Monday, October 28, 2019

(२७) एका अमेरिकन मुलाच्या मनाचा मागोवा

    एका अमेरिकन मुलाच्या मनाचा मागोवा
वसंत गणेश काणे,  
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
दूरध्वनी - ९४२२८०४४३० / (०७१२)२२२१६८९
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन,
यॅार्क,  पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   जाॅन नावाचा ( नाव बदलले आहे) मुलागा १२ वीची परीक्षा चांगल्याप्रकारे उत्तीर्ण झाला होता. आईवडीलही तसे चांगले सुखवस्तू. मुलाच्या पुढच्या शिक्षणाचा खर्च करण्याची त्यांची तयारी होती. पण आईबापांच्या पैशाच्या आधारे पुढील शिक्षण घेण्यास त्याने साफ नकार दिला. बारवीपर्यंतचे शिक्षण एकतर सर्वांनाच जवळजवळ नि:शुल्क मिळते. तरीही केवळ पालनपोषणाचाच नव्हे तर इतरही खर्च आईबाप करीत असतातच. पण यापुढे 'माझा मी कमावणार व शिकणारही' ही जिद्द उराशी बाळगून हा घराबाहेर पडला आहे. तुमचे पैसे घेऊन शिकलो तर तुमचे ऐकावे लागेल . मला आपल्या मनासारखे वागता जगता येणार नाही, असे सांगून त्याने स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे ठरविले आहे.
   सकाळी ४ ते दुपारी ३ पर्यंत तो नोकरी करतो आहे आणि संध्याकाळच्या काॅलेजमध्ये शिकतोही आहे.'आॅन लाईन' ही काही शिक्षण घेतो आहे. आॅन लाईन परीक्षा देऊन पुढे उपयोगी पडतील अशी 'क्रेडिट्स' (श्रेयिका) गोळा करतो आहे. 'क्रेडिट म्हणजे विषयाच्या छोट्याशा भागाचा अभ्यास करून त्याची व तेवढ्याचीच परीक्षा देऊन प्रमाणपत्र मिळवायचे', ही कामचलावू व्याख्या हा मुद्दा समजण्यापुरती पुरेशी ठरावी. अशी क्रेडिट्स तो सध्या एकापाठोपाठ गोळा करतो आहे. पुढे जमल्यास इस्टेट एजंट व्हायचा त्याचा विचार आहे. पण यासाठी लायसन्स मिळवावे लागते. त्याची भली मोठी फी भरावी लगते. त्यामुळे तो 'पैपै' वाचवतो आहे.
   लवकरच ही नोकरी सोडून तो कोस्ट गार्ड होणार आहे. ही तशी एकप्रकारे सैनिकी पेशाची नोकरी असली तरी हे युद्धभूमीवर लढणारे सैनिक नव्हेत. पण या नोकरीत एक फायदा असा आहे की, यांच्या शिक्षणाचा खर्च शासन करते. त्यामुळे पगार आणि नि:शुल्क शिक्षण असे दुहेरी फायदे पदरात पडणार आहेत. रात्रीची विद्यालये / महाविद्यालये आहेतच. त्याठिकाणी आवश्यक ते शिक्षण घ्यायचे. काही शिक्षण आॅन लाईन घ्यायचे. एका पाठोपाठ एक  क्रेडिट्स गोळा करायची आणि इलेक्ट्राॅनिक इंजिनिअर व्हायचे, असा त्याचा पुढील जीवनाचा आलेख आखून झाला आहे. या वाटेने त्याची निर्धारपूर्वक वाटचाल सुरू आहे.
 याच्या तुलनेत आपल्या येथील विद्यार्थी आठवले. त्याबाबत विचार मांडत नाही कारण तो विषय आपल्याला माहीत आहे. इथेही चंगळवादाच्या आहारी गेलेले काही कमी नाहीत. तेही भेटतात पण स्वेच्छेने स्वयंनिर्भर होण्याचा हा प्रकार उल्लेखनीय वाटला.
 

No comments:

Post a Comment