. हायवेला लागून असलेल्या लहान गावाकडे जाण्यासाठी एक्झिट रोड्स होते. तिकडे जाणारी व्यक्ती योग्य वेळ साधून टोकाची लेन घेत असे. न्यू जर्सी प्रांतात प्रवेश करताकरता डेलावेअर नदी लागली. या नदीवरचा पूल प्रचंड मोठा आहे. आपल्या नागपूरचा ‘रामझूला’ खेळणं वाटावा इतका लहान ठरेल. ‘डेलावेअर मेमोरीअल ब्रिज’ हा सस्पेन्शन प्रकारचा जुळा पूल आहे. १९४९ साली हा पूल बांधायला प्रारंभ झाला होता. त्याची उंची १३४ मीटर  इतकी आहे. लांबी एक मैल इतकी आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला तीन डॉलर इतका टोल द्यावा लागतो. तो भरण्याचे दोन प्रकार आहेत. एक आपल्या इथल्यासारखा आहे. दुसरा प्रकार असा आहे की, तुम्ही त्यासाठी वेगळा अकाउंट उघडून पैसे भरून ठेवायचे. असे केले की तुमच्या कारला एक  डिव्हाइस लावण्यात येतो. तुम्ही टोल नाक्याजवळ आलात की, त्या ‘ई-झी पास’ अकाउंट मधून पैसे आपोआप वळते केले जातात आणि ‘थँक यू’  ची पाटी झळकते. कार थांबवावी लागत नाही की रांग  लावावी लागत नाही.
अटलांटा सिटीमध्ये एका  हॉटेलमध्ये एका सूट मध्ये थांबून चौपाटीवर जाण्यास निघालो. समुद्रकिनारा किती स्वच्छ असू शकतो याचे नमुनेदार उदाहरण समोर होते. तो तसाच राहण्यासाठी कशी आणि किती काळजी घेतली जाते, याचे प्रात्याक्षिकही पाहता आले. समुद्राचे पाणी स्वच्छ होते. ठिकठिकाणी मार्गदर्शक सज्ज होते. एक हेलिकॉप्टर उडत गेले. ते हवेतून देखरेख करीत होते. तेवढ्यात एक दुसरे हेलिकॉप्टर उडत गेले ते एक जाहिरातीचा पट पतंगासारखा सोबत घेऊन चालले होते.
डॉल्फिनच्या आठवणी
    दुसऱ्या दिवशी डॉल्फिन पाहण्यासाठी समुद्राच्या सफरीवर जायचे होते. साठ वर्षांपूर्वी डॉल्फिनचा अभ्यास केला होता. पण त्यातला फारच थोडा भाग लक्षात होता. कारण तो परीक्षेच्या निमित्ताने केलेला अभ्यास होता. आता त्याची प्रत्यक्ष भेट होणार होती. व्हेल माशाशी (देवमासा) नाते संबंध असलेला हा सस्तन प्राणी निवासासाठी पाण्यात ५५ लक्ष वर्षापूर्वी का गेला/जलवासी झाला, ते सांगणे विज्ञानाला कठीण आहे. कदाचित मानवाशी स्पर्धा नको म्हणून तो जलवासी झाला असावा, असे मला नेहमी वाटते. पण त्याला मानवाविषयी वाटणारी जवळीक पाहिली की ह्या आपल्या पूर्वजांच्या बांधवाविषयी कुतुह्लाबरोबरच आस्थाही जागी होते. बुडालेल्या जहाजातून वाचून समुद्रात कसाबसा जीव मुठीत धरून तरंगत राहणाऱ्या खलाशाची त्याने अनेकदा मदत केली आहे. अशाप्रकारे मदतीकडे डोळे लावून तरंगणाऱ्या खलाशांभोवती डॉल्फिन आपल्या भाईबंधांसह कोंडाळे करून पोहत राहतात आणि शार्क माशांना हुसकून लावतात, अशा कथा प्रचलित आहेत. त्यांचा मेंदू  मोठा आणि विकसित असतो. डॉल्फिनला समुद्रात शत्रू खूप असतात. शार्क मासे तर त्यांचे सारखे लचके तोडत असतात. पण होणाऱ्या जखमा लगेचच भरून येतात. ही एक प्राणीशाशास्त्रालाही न उलगडणारी चमत्कारिक बाब आहे. असा प्रकार क्वचितच एखाद्या प्राण्यात आढळून येतो. असे असले तरी त्यांना ‘टाईप २ प्रकारचा मधुमेह’ मात्र होतो, असे शास्त्रीय अभ्यासात आढळून आले आहे. त्यांच्या स्वभावातील मानावाविषयीचे अतिरेकी माधुर्य तर याला कारणीभूत झाले नसेल ना? तीक्ष्ण दृष्टी, अतिशय तिखट कान, समोरच्या प्राण्याची केवळ चाहूलच नव्हे तर त्याच्या  आकार आणि आकारमानाचीही (शेप अँड साईज) अचूक माहिती देणारे दात(दातांचा असाही उपयोग केला आहे या प्राण्याने) यांच्या भरवशावर हा आपला दूरदूरचा बांधव आपल्या बालगोपालांच्या लव्याजम्यासह आनंदानेच नव्हे तर गुण्यागोविंदाने लक्षावधी वर्षे वावरत आला आहे.  तो आपल्यालाही एकदम जवळ जवळचा वाटायला लागतो. या आयुधांच्या भरवशावर हा पाण्यात मोठ्या दिमाखात वावरत असतो. नदीतील गढूळ पाण्यात त्याची दृष्टी जाते पण त्यामुळे याचे  फारसे बिघडत नाही.
डॉल्फिनमधील बालसंगोपन
डॉल्फिन हा कळप करून राहणारा प्राणी आहे. या प्रकारातली काही बडी मंडळी मोठा जनाना बाळगूनही असलेले आढळतात. डॉल्फिनची मादी पिल्लाला जन्म देते तेव्हा तिच्या मैत्रिणी साह्याला, साथीला (कदाचित धीर द्यायलाही?) असतात. पुढे नंतरही सर्व प्रकारची मदत करतात. पिल्लाला आईचे त्वचेखाली दडलेले स्तन शोधण्याची आणि आपल्या मुखाची त्यावर पक्की पकड बसेल याची एवढीच काळजी घ्यावी लागते. असे न झाल्यास समुद्रातील खारे प्राणी आईच्या दुधात मिसळण्याची भीती असते हे ज्ञान त्याला उपजतच असते. पिल्लाच्या मुखात दूध सोडण्याचे काम मात्र आईच्या नियंत्रणात असते. यासाठी पिल्लाला काहीही कष्ट घ्यावे लागत नाहीत. श्वासोच्छवासासाठी पिल्लाला योग्य प्रकारे तरंगत ठेवण्याची जबाबदारी आईचीच असते. पिलू तीन वर्षांचे होईतो अंगावरचे दूध पीत असते.
डॉल्फिनचे प्रियाराधन
डॉल्फिन माणसाशी जवळीक ठेवण्याच्या आणि ती वाढवण्याच्या प्रयत्नात असतो. घोडा,कुत्रा असे अनेक प्राणी मानवावर जीवापाड प्रेम करतांना आपण पाहिले आणि ऐकले असतील. पण प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याने माणूस व प्राण्याचे प्रेम आजही दुर्मिळ मानले जाते. लोवाट नावाची एक महिला डॉल्फिनचा अभ्यास एका शास्त्रीय प्रयोगशाळेत करीत होती. आपल्यावर एका नर डॉल्फिनचे प्रेम बसले होते असा दावा तिने केला आहे.  ती या डॉल्फिन सोबत राहत असे. ते दोघे एकत्र खात, पीत, खेळत, स्नान करीत असत. तिने त्याचे नाव पीटर असे ठेवले होते. लोवाटने त्याला इंग्रजी बोलण्यास शिकवले होते. पीटरशी आपले भावनिक संबंध जुळले होते, असे लोवाटचे म्हणणे आहे.
अशा या डॉल्फिनच्या जलप्रवासातील डौलदार हालचाली आम्ही पाहत होतो.  कुणी डॉल्फिन आपल्या जनान्यासह पाण्यातून काहीसा बाहेर झेपावत आमच्या बोटीशी काटकोन करून वेगाने जात होता. त्यांची लगबग जाणवत होती. गल्फ स्ट्रीम हा उष्ण पाण्याचा समुद्रप्रवाह त्याची साथ देणार होता. अनेक माद्यांचे दिवस भरले असतील. त्यामुळे लगबग आवश्यकच होती. त्यातही आम्हाला फोटो काढता यावा म्हणून पोज देणाऱ्या त्या माद्याच असाव्यात, असे क्षणभर मनाला वाटून गेले.                              



















Monday, October 8, 2018

(२४) पहिली भारतीय महिला डॅाक्टर



(२४) पहिली भारतीय महिला डॅाक्टर
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ,
नागपूर - ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

आमची कार वेगाने धावत होती. घड्याळात चार वाजून पंचवीस मिनिटे होत आली होती. बरोबर साडेचार वाजता दरवाजे बंद होणार होते. चार वाजून अठ्ठावीस  मिनिटे झाली असतांना आम्ही दारातून आत प्रवेश केला. ‘सॅारी, आपल्याला उशीर झाला आहे’. पण आम्ही कोण, कुठले, कशासाठी आलो हे  कळताच मात्र प्रमुख अधिकारी म्हणाले, ‘ असे असेल तर मला अपवाद केलाच पाहिजे’, असे तो म्हणाला आिण माझ्या मागेमागे या, असे त्याने खुणेनेच सुचविले. थोडे दूर गेल्यावर एका स्मृतिस्तंभाकडे बोट दाखवून तो म्हणाला, ‘त्या तिथेच त्यांची रक्षा कारपेंटर दाम्पत्याची सोबत करीत आहे’.
ख्रिश्चन दफनभूमीत भारतीय महिलेची रक्षा - अमेरिकेत मुलगा, सून व नातवांच्या भेटीला आलो असतांना तिथे जवळच कुठेतरी डाॅक्टर आनंदी जोशी यांची रक्षा आपल्या अमेरिकन पालकांच्या दफनभूमीत त्यांची सोबत करीत आहे, हे ऐकले होते. त्या पवित्र स्थळाला भेट द्यायचीच, असा आमचा निश्चय झाला होता. पत्ता काढून त्या स्थळाला भेट द्यायचीच असे ठरवून निघालो होतो. त्या दफनभूमीची दारे संध्याकाळी बरोबर साडे चारला बंद होणार होती. अमेरिकेतील रस्ते सरळसोट व अगदी मुलायम असतात. ताशी ७० मैल (११० किलोमीटर) वेगाने आमची गाडी धावत होती. शेवटी चार अठ्ठावीसला भोज्याला स्पर्श झाला होता.
‘भारतीय नागरिक  या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी नेहमीच येत असतात. त्यामुळे तुम्ही भारतातून आल्याचे कळताच तुमचा हेतू लक्षात आला’, तो अधिकारी सांगत होता. कारपेंटर अडनावाचे ख्रिश्चन दाम्पत्य त्यांच्या परंपरागत दफन भूमीतील नेमस्त जागी चिरनिद्रा घेत विसावले होते. त्या दाम्पत्याची सोबत करीत होती, एका भारतीय महिलेची रक्षा. हे सर्व लोकविलक्षणच होते.
मुलखावेगळा जीवनपट - पाश्चात्य वैद्यकशास्त्र शिकलेला पहिली हिंदू महिला डॅाक्टर, अमेरिकेच्या भूमीवर पदार्पण करणारी पहिली हिंदू स्त्री, पुराणमतवादी श्रीमंत ब्राह्मण कुटुंबात जन्मलेली, वयाच्या नवव्या वर्षीच आपल्यापेक्षा वयाने २२ वर्षांनी वडील बीजवराशी विवाहबद्ध झालेली, पण सुदैवाने प्रागतिक विचाराचा आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता असलेल्या पुरुषाची अर्धांगिनी झालेली, विवाहानंतर यमुनेची आनंदी झालेली, विवाहानंतर पतीच्या प्रोत्साहनाने संस्कृतसोबत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणारी, वयाच्या १४ व्या वर्षीच मातृत्त्व ओढवलेली, उपचाराअभावी आपल्या चिमुकल्याला दहाव्या दिवशीच मुकलेली दुर्दैवी माता, असा प्रसंग स्वत:वर ओढवल्यानंतर वैद्यकीय शिक्षणाचा ध्यास घेणारी, ख्रिश्चन धर्म स्वीकाराल तर अमेरिकेतील वैद्यकीय शिक्षणाचा सर्व खर्च करू, अशी अट घालणाय्रा ख्रिश्चन मिशनरी रॅायल विल्डर यांची धर्मांतराची अट धुडकावून लावणारी, डॅा आनंदी ( पूर्वाश्रमीची यमुना) गोपाळ जोशी हिचा जन्म महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे ३१ मार्च १८६५ साली झाला. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी पुणे येथे दिनांक   २६ फेब्रुवारी १८८७ ला तिला परमेश्वराने आपलेसे केले.
ख्रिस्ती व्हा सर्व खर्च करू - मिशनरी रॅायल विल्डर यांनी जोशी दाम्पत्याची आनंदीने वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रगट केलेली इच्छा आणि आपण त्यांच्या समोर ठेवलेला धर्मांतराचा प्रस्ताव मिशनय्रांच्या प्रिन्स्टन्स मिशनरी रिव्ह्यू या नियतकालिकात प्रसिद्ध केला. अमेरिकेतील न्यू जर्सी प्रांतातील रोझेल गावातील थिओडिशिया कारपेंटर नावाची एक महिला एका दंतवैद्याकडे उपचाराकरिता गेली असतांना नंबर लागण्यास वेळ असल्यामुळे वेळ घालवण्यासाठी नेमके हेच नियतकालिक हाती घेते काय, तिचे लक्ष नेमके याच मजकुराकडे जाते काय, या सर्व योगायोगाच्याच गोष्टी म्हटल्या पाहिजेत. आनंदीची वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा, त्या मागचे कारण, पतीचे प्रोत्साहन हे बघून ती अतिशय प्रभावित झाली. त्यांनी तिच्या अमेरिकेतील वास्तव्याची जबाबदारी घेण्याची तयारी दाखविली. तिने तात्काळ जोशी दाम्पत्याशी पत्रव्यवहार सुरू केला. पत्र व्यवहारात हिंदू धर्म आणि संस्कृती याबद्दल चर्चा होत गेली.
महिलांनी वैद्यकीय शिक्षण का घ्यायचे? - आनंदीचे पती गोपाळराव यांची पोस्ट खात्यातील सेवा कल्याणपासून सुरू झाली, पुढे अलिबाग आणि पुढे थेट कलकत्ता येथे त्यांचे पोस्ट खात्यात पोस्टिंग झाले होते. कलकत्त्यात असतांना आनंदीची प्रकृती पुन्हा बिघडली. अशक्तपणा, डोकेदुखी, ताप, श्वास लागणे यामुळे ती बेजार झाली. थिओडिशिया तिला अमेरिकेतून अौषधे पाठवीत होती पण गुण येत नव्हता. १८८३ मध्ये गोपाळरावांनी आनंदीला एकटीलाच अमेरिकेला पाठविले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आनंदीला हे पटत नव्हते. शेवटी गोपाळरावांच्या आग्रहामुळे ती वैद्यकीय अभ्यासासाठी जाण्यासाठी तयार झाली.
बहिष्कार घालण्याची धमकी - सनातनी हिंदूंनी बहिष्काराचे हत्यार उपसले. ख्रिश्चन लोकांचा तिला पाठींबा होता पण तिने ख्रिश्चन व्हावे, असे त्यांचे मत होते. आनंदीने आपल्या अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्यामागचा हेतू स्पष्ट करणारे भाषण केले. आपल्या आणि आपल्या पतीच्या होत असलेल्या छळाची कथा कथन केली. स्त्रियांनी वैद्यकीय शिक्षण घेणे कसे आवश्यक आहे, हे पटवून द्यायचा प्रयत्न केला. भारतात महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. मी कधीही ख्रिश्चन धर्म स्वीकारणार नाही, अशी घोषणा केली. तिच्या भाषणाला भारतभर प्रसिद्धी मिळाली. देणग्यांचा पाऊस पडायला सुरवात झाली. भारताच्या व्हॅाइसरॅायने २०० रुपयांची घसघशीत वर्गणी पाठविली.
महिलांची एकमेकींना साथ - थॅार्बॅार्न दाम्पत्याच्या शिफारसीने आनंदीला पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील विमेन्स मेडिकल कॅालेजमध्ये प्रवेश मिळाला. त्यांच्याच ओळखीच्या दोन इंग्रज महिलांच्या सोबतीने ती कलकत्त्याहून बोटीने न्यूयॅार्कला पोचली. कारपेंटर दाम्पत्य तिला घ्यायला न्यूयॅार्कला आले होते. यथावकाश अमेरिकेतीलच नव्हे तर महिलांसाठीच्या जगातील  पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयात भारतातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनीला प्रवेश मिळाला.
  आनंदीचे वैद्यकीय शिक्षण वयाच्या १९ व्या वर्षी सुरू झाले. तिच्या बिघडत चाललेल्या स्वास्थ्यावर प्रतिकूल थंड हवामान आणि सवय नसलेल्या अमेरिकन आहाराचा आणखीनच प्रतिकूल परिणाम झाला आणि तिला क्षयाची बाधा झाली. तशा परिस्थितीतही चिकाटीने आणि नेटाने अभ्यास करीत तिने १८ मार्च १८८६ मध्ये एम डी ही पदवी संपादन केली. 'आर्यन हिंदू  स्त्रियांच्या गरोदरपणीच्या समस्या', असा काहीसा तिच्या शोध निबंधाचा विषय होता. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने स्वत: पत्र पाठवून या यशाबद्दल आनंदीचे अभिनंदन केले.
भारतात परतली पण? - १८८६ मध्ये ती भारतात परत आली, तेव्हा तिचे भव्य स्वागत झाले. कोल्हापूर संस्थानात अल्बर्ट एडवर्ड हॅास्पिटलमध्ये महिलांसाठीच्या विभाग प्रमुखपदी तिची नेमणूक झाली. पण तिची प्रकृती खालावतच चालली होती, ती शेवटी बरी झालीच नाही. शेवटी वयाच्या २१ व्या वर्षी २६ फेब्रुवारी १८८६ ला तिचे निधन झाले. संपूर्ण भारत शोकाकूल झाला. तिची रक्षा थिओडिशिया कारपेंटरकडे अमेरिकेत पाठविण्यात आली. न्यूयॅार्क प्रांतातील पोखिप्सी गावामधील कारपेंटर कुटुंबीयांच्या दफनभूमीत  ती रक्षाही चिरविश्रांती घेत असलेल्या त्या कारपेंटर दाम्पत्याची सोबत करीत आहे.
स्मृती जागी ठेवण्याचे प्रयत्न - आनंदीच्या स्मृती जतन करण्याचे भारतात अनेक प्रयत्न झाले आहेत. कमलाकर सारंग दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ' ही तिच्या चरित्राचा व कार्याचा परिचय करून देणारी हिंदी मालिका दूरदर्शनवरून प्रसारित झाली होती. श्रीकृष्ण जनार्दन जोशी यांनी तिच्या चरित्रावर आधारित मराठी कादंबरी 'आनंदी गोपाळ'  लिहून तिला आदरांजली वाहिली आहे. आशा दामले यांनी याच कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद केला आहे तर राम जोगळेकर यांनी या कादंबरीचे नाट्यरुपांतर केले आहे. लखनऊस्थित इन्स्टिट्यूट फॅार रिसर्च अँड डॅाक्युमेंटेशन इन सोशल सायन्सेस या अशासकीय संघटनेने (एन जी ओ) आनंदीच्या नावे एक पारितोषिक ठेवले आहे. वैद्यकीयक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला हे पारितोषिक प्रदान केले जाते. अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया विद्यापीठातून १९ व्या शतकाच्या शेवटी पराकोटीचे कष्ट आणि ढासळती प्रकृती यांची पर्वा न करता एम डी ही पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला आनंदीबाई जोशी हिच्या नावे हे पारितोषिक प्रदान केले जाते. महाराष्ट्र शासनानेही महिलांचे स्वास्थ्य या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी तिच्या नावे फेलोशिप देऊ केली आहे.
  तिच्या अमेरिकेतील स्मृतिस्थळाला भेट देण्याची संधी  येताच ती सोडणे शक्यच नव्हते. त्या निमित्ताने तिच्या जीवन आणि कार्याची ही उजळणी! न्यूयॅार्क प्रांतातील पोखिप्सी गावी कारपेंटर कुटुंबीयांची कौटुंबिक दफनभूमी आहे. आनंदीने या जगाचा निरोप घेतांना इच्छा व्यक्त केली होती की आपली रक्षा कारपेंटरकुटुंबीयांच्या दफन भूमीत पुरण्यासाठी पाठविण्यात यावी. तिच्या इच्छेचा मान राखीत हे स्मृतिस्थळ भारतीय व अमेरिकन महिलांमधील पहिल्या सहकार्य व सहजीवनाची आठवण करून देत राहील.
त्या स्मृतिस्थळासमोर आम्ही नतमस्तक होऊन किती वेळ उभे होतो कुणास ठावूक? बाहेर पडतांना घड्याळात पाहिले तेव्हा साडेपाच वाजले होते. वेळेचे काटेकोर पालन करणाऱ्या अमेरिकेने त्या दफनभूमीचे प्रवेशद्वार चक्क एक तास उशिराने बंद केले होते!
Poughkeepsie, New York.





Sent from my iPad


(२३) स्कंक पुराण

(२३) स्कंक पुराण
वसंत गणेश काणे,  
 बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
दूरध्वनी - ९४२२८०४४३० / (०७१२)२२२१६८९
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन,
यॅार्क,  पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  एके दिवशी भल्या पहाटे आमच्या घरासमोरून गेलेल्या कारखाली एक प्राणी चिरडला गेला आणि आसमंतात असह्य दुर्गंध पसरला. तो सहन होत नव्हता पण सर्वजण, 'स्कंक' होता वाटतं असं म्हणून मुकाट्याने आपले दैनंदिन व्यवहार उरकू लागल्यामुळे माझे औत्सुक्य जागे झाले. शोध घेतला तेव्हा दिसले की, या प्राण्याची नोंद डार्विनने आपल्या बिगल जहाजावरील प्रवासादरम्यानच्या नोंदीत केलेली होती. डार्विनने लिहिले आहे, आम्हाला झोरिलाॅ किंवा स्कंक नावाचे प्राणी दिसले. अतिशय तीव्र व असह्य स्वरुपाचा दुर्गंध हे प्राणी पसरवतात. मांजरापेक्षा थोडा मोठा पण अधिक जाड असा हा प्राणी आहे. आपल्या दुर्गंध पसरवण्याच्या शक्तीची जाणीव असल्यामुळे तो सर्वसंचारी आहे. तो न माणसाला घाबरतो न कुत्र्याला. त्याने फवारलेल्या द्रवाच्या वास असह्य असतो. नाक गळू लागते. त्याचा संसर्ग झालेली वस्तू टाकून देण्याशिवाय गत्यंतर नसते. हा दुर्गंध एक मैल अंतरावरच्या व्यक्तीला सुद्धा जाणवतो. एकदा वारा जमिनीकडून समुद्राकडे वहात होता, बिगल जहाजावरचे आम्ही सर्व लोक या दुर्गंधाने त्रस्त झालो होतो. त्यामुळे कोणताही प्राणी त्याच्या वाट्याला तर जात नाहीच पण त्याला वाटही मोकळी करून देतो. या निमित्ताने डार्विनचा अभ्यास कसा सर्वस्पर्शी होता, निरीक्षण किती बारीक होते आणि नोंदी कशा अचुक होत्या, ते नव्याने जाणवले.
 
 पहिली नोंद(?) - या प्राण्याची रीतसर नोंद पाश्चात्यांनी १६३० साली घेतली, असे मानतात. याला पापाचे प्रतीक मानले आहे. याच्या शरीरावरील फर ( लोकरीसारखा) काळीकुळकुळीत, चकचकीत आणि चमकणारी असते. पाठीवर दोन पांढरे शुभ्र पट्टे असतात.ते समोर मानेकडे आणि मागे शेपटीकडे एकमेकाजवळ येऊन मिळतात. यामुळे हा प्राणी छान रुबाबदार व दिमाखदार दिसतो. शेपटी कोल्ह्यासारखी झुपकेदार असते.  या प्राण्यालाही खारीच्या शेपटीसारखी तिची कमान करता येते. शेपटी मात्र पांढरी असते. पण रुपडे जेवढे छान, तेवढाच दुर्गंध भयंकर. कोणत्याही गटारातून बाहेर पडणारा वास याची बरोबरी करू शकणार नाही. हृदय बंद पडणार, असे वाटू लागते. हा वास अनेक दिवस पर्यंत जात नाही.

  स्कंकचे भक्ष - स्कंकच्या अनेक जाती आहेत. सर्वात लहान अर्धा किलो वजनाचे तर सर्वात मोठे आठ किलो पर्यंत 'वजनदार' असतात. लांबी दीड ते दोन फूट इतकी असते. आखुड पण दणकट पायांना जमीन उकरता येईल, इतपत मोठी व शक्तिशाली नखे असतात.
  सर्वभक्षी असलेल्या या प्राण्याचे अन्न कीटकांपासून तो उंदीर, सरडे, बेडुक, साप आणि पक्षी असे सर्वप्रकारचे असते. फळे, पाने, गवत यांचेही त्याला पथ्य नाही. उकिरडे फुकंण्याची त्याची सवय निर्माण होण्याचे एक कारण हे असावे की, मांजरासारखे प्राणी आपल्या भक्षाचे मास पुरतेपणी खात नसतात. ते हाडांचे तुकडे हे प्राणी चाटूनपुसून साफ करतात.
मधमाशा व मध हाही यांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. फरमुळे हा स्वत: संरक्षित असतो. यांच्यापुढे मधमाशा नांगी टाकतात. प्रथम हल्ला करणाय्रा मधमाशांवरच हे 'स्टार्टरप्रमाणे' ताव मारतात. ही खाद्य संस्कृती मातेकडून पिल्लांकडे संक्रमित होत असते. जन्माला कारण एवढीच बापाची भूमिका असते.

जीवनक्रम - प्रजनन काळ सोडला तर हे प्राणी 'एकला चलो रे' पंथाचे आहेत. पण कडाक्याच्या थंडीत मात्र यांचा सहनिवास असतो. दिवसा ते बिळात राहतात. नर व माद्याची बिळे वेगवेगळी पण 'काॅमन वाॅल' सदृश असतात. थंडीत शीतस्वपन( हायबरनेशन) हा प्रकार या प्राण्यात नसतो. पण बाॅम्बहल्ल्यापासून संरक्षण व्हावे म्हणून माणसे ज्याप्रमाणे भूमिगत आश्रयस्थान निवडतात त्याप्रमाणे कडाक्याची थंडी असेल तर यांची झुंड जमिनीत एका ठिकाणी आश्रय स्वीकारून राहतात व एकमेकास बिलगून ऊबही देतात. पण ही पद्धत माद्यांमध्येच आढळते. 'नर एकला चलो रे', हाच मार्ग याही वेळी अनुसरतात. ही आश्रयस्थाने वर्षानुवर्षे तीच ती असतात.

 संवेदनांगे - या प्राण्यांचे नाक व कान चांगलेच तिखट असतात. पण दृष्टी मात्र अधू असते. दहा फुटा पलीकडचे त्यांना दिसत नसते. म्हणूनच कदाचित एक प्राणी आमच्या घरासमोरून जाणाय्रा कारखाली चिरडला गेला असावा. वृद्धत्व म्हणजे जास्तीतजास्त सात वर्षे. सामान्यत: आयुष्य एक वर्षाचे तर माणसाळलेले व माणसाच्या आश्रयाने व आधाराने जगणारे प्राणी दहा वर्षे पर्यंतही जगतात.
   
 बालसंगोपन - नर बहुस्त्रीक असतात. मादीचे गर्भारपण ६६ दिवसांचे असते. पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागताच नव्याने जन्माला येणाय्रा बाळांसाठी बिळे साफसूफ करून बिळात बाळंतिणीची खोली तीच तयार करते. एका वेळी चार ते सात पिलांना जन्म देते. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. तशीच ती लहानपणी ठार बहिरीही असतात. दोन महिने होईपर्यंत पिले आईच्या अंगावर पीत असतात. पण नंतर वयात येईपर्यंत आईच्या सोबतीनेच राहतात. बालसंगोपनात पित्याचा काहीही सहभाग नसतो.

अमोघ शस्त्र - स्कंक प्राण्याच्या शरीराला गुदद्वाराच्या दोन्ही बाजूंना  दुर्गंधी द्रव निर्माण करणाय्रा दोन ग्रंथी असतात. हा गंधकयुक्त पदार्थ आहे. यात 'थियाॅल' हा पदार्थ असतो. याला व्यावहारिक भाषेत 'मरकॅप्टन' असे म्हणतात. याचा दुर्गंध इतका तीव्र असतो की, शत्रू अक्षरश: पळ काढतात. याचा फवारा कपड्यावर उडाला तर वास जाता जात नाही. कपडे टाकून देता येतात. पण अंगावर उडाला तर काय करणार? या ग्रंथीतून उडणारा फवारा दहा फुटापर्यंत पिचकारीतून उडावा असा उडतो. यामुळे अंगाची आग होते, तात्पुरते अंधत्व येते आणि तुमच्यापासून एक मैलावर ( होय एक मैल!) असणाय्रालाही हा वास येतो, अर्थात वारा तुमच्याकडून त्या दिशेला वहात असला पाहिजे.

 उपाययोजना -  हा फवारा आपल्या अंगावर उडाला तर काय? यावर एक घरगुती उपाय इथे सांगितला जातो. टोमॅटोचा रस अंगावर घासून सतत तीन/चार दिवस सचैल स्नान करायचे.  पण बादलीभर टाॅमॅटोचा रस तयार करणे तसे कठीणच म्हणायला हवे. हायड्रोजन -पर -आॅक्साईड, बेकिंग सोडा आणि डिश वाॅशर मध्ये वापरायचा साबण हेही उपाय सांगितले जातात. शास्त्रीय दृष्ट्या सांगायचे तर उपाय म्हणून वापरायचा पदार्थ थियाॅल या विषारी घटकाचे विघटन करणारा असायला हवा, तसेच त्यापासून आपल्याला दुसरा एखादा त्रास व्हायला नको.

केवळ गल्लीतच नव्हे तर सर्वत्र शेर - आपल्या या सामर्थ्याची जाणीव असल्यामुळे हा प्राणी बेदरकारपणे वावरत असतो. इतर प्राणी त्याच्या वाय्रालाही उभे न राहता त्याला वाट मोकळी करून देतात. एखाद्या कुत्र्याला त्याच्यावर कुणी छू केले तर केवळ एक/दोन थेंबातच हा त्याला पळवून लावतो. त्याला पळता भुई थोडी होते. पण हे शस्त्र हा प्राणी अतिशय काळजीपूर्वक आणि नाइलाज असेल तरच वापरतो. अगोदर फिस्कारणे, पायांची आदळआपट करणे, शेपटीची कमान करणे असे सौम्य डाव आजमावून पाहतो. स्प्रे एकदा वापरला की दुसरा डोज ( १५ घन सेंटीमीटर) तयार व्हायला निदान पंधरा दिवस लागतात. या काळात मात्र तो बलहीन असतो. ही संधी कुत्री व घुबडे साधतात. या काळात तेही शेर असतात. स्वत: स्कंकावर बेधडक हल्ला करून त्याचा फडशा पाडतात. मात्र या शस्त्राचा उपयोग हे प्राणी आपापसात भांडतांना एकमेकावर करीत नाहीत. भांडणे बहुदा 'बीळ कुणाचे?', या निमित्तानेच होत असते. यावेळी ते दात व नखेच वापरून वेळ निभवतात.

मानवही काही कमी नाही.-  स्कंक माणसाला चावल्याची उदाहरणे नाहीत. माणूसही एक अजबच प्राणी म्हणायला हवा. स्कंकच्या विषारी ग्रंथी आॅपरेशन करून काढून टाकून त्याला माणसाळवणारा माणूस हा एक बहाद्दर प्राणीच म्हटला पाहिजे. काहींना हे नसते उपद्व्याप वाटतील. असे स्कंक मात्र चावा घेतात, अशी माहिती आहे. यामुळे रेबीज ( पिसाळलेला कुत्रा चावल्यास होणारा रोग) हा रोग होऊ शकतो. असे स्कंक पाळण्याची मुभा ब्रिटनमध्ये आहे पण अमेरिकेत आज अशी अनुमती नाही.
   असे आहे हे स्कंक पुराण! घरासमोरच एक स्कंक चिरडला जातो काय, त्याच्या वासाने आम्ही बेजार होतो काय,  आणि शोध घ्यायचा प्रयत्न करताच ही त्याची जीवनगाथाच उलगडते काय? सगळ्याच योगायोगाच्या गोष्टी. आम्हाला भोगावे व शोधावे लागले पण वाचकांना ही माहिती सहज व विनासायास मिळणार आहे. असतात एकेकाचे भोग आणि योग! दुसरे काय!

स्कंक पुराण
वसंत गणेश काणे,  
 बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
दूरध्वनी - ९४२२८०४४३० / (०७१२)२२२१६८९
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन,
यॅार्क,  पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  एके दिवशी भल्या पहाटे आमच्या घरासमोरून गेलेल्या कारखाली एक प्राणी चिरडला गेला आणि आसमंतात असह्य दुर्गंध पसरला. तो सहन होत नव्हता पण सर्वजण, 'स्कंक' होता वाटतं असं म्हणून मुकाट्याने आपले दैनंदिन व्यवहार उरकू लागल्यामुळे माझे औत्सुक्य जागे झाले. शोध घेतला तेव्हा दिसले की, या प्राण्याची नोंद डार्विनने आपल्या बिगल जहाजावरील प्रवासादरम्यानच्या नोंदीत केलेली होती. डार्विनने लिहिले आहे, आम्हाला झोरिलाॅ किंवा स्कंक नावाचे प्राणी दिसले. अतिशय तीव्र व असह्य स्वरुपाचा दुर्गंध हे प्राणी पसरवतात. मांजरापेक्षा थोडा मोठा पण अधिक जाड असा हा प्राणी आहे. आपल्या दुर्गंध पसरवण्याच्या शक्तीची जाणीव असल्यामुळे तो सर्वसंचारी आहे. तो न माणसाला घाबरतो न कुत्र्याला. त्याने फवारलेल्या द्रवाच्या वास असह्य असतो. नाक गळू लागते. त्याचा संसर्ग झालेली वस्तू टाकून देण्याशिवाय गत्यंतर नसते. हा दुर्गंध एक मैल अंतरावरच्या व्यक्तीला सुद्धा जाणवतो. एकदा वारा जमिनीकडून समुद्राकडे वहात होता, बिगल जहाजावरचे आम्ही सर्व लोक या दुर्गंधाने त्रस्त झालो होतो. त्यामुळे कोणताही प्राणी त्याच्या वाट्याला तर जात नाहीच पण त्याला वाटही मोकळी करून देतो. या निमित्ताने डार्विनचा अभ्यास कसा सर्वस्पर्शी होता, निरीक्षण किती बारीक होते आणि नोंदी कशा अचुक होत्या, ते नव्याने जाणवले.
 
 पहिली नोंद(?) - या प्राण्याची रीतसर नोंद पाश्चात्यांनी १६३० साली घेतली, असे मानतात. याला पापाचे प्रतीक मानले आहे. याच्या शरीरावरील फर ( लोकरीसारखा) काळीकुळकुळीत, चकचकीत आणि चमकणारी असते. पाठीवर दोन पांढरे शुभ्र पट्टे असतात.ते समोर मानेकडे आणि मागे शेपटीकडे एकमेकाजवळ येऊन मिळतात. यामुळे हा प्राणी छान रुबाबदार व दिमाखदार दिसतो. शेपटी कोल्ह्यासारखी झुपकेदार असते.  या प्राण्यालाही खारीच्या शेपटीसारखी तिची कमान करता येते. शेपटी मात्र पांढरी असते. पण रुपडे जेवढे छान, तेवढाच दुर्गंध भयंकर. कोणत्याही गटारातून बाहेर पडणारा वास याची बरोबरी करू शकणार नाही. हृदय बंद पडणार, असे वाटू लागते. हा वास अनेक दिवस पर्यंत जात नाही.

  स्कंकचे भक्ष - स्कंकच्या अनेक जाती आहेत. सर्वात लहान अर्धा किलो वजनाचे तर सर्वात मोठे आठ किलो पर्यंत 'वजनदार' असतात. लांबी दीड ते दोन फूट इतकी असते. आखुड पण दणकट पायांना जमीन उकरता येईल, इतपत मोठी व शक्तिशाली नखे असतात.
  सर्वभक्षी असलेल्या या प्राण्याचे अन्न कीटकांपासून तो उंदीर, सरडे, बेडुक, साप आणि पक्षी असे सर्वप्रकारचे असते. फळे, पाने, गवत यांचेही त्याला पथ्य नाही. उकिरडे फुकंण्याची त्याची सवय निर्माण होण्याचे एक कारण हे असावे की, मांजरासारखे प्राणी आपल्या भक्षाचे मास पुरतेपणी खात नसतात. ते हाडांचे तुकडे हे प्राणी चाटूनपुसून साफ करतात.
मधमाशा व मध हाही यांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. फरमुळे हा स्वत: संरक्षित असतो. यांच्यापुढे मधमाशा नांगी टाकतात. प्रथम हल्ला करणाय्रा मधमाशांवरच हे 'स्टार्टरप्रमाणे' ताव मारतात. ही खाद्य संस्कृती मातेकडून पिल्लांकडे संक्रमित होत असते. जन्माला कारण एवढीच बापाची भूमिका असते.

जीवनक्रम - प्रजनन काळ सोडला तर हे प्राणी 'एकला चलो रे' पंथाचे आहेत. पण कडाक्याच्या थंडीत मात्र यांचा सहनिवास असतो. दिवसा ते बिळात राहतात. नर व माद्याची बिळे वेगवेगळी पण 'काॅमन वाॅल' सदृश असतात. थंडीत शीतस्वपन( हायबरनेशन) हा प्रकार या प्राण्यात नसतो. पण बाॅम्बहल्ल्यापासून संरक्षण व्हावे म्हणून माणसे ज्याप्रमाणे भूमिगत आश्रयस्थान निवडतात त्याप्रमाणे कडाक्याची थंडी असेल तर यांची झुंड जमिनीत एका ठिकाणी आश्रय स्वीकारून राहतात व एकमेकास बिलगून ऊबही देतात. पण ही पद्धत माद्यांमध्येच आढळते. 'नर एकला चलो रे', हाच मार्ग याही वेळी अनुसरतात. ही आश्रयस्थाने वर्षानुवर्षे तीच ती असतात.

 संवेदनांगे - या प्राण्यांचे नाक व कान चांगलेच तिखट असतात. पण दृष्टी मात्र अधू असते. दहा फुटा पलीकडचे त्यांना दिसत नसते. म्हणूनच कदाचित एक प्राणी आमच्या घरासमोरून जाणाय्रा कारखाली चिरडला गेला असावा. वृद्धत्व म्हणजे जास्तीतजास्त सात वर्षे. सामान्यत: आयुष्य एक वर्षाचे तर माणसाळलेले व माणसाच्या आश्रयाने व आधाराने जगणारे प्राणी दहा वर्षे पर्यंतही जगतात.
   
 बालसंगोपन - नर बहुस्त्रीक असतात. मादीचे गर्भारपण ६६ दिवसांचे असते. पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागताच नव्याने जन्माला येणाय्रा बाळांसाठी बिळे साफसूफ करून बिळात बाळंतिणीची खोली तीच तयार करते. एका वेळी चार ते सात पिलांना जन्म देते. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. तशीच ती लहानपणी ठार बहिरीही असतात. दोन महिने होईपर्यंत पिले आईच्या अंगावर पीत असतात. पण नंतर वयात येईपर्यंत आईच्या सोबतीनेच राहतात. बालसंगोपनात पित्याचा काहीही सहभाग नसतो.

अमोघ शस्त्र - स्कंक प्राण्याच्या शरीराला गुदद्वाराच्या दोन्ही बाजूंना  दुर्गंधी द्रव निर्माण करणाय्रा दोन ग्रंथी असतात. हा गंधकयुक्त पदार्थ आहे. यात 'थियाॅल' हा पदार्थ असतो. याला व्यावहारिक भाषेत 'मरकॅप्टन' असे म्हणतात. याचा दुर्गंध इतका तीव्र असतो की, शत्रू अक्षरश: पळ काढतात. याचा फवारा कपड्यावर उडाला तर वास जाता जात नाही. कपडे टाकून देता येतात. पण अंगावर उडाला तर काय करणार? या ग्रंथीतून उडणारा फवारा दहा फुटापर्यंत पिचकारीतून उडावा असा उडतो. यामुळे अंगाची आग होते, तात्पुरते अंधत्व येते आणि तुमच्यापासून एक मैलावर ( होय एक मैल!) असणाय्रालाही हा वास येतो, अर्थात वारा तुमच्याकडून त्या दिशेला वहात असला पाहिजे.

 उपाययोजना -  हा फवारा आपल्या अंगावर उडाला तर काय? यावर एक घरगुती उपाय इथे सांगितला जातो. टोमॅटोचा रस अंगावर घासून सतत तीन/चार दिवस सचैल स्नान करायचे.  पण बादलीभर टाॅमॅटोचा रस तयार करणे तसे कठीणच म्हणायला हवे. हायड्रोजन -पर -आॅक्साईड, बेकिंग सोडा आणि डिश वाॅशर मध्ये वापरायचा साबण हेही उपाय सांगितले जातात. शास्त्रीय दृष्ट्या सांगायचे तर उपाय म्हणून वापरायचा पदार्थ थियाॅल या विषारी घटकाचे विघटन करणारा असायला हवा, तसेच त्यापासून आपल्याला दुसरा एखादा त्रास व्हायला नको.

केवळ गल्लीतच नव्हे तर सर्वत्र शेर - आपल्या या सामर्थ्याची जाणीव असल्यामुळे हा प्राणी बेदरकारपणे वावरत असतो. इतर प्राणी त्याच्या वाय्रालाही उभे न राहता त्याला वाट मोकळी करून देतात. एखाद्या कुत्र्याला त्याच्यावर कुणी छू केले तर केवळ एक/दोन थेंबातच हा त्याला पळवून लावतो. त्याला पळता भुई थोडी होते. पण हे शस्त्र हा प्राणी अतिशय काळजीपूर्वक आणि नाइलाज असेल तरच वापरतो. अगोदर फिस्कारणे, पायांची आदळआपट करणे, शेपटीची कमान करणे असे सौम्य डाव आजमावून पाहतो. स्प्रे एकदा वापरला की दुसरा डोज ( १५ घन सेंटीमीटर) तयार व्हायला निदान पंधरा दिवस लागतात. या काळात मात्र तो बलहीन असतो. ही संधी कुत्री व घुबडे साधतात. या काळात तेही शेर असतात. स्वत: स्कंकावर बेधडक हल्ला करून त्याचा फडशा पाडतात. मात्र या शस्त्राचा उपयोग हे प्राणी आपापसात भांडतांना एकमेकावर करीत नाहीत. भांडणे बहुदा 'बीळ कुणाचे?', या निमित्तानेच होत असते. यावेळी ते दात व नखेच वापरून वेळ निभवतात.

मानवही काही कमी नाही.-  स्कंक माणसाला चावल्याची उदाहरणे नाहीत. माणूसही एक अजबच प्राणी म्हणायला हवा. स्कंकच्या विषारी ग्रंथी आॅपरेशन करून काढून टाकून त्याला माणसाळवणारा माणूस हा एक बहाद्दर प्राणीच म्हटला पाहिजे. काहींना हे नसते उपद्व्याप वाटतील. असे स्कंक मात्र चावा घेतात, अशी माहिती आहे. यामुळे रेबीज ( पिसाळलेला कुत्रा चावल्यास होणारा रोग) हा रोग होऊ शकतो. असे स्कंक पाळण्याची मुभा ब्रिटनमध्ये आहे पण अमेरिकेत आज अशी अनुमती नाही.
   असे आहे हे स्कंक पुराण! घरासमोरच एक स्कंक चिरडला जातो काय, त्याच्या वासाने आम्ही बेजार होतो काय,  आणि शोध घ्यायचा प्रयत्न करताच ही त्याची जीवनगाथाच उलगडते काय? सगळ्याच योगायोगाच्या गोष्टी. आम्हाला भोगावे व शोधावे लागले पण वाचकांना ही माहिती सहज व विनासायास मिळणार आहे. असतात एकेकाचे भोग आणि योग! दुसरे काय!

(२२) आठवणी ११ सप्टेंबरच्या (नाईन एलेव्हनच्या)

(२२) आठवणी ११ सप्टेंबरच्या (नाईन एलेव्हनच्या)
वसंत गणेश काणे
न्यूयाॅर्कमध्ये ‘नॅशनल सप्टेंबर ११ मेमोरियल ॲंड म्युझियममध्ये’ एक फोल्डर ठेवलेले असून त्यात ट्विन टाॅवरच्या विध्वंसात मृत्यूमुखी पडलेल्या जवळजवळ ३००० व्यक्तींची नावे त्यांच्या जन्मतारखेनुसार चढत्याक्रमात (सुरवात जानेवारीपासून व शेवटाला डिसेंबर याप्रकारे) नोंदवलेली आढळतात. मेमोरियल व म्युझियम उघडायच्या अगोदर सकाळी कुणीना कुणी तिथे येते. फोल्डर उघडून त्या दिवशीच्या तारखेचे पान उघडते, त्यावर असलेली नावे लिहून काढते, फ्रिज उघडते, बळी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीगणिक पांढऱ्या गुलाबाचे एक फूल बाहेर काढते. ह्या त्या व्यक्ती असतात की जर त्या जीवित असत्या तर त्या दिवशी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला असता.
 नंतर ती व्यक्ती मेमोरियल भोवती असलेल्या पॅरापिट वाॅलपाशी जाते. या वाॅलवर बळी गेलेल्या व्यक्तींची नावे फोल्डरमधल्याच  क्रमानुसार तारीखवार  कोरलेली आहेत. नावाच्या पहिल्या अक्षरावर ती गुलाबपुष्प वाहते.  गुलाबपुष्प व नाव दिसेल अशी दोन छायाचित्रे घेते, एका छायाचित्रात नाव, फूल व पार्श्वभूमी म्हणून पॅरापिट वाॅल असते तर दुसऱ्यात क्षितिजाची पार्श्वभूमी असते. ही दोन्ही छायाचित्रे संबंधितांच्या कुटुंबीयांकडे त्याच क्षणी ईमेलने रवाना होतात. आतापावेतो म्युझियम उघडायची वेळ झालेली असते. ही व्यक्ती तिथून एक शब्दही कुणाशी न बोलता आल्या पावली निघून जाते.
 कुणाना कुणा व्यक्तीचा हा क्रम वर्षानुवर्षे अव्याहत सुरू आहे. आज तिथे आलेली व्यक्ती काहीशी वेगळी आहे. ११ सप्टेंबरला विमान टाॅवरला धडकल्यानंतर ४८ व्या मजल्यावरून खाली उतरून जिचा जीव वाचला होता ती ही व्यक्ती. म्युझियम एप्रिल २०१२ मध्ये तयार झाले होते. स्वत:ची सतत भळभळणारी आठवण थोडीतरी शांत व्हावी म्हणून तसेच अतिरेकी हल्यात बळी पडलेल्यांचे पुण्यस्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा त्याचा हा दिनक्रम अव्याहत सुरू आहे. ज्यादिवशी त्याला सवड असते, ते दिवस ही व्यक्ती  म्युझियमच्या निदेशकाला कळवते. यासाठीची फुले एक फुलविक्रेत्याने देऊ केलेली असतात.
१९९३ मध्ये हल्ला झाला तेव्हा बाहेर आल्यावर इतरांना मदत करण्यासाठी ही व्यक्ती थांबली होती. पण तिला तेव्हा फर्स्ट एडची माहिती नव्हती. आता त्या व्यक्तीने आवश्यक ते शिक्षण घेतले आहे. या सामान्य नागरिकाचे नाव आहे, जाॅर्ज मिरोनिस.


सावरलो कसे ते आठवतं
अनुवाद - वसंत गणेश काणे
११ सप्टेंबर म्हटले अमेरिकनांसमोर उभा राहतो अतिरेक्यांनी केलेला विवेकशून्य विध्वंस, विनाश. पण खरं सांगायचं तर माझ्या त्या आठवणी आता पुसट झाल्या आहेत.
 आजही मी खिडकीतून बाहेर पाहतो तेव्हा ट्विन टाॅवर्स दिसू लागतात. सूर्यप्रकाशात लखाखणारे. त्यावेळी शाळेत आमचा सोशल स्टडीजचा तास सुरू होता. कुणीतरी माहिती दिली ट्विन टाॅवर्सवर दोन विमाने येऊन धडकल्याची. शाळेतून घरी परततांना ट्विन टाॅवर्सच्या जागी फक्त धुराळा दिसत होता. माझ्या वडलांना त्या दिवशी घरी यायला खूप उशीर झाला होता. ते वाटेतच अडकून पडले होते.
आमच्या अगोदरच्या पिढीच्या स्मरणात पर्ल हार्बर वर झालेला जपानी हल्ला होता तसेच जाॅन एफ केनडीच्या खुनाची बातमी होती. मी वयाच्या बाराव्या वर्षी ट्विन टाॅवर्सवरचा हल्ला अनुभवत होतो.
पण न्यूयाॅर्क, वाॅशिंगटन किंवा शॅंक्सविले येथे आम्ही काय गमावले यापेक्षा त्यानंतर जे घडले त्याच्या आठवणी माझ्या मनात सतत घोटाळत असतात.
  मला आठवते ते ज्या ठिकाणी (झिरो ग्राऊंडवर) ट्विन टाॅवर्स होते तिथे झेंडा उभारतानाचे अग्निशमन दलाच्या तीन वीरांचे फ्रॅंकलीनने टिपलेले छायाचित्र, अध्यक्ष जाॅर्ज बुश यांचे भाषण, जाॅन स्टीवर्ट्स च्या विडंबनपर ‘दी डेली शो’चा पहिला भाग (एपिसोड).
विनाश नाही आठवत मला, मला आठवते पुनर्स्थापना
धुळीला मिळाले ते सुंदर मिनार पुन्हा गजबजण्यासाठी.
  इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात नसलेला धडा त्या दिवशी मी शिकलो. माजी अध्यक्ष कोलरीज म्हणाले होते, ’पुढे चला’. यातूनच आजवरचे मानवजातीसमोरचे प्रश्न सुटले होते आणि भविष्यातही सुटणार आहेत.
जीवन साधं, सोपं कधीच नसतं. सगळं कसं सुरळीत चाललंय असं वाटत असतांनाच एक दान नेमकं उलटं पडतं. अमेरिकेसाठी ११ सप्टेंबर हे असं दान होतं. देशाची वीण ताणली गेली  पण वाकली नाही की खचली नाही. उलट देश पुन्हा सावरून ताठ उभा राहिला.
 हे जे घडत गेलं, त्याच्याच आठवणी ताज्या आहेत . न्यूयाॅर्कचं क्षितिज(स्काय लाईन) दिसायला लागलं की घरी आल्यासाखं वाटायचं. आता मोठा झालो आहे. आता त्या क्षितिजाला एक वेगळाच अर्थ लाभला आहे. जीवनात कोणते का प्रसंग येईनात, मी पुन्हा सावरून उठेन, वाढत्या जोमानं.
  जे गेले त्यांना, जे गमावले त्याला व तेव्हापासून जे बदलले त्यालाही मी कधीच विसरू शकणार नाही. - ॲंथोनी मॅकेन्स्की, वार्ताहर, याॅर्क डेली रेकाॅर्ड


(२१)माझी दुसरी अमेरिका वारी

माझी दुसरी अमेरिका वारी
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
दिनांक १३ मी २०१४ ला युनायटेड एअर लाइन्सच्या विमानाने अमेरिकेतील पेन्सिव्हॅनिया प्रांतातल्या यॉर्क (न्यूयॉर्क नव्हे) या गावी जाण्याचे निश्चित झाले होते. हा निर्णय तसा एक वेगळाच निर्णय होता. ही फ्लाईट कुठेही न थांबता सतत १५ तास उड्डाण करीत नेवार्कला पोचणार होती. ब्रेक जर्नीचा पर्याय होता. पण भाषेची अडचण नको, तसेच काही तास मध्येच कुठेतरी खोळंबून राहण्यापेक्षा सलग १५ तास प्रवासाचा पर्याय निवडला. नागपूर ते पुणे बसने सलग प्रवास करण्याचा अनुभव गाठीशी होता, तसेच २००९ मध्ये असा प्रवास केलेलाही होता. एअर इंडियाने नागपूर ते मुंबई असा प्रवास करून दुपारी ११ चे सुमारास मुंबईच्या डोमेस्टिक एअर पोर्टवर पोचल्यावर पवई येथील श्री विनायक लेले यांच्या गेस्ट हाऊसमध्ये संध्याकाळपर्यंत विश्रांती घेऊन इंटरनॅशनल एअरपोर्टवर टॅक्सीने  दाखल झालो. इथपर्यंत शैलेश आणि संगीता साथ व सोबत म्हणून सोडायला आले होते.
कडक तपासणी
पासपोर्ट व तिकीटाच्या तपासणीचा सोपस्कार आटोपला आणि समान ढकलत आमची स्वारी बोर्डिंग पास मिळविण्यासाठी रांगेत उभी राहिली. सामानावर लावावयाच्या पट्ट्या हाती मिळाल्यावर तपशील भरण्यास सुरवात करतो न करतो तोच एक तरूण अधिकारी समोर येऊन उभा राहिला. कोण कुठले, कोणाकडे ,कशासाठी जाणार यांची चौकशी झाली. सामानात काय काय आहे, हेही विचारले. तुम्हाला आता इथे कुणी भेटले का, असे कुणी भेटल्यास त्याने तुम्हाला काही वस्तू दिल्या का असे विचारून झाल्यानंतर असे झाल्यास कुणाकडूनही कोणतीही वस्तू घेऊ नका, असे त्या अधिकारऱ्याने बजावले. अतिरेक्यांचा उपद्रव सुरु झाल्यापासून विमानतळावर अशाप्रकारची तपासणी सुरु झाली आहे. मला या गोष्टीचे अतिशय समाधान वाटले. पण हे समाधान अल्पकाळ टिकले. ही सर्व तपशीलवार चौकशी झाल्यानंतर बोर्डिग पास मिळाला. ७६ क्रमांकाच्या गेट मधून विमानात असायला जायचे होते. वेळ होता म्हणून इकडे तिकडे भटकायला सुरवात केली.
अनाहूत पाहुणा
एवढ्यात विमानतळावरच्या एका अधिकाऱ्याने एका माणसाला हटकले. त्याच्याजवळ कुठलासा पासपोर्ट होता पण तो तिथे कशासाठी आणि कसा काय आला होता, ते त्याला सांगता येत नव्हते. माणूस ओशाळल्या सारखा वाटत होता. आपण सहजच तिथे आल्याचे तो सांगत होता. अनाहूतपणे कुणीही प्रवेश करू नये म्हणून केलेली भरभक्कम तटबंदी मोडीत काढून ही व्यक्ती तिथपर्यंत पोचलीच कशी यामुळे सगळे हादरले होते. त्याची आणखी चौकशी करण्यासाठी त्याला तिथून नेण्यात आले. मी आपल्या जागी येऊन बसलो. पण पाहिलेल्या प्रसंगामुळे मनात उठलेले काहूर काही केल्या थांबत नव्हते. माझी तीनदा चौकशी व तपासणी झाली होती. ही सर्व प्रकारची व्यवस्था मोडीत काढून ही व्यक्ती आगदी आतपर्यंत पोचावी याचे आश्चर्य वाटत होते. शेवटी एक गोष्ट खरी आहे की, सावापेक्षा चोराची बुद्धी श्रेष्ठ प्रतीची असते. पुढे काय झाले ते कळले नाही. कितीही काळजी घेतली तरी असे प्रकार होणारच हे जाणवले. ‘सदा सावधानतेला’ पर्याय नाही, हे जाणवले. तसेच सुरक्षा व्यवस्थेची नित्य तपासणी करणे आवश्यक असते आणि सुधारणेला वाव असतोच असतो, हेही लक्षात आले.
विमानात बसताबसता पुन्हा एकदा तपासणी झाली पादत्राणेही तपासली गेली. या निमित्ताने त्रास नक्कीच होतो, पण खबरदारीची  आवश्यकताही पटते. मात्र त्या अनाहूत पाहुण्याचा विचार काही मनातून जात नव्हता. विशेष काही नसेलही पण त्याचे तिथे येणे व असणे, ही बाब कडेकोट व्यवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्या यंत्रणेसाठी एक आव्हानच असणार यात शंका नाही.
सगळे तपशील नोंदवले होते
प्रत्येक प्रवाशाच्या खुर्ची समोरच्या खुर्चीच्या पाठीवर  मॉनिटर स्क्रीन होता. त्यावर खेळ खेळता येतात, सर्व प्रकारचे चित्रपट पाहता येतात आणखी खूप काही करता येतं. मला आकर्षण वेगळ्याच गोष्टीचं होतं. विमान  प्रवासाचे सगळे तपशील पाहण्याची सोय होती.
मुंबई ते नेवार्क हे अंतर ८००० मैलान्पेक्षा (किलोमीटर नाही) जास्त आहे. म्हणजे १२,००० किलोमीटरपेक्षा जास्त होतं. विमानाने सर्व सोपस्कार आटोपल्यावर आकाशात झेप घेतली. काही वेळातच ३५,००० फुट उंची गाठली. विमानाबाहेरचे उष्णतामान (नव्हे थंडीचे मान) – (उणे) ५० डिग्री  फॅरेनहाईट होते. म्हणजे – (उणे) १०(-५०) डिग्री सेंटिग्रेड होते.(-५०-३२= -९२/९ = -१०  विमानाचा वेग तशी ५०० मैल होता. किती अंतर कापले किती अंतर राहिले, याचा हिशोब मांडला जात होता.  आम्ही अह्म्दाबाद्व्रून पुढे गेलो. आता पाकिस्तान लागले. मग अफगाणिस्तान, नंतर रशिया दिसू लागला. त्यानंतर नॉर्वे वरून आम्ही उडत चाललो होतो. काळी कुठेतरी डंकर्क असावे. दुसऱ्या महायुद्धात याच ठिकाणी हिटलरच्या फौजांनी इंग्लंडच्या आणि त्यांच्या मित्र  राष्ट्रांच्या फौजांची कोंडी केली होती. सर्व युद्धसामग्री तशीच टाकून सैनिकांना इंग्लंडला परत आणण्यात आले होते. चर्चिलने या माघारीला ‘यशस्वी माघार’ (सक्सेसफुल रिट्रीट) म्हणून संबोधले होते. शास्त्रे काय पुन्हा तयार करता येतील पण एकेक सैनिक लाखमोलाचा होता. सैन्य वाचले होते. पुन्हा शस्त्रे नव्याने तयार करून काही वर्षांच्या तयारीनंतर जनरल आयसेनहोवरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड आणि मित्र राष्ट्रांच्या फौजा नॉर्मंडी बीचवर उतरल्या आणि युद्धाचे पारडे फिरले. माझी नजर नॉर्मंडी बिच्च शोध गेट होती पण आम्ही त्यापासून खूप दुरून उडत चाललो होतो. एवढ्यात हेलसिंकीची नोंद दिसली. आम्ही निम्मे अंतर पार केले होते. आता बाहेरचे  उष्णतामान (थंडीचे मान) – (उणे) एकोणसाठ डिग्री फॅरेनहाईट इतके होते. म्हणजे –उणे १०(-५० )डिग्री सेंटिग्रेड होते. आम्ही रात्री अकरा वाजता मुंबईहून निघालो होतो. घड्याळात भारतातले सकाळचे सात वाजले होते. म्हणजे अमेरिकेतले रात्रीचे साडेनऊ वाजले असणार. वेळेचा हिशोब सोपा आहे. आपल्या वेळेत अडीच तास मिळवायचे आणि दिवसाची रात्र करायची किंवा रात्रीचा दिवस करायचा. म्हणजे यॉर्कमधली वेळ समजते. आता विमान ३६०० फुटावरून उडत चालले होते. आठ तास उडत होतो, आता आणखी सात तास बाकी होते आणि ४,००० मैल उड्डाण बाकी होते. कुठल्याही कामाचा निम्मा टप्पा पार पडला की उरलेला टप्पा लवकर पार पडतो आहे, असे वाटू लागते. आमचेही तसेच झाले होते. यावरून एक गोष्ट जाणवली. सर्व जगाने सी जी एस(सेंटीमीटर ,ग्रॅम, सेकंद)  सिस्टी म स्वीकारली अमेरिका मात्र अजून एफ पी एस(फूट,पाउंड, सेकंद) सिस्टीमचाच आग्रह धरून आहे.
काय हवे ते सांगा
प्रवासात खाण्यापिण्याची चंगळ होती. याचे पैसे विमान भाड्याबरोबरच घेतलेले होते. बहुतेक प्रवासी शाकाहारी होते. जेवणात बासमती तांदुळाचा भात फुलकोबीची रस्सा भाजी पालकाची पातळ भाजी, दही, सलाद, बन पाव, असा बेत होता. फ्रुट जूस, चहा , कॉफी पेये अधूनमधून विचारली जात होती. मी लिहिण्य्साठी कागद मागितला. तो मात्र नव्हता. मी शेवटी टिशू पेपरवर मुद्दे नोंदविण्यास सुरवात केली. हवाई सुंदऱ्यांना मी बहुदा दुर्वास ऋषी वाटलो असेन. कारण जवळजवळ प्रत्येकाची फरमाईश त्या पूर्ण करीत होत्या. पण मला मात्र त्यांना ‘व्हेरी सॉरी’ म्हणावे लागले. पण चेहऱ्यावर अपराधी भाव  होता. परत वेळेला जाताना त्यांच्या जवळ नक्की एखादी वही किंवा कोरे कागद असतील, याची खात्री वाटते.
पुढची पिढी कशी असेल
   मुंबईलाच एका वृद्ध महिलेशी थोडेसे बोलणे झाले होते. तिचा मुलगा व सून अमेरिकेत एका गावी राहत होते. पण नातवाला सात तासाच्या अंतरावर (विमान सात तासात तशी ५००मैल वेगाने जाईल तेवढ्या अंतरावर) नोकरी करीत होता. तो आठवड्याचे पाच दिवस नोकरीच्या गावी रहायचा आणि शनिवार रविवारी ‘घरी’ यायचा. नातसून सासुसासऱ्यासोबतच राहत होती.मी म्हटले पुढच्या पिढीत आईबाप पृथ्वीवर, एक मुलगा अमेरिकेत, दुसरा मंगळावर आणि तिसरा चंद्रावर अशी स्थिती असणार बहुतेक!  यावर आम्ही दोघेही हसलो. महिलेच्या चेहऱ्यावर विषादाची छटा उमटलेली दिसली. तिला स्म्ज्वण्याच्या दृष्टीने मी म्हटले, ‘आपण आलटून पालटून एकेकाकडे रहावे’, म्हणजे झाले. यावर ती हसली, मीही हसलो. प्रवासात ही गोष्ट अधून मधून आठवत होती. तिने आपल्या सोबत दोन भल्यामोठ्या पेट्या घेतल्या होत्या. नेवार्कला उतरल्यावर त्या दिसल्या. ‘एवढे काय घेऊन चाललात?’, मी विचारले. ‘अहो, न्यावे तेवढे हवेच असते, तरी काही जिन्नस वगळून ठेवले आहेत. ते पुढच्या वेळेस नेणार आहे’, ती हसत म्हणाली. मीही हसलो. ती पुढे म्हणाली ‘आपल्याला थोडेच वाहून न्यायचे असते?’. बाईला उरक खूप होता. तिच्यासाठी ‘व्हील चेअरची’ आणि ‘सामानासाठी पोर्टरची’ अशी व्यवस्था करून ठेवलेली होती.
आपल्या सवयी
या प्रवासात एक विचित्र अनुभव आला. विमानातल्या स्वच्छ्तागृहांमध्ये पाण्याऐवजी कागदाचा उपयोग करायचा असतो. स्वच्छ्तागृहात गेलो तर सर्वत्र कागदाचे तुकडे पडलेले दिसले. वापर केल्यानंतर ते कुणीतरी ते तिथेच टाकले होते. सर्वत्र दुर्गंध पसरला होता. मी तसाच बाहेर आलो. काय करावे ते कळेना. रागाची जागा उद्विग्नतेने घेतली. मग विचार करीत बसलो. शेवटी महात्मा गांधी आणि गाडगेबाबांचे स्मरण करून पुन्हा स्वच्छ्तागृहात गेलो. टिशू पेपरचा एक लांबलचक तुकडा फाडला आणि सर्व तुकडे काळजीपूर्वक उचलले आणि त्यांची विल्हेवाट लावली. विमानातून उतरायची वेळ झाली तेव्हा पुन्हा स्वच्छ्तागृहात गेलो तो पुन्हा तोच प्रकार दिसला. कुणाला तरी वापर करण्याचे ज्ञान नव्हते हे लक्षात आले. पुन्हा स्वच्छता केली आणि बाहेर आलो. मग विचार मनात आला की, अस्वच्छता कुणालाच आवडत नसते. हे अज्ञानापोटी होत असले पाहिजे. तसेच स्वच्छतेच्या कल्पना वगवेगळ्या असतात. १९७० सालची गोष्ट आहे. एका कुटुंबात सकाळ, दुपार, संध्याकाळ अशी त्रिकाल स्नानाची प्रथा होती. पण घरातल्या लहानग्याला ते दारापुढे बसवत असत. तसलाच काहीसा हा प्रकार असला पाहिजे. असो.
कस्टमवाले खरे पारखी
जसजशी अमेरिका जवळ येऊ लागली तसतसा विमानाचा वेग ताशी ५०० मैलापेक्षा जास्त होऊन तो आता ताशी ६०० मैल इतका झाला होता. याचा परिणाम असा झाला की आमची फ्लाईट ‘बिफोर टाईम’ नेवार्कला पोचली. सामानाची किंचितही तपासणी न होता कस्टम क्लिअर्न्स मिळाले. त्या लोकांना निर्ढावलेले आणि बावळट यांच्यातला फरक कळत असावा, असे कुणीतरी म्हणतांना मी ऐकले. ते न ऐकलेसे करून आम्ही घराकडे कारमधून कूच केले.  

Tuesday, October 2, 2018

(२०) माझा असाही प्रवास

 माझा असाही प्रवास
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
दूरध्वनी - (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   मानवी जीवनात योगाचे आणि योगायोगाचे अनेक प्रसंग येत असतात. पाच महिन्यांच्या दीर्घ कालखंडानंतर अमेरिकेतून भारतात मायदेशी परत येत असतांना आम्ही याॅर्क ते नेवार्क हे अंतर कारने पार करीत होतो. वाटेत अभूतपूर्व पावसाने व वादळाने झोडपून काढले. मार्गात बहुदा चांगलाच मोठा अपघात झाला होता. वाहने मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होती. त्यामुळे प्रथम उलट दिशेने तोंड करून काही अंतर कापून वेगळी वाट धरावी लागली. पण 'वादळवाट' आमची पाठ सोडत नव्हती. रात्री ८.४५ चे विमान होते. चार तासांचा अवकाश ठेवून निघालो होतो. प्रत्यक्षात जेमतेम दोन तासच शिल्लक असतांना नेवार्कला पोचलो.
   विमानात प्रवेश
   केबीनमध्ये ठेवायची बॅग ४५ पाऊंडच वजन दाखवत होती. त्यामुळे हायसे वाटले. ती केबिनमध्ये टाकली. इथूनच ओम्कार व अनुषा ही नातवंडे आणि अजित हा मुलगा परत फिरले. एक बॅग व एक आधुनिक 'दप्तर' एवढेच सामान सोबत होते. सिक्युरिटी तपासणी होऊन १२३ क्रमांकाच्या गेटपाशी येऊन थांबलो. आजूबाजूला इतरांच्या बॅगांकडे बघितले तो लक्षात आले की, बॅगांना टॅग्जच लावायची राहिली होती. ती मिळवण्यासाठी परत फिरलो. सिक्युरिटी चेक करणाऱ्या जवळ टॅग्ज नव्हती, ती कुठे मिळतील हे ते सांगू शकत नव्हते. हे आम्हाला माहित नसते, ते युनायटेड एअर लाईन्सवालेच जाणोत, असे ते म्हणत होते आणि आणखी आत प्रारंभ बिंदूकडे जाऊही देत नव्हते. शेवटी त्यातला एक म्हणाला गेटवरच विचारा. त्यांच्याजवळही टॅग्ज असतात. ते ती तुम्हाला देतील. पुन्हा गेटपाशी परत आलो. इतरांच्या बॅग्जना टॅग्ज लावलेली होती. ते ती कुरवाळण्याचे निमित्ताने पक्की धरून ठेवत होती. तेवढ्यात गेटवरची उद्घोषिका आली. तिच्यासमोर ओशाळवाणा आणि अपराधी चेहरा करून उभा राहिलो. माझी अडचण तिला समजेल अशा शब्दोच्चारासह मी तिला सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. तिला ते त्यामुळेच कळत नव्हते. शेवटी तिला एकदाचा अर्थबोध झाला. तिने मला विचारले तुम्हाला इथे कुणी येऊ दिले? शक्य तेवढा अपराधी व बावळट चेहरा करीत ( यासाठी मला मुद्दाम प्रयत्न करावे लागत नाहीत, असे मला ओळखणाऱ्यांचे प्रामाणिक मत मला माहित होते) मी अंगठ्यानेच पाठीमागे बोटाने इशारा केला. तिने एकजळजळीत कटाक्ष त्या दिशेने टाकला. त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला. तुमच्याजवळ टॅग्ज आहेत का? , मी धैर्य एकवटून पण खरे सांगायचे तर पुरेसे धैर्य एकवटले नसतांनाच विचारले. तिने माझ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकीत म्हटले,'आय मस्ट सी दी बॅग्ज फर्स्ट. व्हेअर आर दे?' मी पुन्हा अंगठा दाखवला, अर्थात आता विरुद्ध दिशेकडे. माझ्या बावळटपणाची कमाल मला तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.  ' मे आय ब्रिंग देम हिअर?', मी तरखडकरी संकेत पाळत 'कॅन'  असा शब्दप्रयोग न करता 'मे' असा शब्दप्रयोग करीत म्हटले. आता तिच्या चेहऱ्यावर 'मूर्तिमंत कीव मजसमोर उभी राहिलेली' मी पहात होतो. हायसे वाटून मी शक्य तेवढ्या लगबगीने बॅग्ज घेऊन आलो आणि चेहऱ्यावर पुन्हा एकदा अपराधी भाव आणित उभा राहिलो. आता तिच्या चेहऱ्यावरील कीव दाखवणारे भाव क्षणार्धात अंतर्धान पावले होते. त्यांची जागा आता तुच्छतादर्शक भावांनी घेतली होती.
  ' ओ दीज स्माॅल बॅग्ज?' असे म्हणत ती म्हणाली, 'दीज नीड नाॅट हॅव टॅग्ज'. काय बावळटपणा असेच बहुदा स्वत:शीच पुटपुटत ती परत फिरली. 'आत सोडतील तेव्हा गेटवर तुम्हीच असाल नं?' मी खुंटी हलवून पक्की करण्याच्या हेतूने म्हटले. तिने मागे वळून पाहण्याचे देखील कष्ट घेतले नाहीत. एक सहप्रवासी हे सर्व बघत होता. 'कशाला विचारण्याच्या भानगडीत पडलात? अशा गोष्टी दडपून न्यायच्या असतात.' मी होय म्हणत बॅगांकडे पाहिले. त्या कुठे आणि कशा दडपता आल्या असत्या? असा प्रश्न मनात आला पण पोक्तपणाने मी तो विचार बाजूला सारला. असा पोक्तपणा हा माझा स्थायी भाव आहे. तो म्हणाला, 'मी सगळे बारकाईने पाहत होतो. तिने तुम्हाला फारच 'हे' केले असते तर मी तिचे चालू दिले नसते. ह्या काय दोन जास्तीच्या टॅग्ज माझ्या खिशात आहेत. असोत म्हणून मी त्या घेऊन ठेवल्या होत्या.' त्याने त्या टॅग्ज माझ्यासमोर लंबकाप्रमाणे हलवत म्हटले. मी त्या टॅग्ज घेतल्या नाहीत. माणसात स्वाभीमान नावाचीही गोष्ट असते, हे मला त्याला जाणवून द्यायचे होते. अशी संधी मी सहसा हातची जाऊ देत नाही.
   मी जागेवर स्थानापन्न होतो
  यथावकाश आस्मादिक आपल्या ३२ फ या जागेपाशी आले. जवळची इलेक्ट्रॅानिक उपकरणे 'स्वीच आॅफ' करायची होती. माझ्याजवळ दोन मोबाईल होते. एक जुनापाना नोकिया होता. तो मी नागपुरात वापरतो. तो तितपतच कामाचा आहे. नवीन ॲंन्ड्राॅईड आहे. तो मुख्यत: व्हाॅट्स अपसाठी वापरतो. आय पॅड स्वीच आॅफ करण्याची गरज नसते. तेवढ्यात घोषणा झाली विमानात 'वाय फाय' उपलब्ध करून देणार होते. पण त्यासाठी वीस डाॅलर लाणार असे वाटल्यावरून तो विचार मी बाजूला सारला. समोरच्या सीटवर एक जोडपे जुळ्या तान्हुल्यांना घेऊन बसले होते. दोन भाग केलेले एक टोपले त्यांनी समोर ठेवले होते. एकेका भागात एकेक तान्हुले पहुडले होते. या जोडप्याची विमान कर्मचाऱ्याशी बरीच बाचाबाची झाली होती. मी आपल्या जागेवर आलो तेव्हा विषय सामोपचाराने मिटला आहे, हे जाणवले. 'आम्हाला माफ करा', असे तो कर्मचारी म्हणत असावा, असा मी तर्क केला आणि 'अहो चालायचच, माफी कसली मागता?', असे ते जोडपे आळीपाळीने आपापल्या भाषेत म्हणत असावेत, हे कळायला मला वेळ लागला नाही. माझ्या टॅग्ज न लावताच आत आणलेल्या बॅग्ज ठेवण्यासाठी वरच्या 'कपाटाची खिट्टी ' फिरवताच त्यातून डोक्यावर अनेक कोरड्या व ओल्या वस्तूंचा वर्षाव व्हायला सुरवात झाली. लहानपणी संक्रांतीला आपली अशीच लूट झाली असावी, असा विचार मनात आला. त्यावेळी बोरे, उसाचे तुकडे, वाटाण्याच्या शेंगा, लिमलेटच्या गोळ्या आणि अशाच वस्तू माझ्या डोक्यावरून भूतलावर अवतरल्या असतील. 'प्रौढत्वी निज शैशवास जपण्याचा बाणा' असल्यामुळेच हे असे घडले असावे, अशी समजूत करून घेत मी वरकरणी चेहरा हसरा ठेवीत होतो. पण काही वस्तूंची टोचणी व बोचणी चांगलीच जाणवत होती. पण लहानपणी सुद्धा डोक्यावर केस नसतीलच की, मग तेव्हा लहानपणी जे सहन केले असेल, त्याचा मोठेपणी आस्वाद घेण्याची संधी अनायासे मिळते आहे तर ती का सोडा, समजुतदारपणाचा भाव माझ्या मनात आला. ते जोडपे त्यांच्या भाषेत आपली माफी मागून दिलगिरी व्यक्त करते आहे, हे लक्षात यायला वेळ लागला नाही. मीही चक्क मराठीत, ' अहो चालायचच, त्यात काय मोठसं?', असे म्हटले. ते त्यांना कळल्याचे जाणवले. अशाप्रकारे मी आपला मराठी बाणा व्यक्त करीत आपल्याच विचारात उभा असतांना एक एअर होस्टेस समोर येऊन केव्हा उभी राहिली ते कळले नाही. तुम्हाला ह्या बॅगा जवळ घेऊन बसता येणार नाही, असे तिने बजावले. काय बोलावे चटकन न कळल्यामुळे मी फक्त वरच्या कपाटाकडे अंगुलीनिर्देश केला. काही वस्तू त्रिशंकूप्रमाणे किंवा आत रहायचं की बाहेर (डोक्यावर) पडायचं याचा निर्णय न झाल्यमुळे अधांतरी लटकत होत्या. झाली एवढी लूट खूप झाली, थोडक्यात समाधान मानावे, असा (पुन्हा एकदा) पोक्त विचार करून मी माऱ्याच्या क्षेत्रापासून डोक्यावर हात फिरवीत बाजूला सरलो. 'ही छोटी बॅग तुम्ही जवळ सीटखाली ठेवू शकाल पण ही दुसरी चांगलीच मोठी आहे, आता दुऱ्या बॅगेने चोहोबाजूंनी अंमळ बाळसे धरले असले तरी ते बोलून दाखवण्याची (आणि तेही इंग्रजीत) काय आवश्यकता होती? मी चेहऱ्यावरच नापसंतीचा भाव आणला. ही बॅग तुम्हाला केबिनमध्ये ठेवावी लागेल. मी हादरलो आहे, घाबरलो आहे की गोंधळलो आहे, हे तिला कळणार नाही, असे भाव मी चेहऱ्यावर आणले. तिनेही भावाबद्दल घासाघीस न करता ' अहो, घाबरू नका आम्ही तुमच्याकडून जास्तीचे पैसे मागणार नाही, असे म्हणत माझे शंकानिरसन तर केलेच पण 'अंदरकी बात' तिच्या लक्षात आले असल्याचेही दाखवले. अर्थात हा तिचा चक्क गैरसमज होता. आपल्या अज्ञानातले सुख भोगू द्या की तिला, असा विचार करून मी तो गैरसमज तिच्या लक्षात आणून देण्याच्या भानगडीत पडलो नाही. तेवढ्यात दुसरी एक हवाई सुंदरी तिथे हरिणीच्या चपळाईने आली आणि म्हणाली, २२ नंबरच्या सीटच्या वरच्या कपाटात ही बॅग मावेल,असे मला वाटते असे तिने माझ्या (बाळसेदार) बॅगेचा अंदाज घेत म्हटले. पहिलीच्या चेहऱ्यावरचा अविश्वास आणि तुच्छता स्पष्ट दिसत होती. मी मात्र अर्थातच तिकडे काणाडोळा केला आणि काहीशा चपळाईने ती जागा हस्तगत करून मराठी पाणी दाखवले. अशाप्रकारे २२ नंबरच्या सीटवरील कपाटात बॅग ठेवून '३२ फ' या नंबरच्या सीटवर आस्मादिक स्थानापन्न झाले. २२ नंबर लक्षात ठेवा, नाहीतर उतरतांना पुन्हा गोंधळ होईल. वरकरणी समजुतदारपणा दाखवीत पण मनातून खवचटपणे ती हवाई सुंदरी आपल्याशीच बोलली. पण आता या दोन्ही जागी माझी मालकी पुढच्या पंधरा तासांसाठी तरी नक्की झाली होती. या आनंदात असल्यामुळे मी त्याच्यावर विरजण पडू दिले नाही.
   सूटबुटातला मी
    आत विमानात येतायेता एक वेगळाच प्रकार घडला होता. गेटवर एका कर्मचारी महिलेने मला विचारले, तुम्हाला एक्झिट गेट जवळची जागा हवी आहे का? ती काय म्हणते आहे ते मला सुरवातीला कळलेच नाही. मी काही बोलणार एवढ्यात ती म्हणाली, तुम्ही याबाबत आत गेल्यावर ठरवणार का? मला हेही कळले नाही. पण हो म्हणून मी आत शिरलो. आमचे एक सहप्रवासी महणाले, तिने तुम्हाला विचारले. आमच्याकडे बघितले सुद्धा नाही. लोक कपड्याकडे पाहून माणसाची किंमत करतात. मी माझ्या कपड्यांकडे बघितले. मी सूट घातला होता. यामागे एक वेगळीच भूमिका होती. इकडे अमेरिकेत येताना सूट आणण्याचे ठरविले होते. पण तोच खूप जागा अडवू लागला म्हणून विचार केला की, सूट घालून का जाऊ नये? विमानातच तर बसून जायचे आहे. सूट मळण्याचा प्रश्नच नव्हता. थोडा चुरगळला असता. इस्त्री करून चालणार होते. मी सूटबुटात असल्यामुळे तिने मला दाराजवळची सीट जास्तीचे पैसे भरून घेता का, म्हणून विचारले होते. अशी ही कपड्यांची कमाल होती.
 इंटरनॅशनल ते डोमेस्टिक
    विमानात तेरा साडे तेरा तास कंटाळा न येता जावेत, म्हणून आयपॅडवर लिहीत होतो. निम्मे अंतर कापायला बराच वेळ लागला. पण पुढचे निम्मे अंतर लवकर कापले गेले, असे वाटले. सहार विमानतळ आला. छत्रपती शिवाजी टर्मिनस हा उच्चार आमच्या वैमानिकाच्या तोंडून ऐकतांना आनंद व अभिमान वाटत होता. आदल्या दिवशीच एअर इंडियाची ईमेल आली होती. देशांतर्गत उड्डाणे सुद्धा आता याच ठिकाणाहून होणार होती. दोन वेगवेगळी विमानतळे एक झाली होती. मुहूर्त होता १ आॅक्टोबरचा. मी पहिल्या प्रवाशांपैकी एक असणार होतो. नथिंग टु डिक्लेअरच्या रांगेत सामील होण्यापूर्वी इमीग्रेशन काउंटरवरून पासपोर्टवर स्टॅम्प मारून घेतला आणि देशात पुन्हा परत आल्याची नोंद सरकारदरबारी करून घेतली. साडे नऊ वाजत आले होते. आपल्या मायदेशी परतल्याची बातमी इथल्या व तिथल्या अशा दोन्ही घरी व्हावी म्हणून मोबाईलचा स्वीच आॅन करून फोन करण्याचा प्रयत्न केला. पाहतो तर काय दोन्ही फोन रुसलेले. काय करावे काहीच कळेना. मुक्कामी पोचताच दोन्हीकडे कळविण्याचा शिरस्ता होता. फोन झाला नसता तर दोन्हीकडून चौकशीला सुरवात झाली असती. नंतर लगेच कोणतीच फ्लाईटच नसल्यामुळे लगेच सामसूम झाली. सहार वास्तू एखाद्या चक्रव्युव्हासारखी आहे. डोमेस्टिक फ्लाईटचा प्लॅटफाॅर्म सापडत नव्हता. लिफ्टने दोन्ही तिन्ही लेव्हल्स पालथ्या घातल्या. बाहेर गेलो असतो तर सकाळचे चार वाजेपर्यंत आत प्रवेश मिळाला नसता. खूप भटकंती झाली. मनात विचार आला निम्मे मुंबई नागपूर अंतर तर हेलपाट्यातच कापले गेले असेल. रात्री बारा वाजता वीस/ पंचेवीस मुलांचा एक गट कुठूनतरी अवतरला. त्यांच्यापैकी एकाला फोनबद्दल विचारले. तो म्हणाला आम्ही सगळे सौदीहून परत आलो आहोत. आमचीही स्थिती तुमच्यासारखीच झाली आहे. आमचेही फोन लागत नाहीत. तेवढ्यात कुणीतरी बोलले की, देशांतर्गत फेऱ्या एच टर्मिनसवरून सुरू होणार आहेत. निश्चित माहिती तर मिळाली या आनंदात व उत्साहात होतो. यानंतर एका खुर्चीवर आसनस्थ होताहोता एकाने सांगितले की 'एच' विभागात ६२७ क्रमांकाच्या खिडकीवर नागपूरच्या फ्लाइटची व्यवस्था आहे. आता नेमकी माहिती मिळाली होती. चार वाजण्याची वाट पहात थांबायचे ठरवले. साडेतीनलाच जाग आली. एक फेरफटका मारण्याचे ठरवून 'एच'च्या शोधात निघालो. एका दिशेने गलबल दिसली. काही महिला ड्रेसकोड स्वरूपात हळदी रंगाची साडी आणि कुंकवी लाल रंगाचे ब्लाऊज घालून लगबगीत वावरत होत्या. पुढे गेलो तर सूटबुटातली साहेब मंडळी दिसली. तेवढ्यात एक महिला लगबगीने माझ्या दिशेने आली आणि तिने विचारले, सर, कहा जाना है आपको? नागपूर, असे उत्तर ऐकताच ती म्हणाली, ‘ती समोरची खिडकी’. 'चार वाजता सुरवात होणार होती ना?', मी म्हटले. 'नाही, आपण येऊन बोर्डिंग पास घेऊ शकता'. मी काउंटरवर गेलो. एकजण तातडीने पुढे आला त्याने माझी मोठा बॅग वजनासाठी उचलून वजनासाठी ठेवली. '४५पाऊंड, ॲडिशनल पेमेंट किती द्यावे लागेल? ', मी विचारले. 'काही नाही', उत्तर ऐकताच मला आश्चर्यच वाटले. बोर्डिंग पास घेतला. डोमेस्टक फ्लाईटच्या शोधात निघालो. चक्रव्युव्हाची आठवण होत होती. प्रत्येक दिशेने वळणे घेतली. मजल्यांवर  मजले वरखाली उतरलो व शेवटी सिक्युरिटी चेकसाठी उभा राहिलो.
 'बॅग टॅग्ज?' प्रश्न ऐकला आणि डोक्यावर हात मारला. पण त्याशिवाय पर्यायच नव्हता. 'मार्गदर्शकाते वाट पुसतु' परत जाण्यावाचून पर्याय नव्हता. बॅगेसाठी दोन व शिवाय 'जवळ असोत, म्हणून आणखी दोन टॅग्ज उचलून परत आलो. तपासणीचे सर्व सोपस्कार झाले.  ४३ नंबरच्या गेटपाशी आलो. काउंटरपाशी गेलो. अगत्याने आगतस्वागत झाले. वाट पाहण्याशिवाय आता काहीही काम शिल्लक राहिले नव्हते. म्हणून एका खुर्चीत विसावलो. केव्हा डोळा लागला ते कळले नाही. एकदम गडबड गोंगाट सुरू झाला आणि झोप खाडकन उघडली.
   व्हिआयपी ट्रीटमेंट
    सुरवातीला मला अर्थबोधच होत नव्हता. मग लक्षात आले की, आपण विमानतळावर आहोत आणि आपल्या परतीच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा अजून पूर्ण व्हायचा आहे. समोर प्रवाशांची रांग दिसत होती. गेटवर कर्मचारी सज्ज झाले होते आणि आता एकेकाला आत सोडणार होते. मी (शक्य तेवढी) चपळाई करीत आपले चंबूगवाळे गोळा केले आणि प्रवासी दप्तर खांद्यावर टाकून चालू लागलो. एक सूटबूटधारी मला न्याहाळून पाहत होता. तो मला नक्कीच न्याहाळत नसावा हे स्पष्ट होते. कारण तसे काहीच कारण नव्हते. म्हणून मी थबकून मागे वळून पाहिले. मागे कुणीच नव्हते. आश्चर्ययुक्त चेहऱ्याने मी पुढे चालू लागलो. रांगेच्या शेवटी जाऊन उभे राहण्याचा माझा विचार होता. पण तो सूटबूटधारी आपली तंदूल तनू सावरीत शक्यत्या चपळाईने माझ्याकडे आला.
   'धिस वे ,सर! इफ यू विल प्लिज सर!', मी थबकून उभा झालो . माझ्या बॅगचे वजन ४५ पाऊंड होते. डोमेस्टिक फ्लाईटवर ३० पाऊंड की असेच काहीतरी वजन जादा पैसे न भरता सोबत नेता येते, हे मला माहीत होते. ॲडिशनल चार्जेस किती हवेत, हे मी स्वत:हून विचारले होते. आजच्यापुरता डोमेस्टिक काऊंटरवर इंटर नॅशनल फ्लाईटच्या काऊंटरवरचा कर्मचारी आला असेल, त्याने माझ्याकडून जास्तीचे पैसे मागितले नाहीत ते नाहीतच पण मी स्वत:हून जास्त पैसे भरण्याची तयारी दाखवल्यावर ५० पाऊंड का असे काहीसे वजन अतिरिक्त पैसे न भरता सोबत नेता येते , असे सांगत त्याने मलाच वेड्यात काढले होते आणि आता ऐनवेळी मला आडवत होते. या सर्व प्रकारात माझा काय दोष?  मी मनात 'डिफेन्स' तयार ठेवून ताठर झालो. 'व्हेअर इज युवर तिकीट सर?'. मी काहीही न बोलता पण घुश्शातच पासपोर्ट व तिकीट त्याच्यासमोर धरले. ' दी पासपोर्ट इज नोमोअर नेसेसरी सर! कीप इट इन युवर पाॅकेट सर!’, त्याने तिकीट आपल्या हातात घेतले, रांगेतून मला बाहेर काढले आणि काऊंटरपर्यंत माझ्यासोबत आला. काऊंटर फाॅईल कापून माझ्या हातात दिले. 'चेक धिस!' म्हणून तिकिटाचा उरलेला भाग त्याने कर्मचाऱ्याच्या हाती दिला. 'इट वाॅज नाॅट माय फाॅल्ट!'. मी उसन्या अवसानाने म्हटले. माझे तिकीट प्रकाश झरोक्यात धरून तो कर्मचारी उभा होता. आवश्यक तो ध्वनी काही कानी पडेना. 'सम थिंग राॅंग सर! वी विल चेक इट सर!' तुंदिलतनूने काहीशा रागानेच इकडे तिकडे पाहिले. टिटटाप वेषातील चार पाच कर्मचाऱ्यांनी धावत येऊन काऊंटरला गराडा घातला. प्रत्येक जण मनाला येईल ती खुंटी पिरगळत होता, पण व्यर्थ! शेवटी त्यांना हवा असलेला ध्वनीसंकेत त्या मशीन मधून बाहेर पडला. गराडा घालणारे कर्मचारी विजयी मुद्रेने बाजूला सरले. 'धिस इज युवर टिकीट सर! यू आर दी फर्स्ट कस्टमर टु फ्लाय फ्राॅम मुंबई टू नागपूर बाय अवर फर्स्ट फ्लाईट सर!', त्याने इतरांनाइशारा केला. एअर इंडियाचे शे पन्नास कर्मचारी आपापला गणवेश परिधान करून मार्गावर दुतर्फा उभे राहून टाळ्या वाजवीत माझे - त्यांच्या पहिल्या वहिल्या प्रवाशाचे - उत्साहात स्वागत करीत होते. कॅमेऱ्याचा 'क्लिकक्लिकाट' संपत नव्हता. शूटिंगसाठी आलेले टीव्ही युनीट एकेक पाऊल मागे घेत मागेमागे सरकत होते. तसतसे एक एक पाऊल टाकीत त्या 'जनरल मॅनेजर' सोबत आस्मादिकांची स्वारी एकेक पाऊल पुढे सरकत होती. आता आमच्या मागे हळूहळू प्रवाशांची रांग तयार होत चालली होती. आम्ही मिरवणुकीने पण आस्ते कदम पुढे सरकत होतो.
  माझ्या चेहऱ्यावरची गोंधळलेपणाची, बावळटपणाची, अपराधीपणाची, उसन्या अवसानाची झाक आता पार पळाली असणार होती. मी सावरलो. नेत्याच्या आविर्भावात त्या 'बड्या' मंडळींच्या अभिवादनाचा स्वीकार करू लागलो. तेवढ्यात एक कर्मचारी समोर आला. त्याने माझ्या हातात शीत पेयाचा पाव लिटरचा चौकोनी डबा कोंबला. तिकीट, बॅग, व तो डबा धरता धरता माझी धांदल उडत होती. वळणावर एअर इंडियाचा 'महाराजा' पूर्वीपेक्षा वेगळीच भावमुद्रा धारण करून सुहास्यवदनाने माझ्या स्वागतासाठी सज्ज झाला होता.
   पहिल्या फ्लाईटचा पहिला प्रवासी
   आज नव्याची नवलाई होती. आजपासून डोमेस्टिक फ्लाईट सुद्धा सहार वरून उड्डाण 'भरणार' होती. आकाशात या नवीन तळावरून झेप घेणारे पहिले विमान मुंबई - नागपूर मार्गावरचे होते. त्या विमानतले आम्ही सगळे पहिले प्रवासी होतो. त्यातला मी पहिला प्रवासी ठरलो होतो. आमच्या स्वागतासाठी सगळा मार्ग नव्या नवरीसारखा सजला होता. प्रत्येक स्तरावरची यंत्रणा पहिल्यानेच कार्यरत होत होती व म्हणून पहिलटकरणीच्या वेदना आणि पहिल्या अपत्यसंभवाचा आनंद एकाचवेळी अनुभवत होती. सगळ्या कार्यक्रमाला सांस्कृतिक स्पर्शासोबत 'काॅरपोरेट टच'ही होता.
    नव्या कोऱ्या करकरीत विमानाच्या दारात हवाई सुंदऱ्या मोजक्या हास्याने आमचे स्वागत करीत होत्या. त्यांच्या चमूची प्रमुख जातीने 'हवे नको' पहात होती. लाल गालिचावरून आम्ही पुढे सरकत होतो. मार्गाच्या दुतर्फा तीनतीन खुर्च्या होत्या. पहिल्या आणि तिसय्रा खुर्च्यांना कुंकवी लाल रंगाचे सीट कव्हर होते. मधल्या खुर्चीला काळसर पिवळा पण हळदी रंग होता. हीच रंगसंगती सुंदऱ्यांच्या पोषाखातही होती.
   प्रारंभिक सूचना देऊन झाल्यावर, आज आमच्याकडून आपणासगळ्यांना चहा नास्ता आहे बरं का, तसेच एक फाॅर्म आम्ही आपल्याला देऊ. त्यात आमच्या प्रत्येक तरतुदीला आपल्याला 'क्रम'(रेट) द्यायचा आहे. शेवटी आम्हाला आपली सेवा आणखी चांगली करता यावी यासाठीच्या सूचना नोंदवायच्या आहेत.
  विसंगत अशी एकच सूचना वाटली. संकटप्रसंगी काय करायचे, विमान पाण्यात बुडू लागले तर काय करायचे, हे ऐकतांना आम्ही एकदम गंभीर झालो. पण यात चूक असे काही म्हणता यायचे नाही. टायटॅनिकच्या पहिल्याच जलप्रवासात तिला जलसमाधी मिळाली होती! वास्तवाचे भान विसरून कसे चालेल?