Monday, October 28, 2019

(३०) नकारात्मक प्रचार

‘नकारात्मक प्रचार – नको रे बाप्पा!’
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
नकारात्मक प्रचार कसा उलटतो ,याचा भारतातील निवडणुकीत चांगलाच अनुभव आल्यामुळे अनेक राजकीय पुढाऱ्यांना ‘नकारात्मक प्रचार – नको रे बाप्पा!’, असे  वाटत असावे अशी समजूत होती. पण एवढी जबरदस्त थप्पड खाऊनही अनेकांना शहाणपण आलेले दिसत नाही. मग लक्षात आले की, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हेच खरे आहे. अशी खोड लागूच  नये, म्हणून लहानपणापासूनच योग्य संस्कार करण्याचा एक कौतुकास्पद प्रकार नुकताच पाहण्यात/वाचनात आला आहे. अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील यॉर्क काउंटी मध्ये(काउंटी म्हणजे जिल्हा) वसलेले यॉर्क हे त्याच नावाचे एक टुमदार शहर आहे. या शहरात सेन्ट्रल यॉर्क हायस्कूल या नावाची अठराशे विद्यार्थी असलेली एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. या प्रांतातच नव्हे तर देशभरात एक चांगली शाळा म्हणून लौकिक प्राप्त करणारी शाळा आहे. दर महिन्याला या शाळेचे एक मासिक प्रसिद्ध होत असते. ‘द प्राउलर’ या नावाच्या मासिकात शाळेचे विद्यार्थी निरनिराळ्या विषयावर लेख लिहीत असतात. क्राऊनपेक्षा थोड्यामोठ्या आकाराचे चोवीस पानांचे हे मासिक असून यात एका विद्यार्थिनीने मे महिन्याच्या अंकात ‘निगेटिव्ह कँम्पेन बॅक फायर्स’ या शीर्षकानुसार  एक लेख लिहिला आहे.
बारावीतील विद्यार्थिनीचा लेख
या लेखाचा हा स्वैर अनुवाद आपल्या देशातील नकारात्मक प्रचार करणाऱ्याच्या डोळ्यात चांगलेच अंजन घालेल, असे वाटते. या लेखिकेसमोर आपल्या येथील निवडणुकीतील प्रचारच असावा, असे वाटते. प्रतिस्पर्धी उमेदवाराची सर्व प्रकारची खरीखोटी ‘अंडीपिल्ली’ काढली की, आपण चांगले उमेदवार आहोत, असे सिद्ध होते, अशी लोकांची समजूत असते. गेल्या मार्चमध्ये ‘आपल्या’ अमेरिका देशात अशीच एक निवडणूक पार पडली. आपली मुदत संपली म्हणजे एकाने आपली जागा सोडायची आणि दुसऱ्याने ती  घ्यायची, याचा अर्थ निवडणूक असा आहे. आपल्या पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील गेल्या निवडणुकीत नकारात्मक प्रचाराचा प्रकार अनुभवला आला. एका उमेदवाराने दुसऱ्या विरुद्ध प्रचार करताना त्याची ‘काळी’ बाजूच समोर यावी, या दृष्टीने प्रचाराचा धुमधडाका सुरु केला. प्रतिस्पर्धी उमेदवार किती आणि कसा वाईट आहे, हेच तो सांगत राहिला. लोक या अपप्रचाराला नुसते कंटाळलेच  नाहीत तर त्यांना या अपप्रचाराचा उबग आला. त्यांनी असा प्रचार करणाऱ्या उमेदवाराकडे साफ पाठ फिरवली. त्याचा प्रतिस्पर्धी उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आला.
कुठे चुकले
हा उमेदवार कुठे चुकला. तो ‘जुनी मढी’ उकरून काढीत राहिला. तो विषय या निवडणुकीत गैरलागू  आणि कालबाह्य झाला होता. दुसऱ्याचे उणे काढीत बसण्यापेक्षा ‘आपले निवडून येणे ही बाब जनहिताचे दृष्टीने कशी चांगली आहे’, हे त्याने सांगावयास हवे होते. त्याने उपस्थित केलेला अपप्रचाराचा मुद्दा दहा वर्षे उलटून गेल्यामुळे आणि त्याच्या सत्यतेबद्दल लोकांच्या मनात शंका असल्यामुळे,जनमानसावर परिणाम करीत नाही, हे त्याला निकाल लागल्यानंतरच कळले.  या प्रश्नासंबंधात न्यायालयात खटला दाखल होता. अनेकांना हे निम्न प्रकारचे राजकारण वाटत होते.  आपण किती चांगले आहोत, हे सांगण्यापेक्षा विरोधक कसा आणि किती वाईट आहे, हेच तो पुन्हापुन्हा सांगत राहिला. परनिंदा करून आपले चांगलेपण सिद्ध होत नाही, हा धडा आपण शिकला पाहिजे.
स्थानिक उमेदवारांची नावे आणि प्रश्न वगळून हा लेख अनुवादित केला आहे. लेख लिहिणारी लेखिका दहावी/बारावीची विद्यार्थिनी आहे. तिला ज्या गोष्टी एवढ्या लहान वयात कळल्या त्या आपल्याला मोठेपणी तरी कळतील का?



No comments:

Post a Comment